फारुक एस. काझी हे समकालीन मराठी बालसाहित्यातील एक ठळक नाव आहे. महत्त्वाच्या नियतकालिकांमधून ते सातत्याने गुणवत्तापूर्ण लेखन करत असतात. त्यांनी आजवर आपल्या बालवाचकांसाठी १५ पुस्तके लिहिली आहेत. ही सगळी पुस्तके नामांकित प्रकाशकांनी प्रकाशित केली आहेत. त्यांनी मराठी बालवाचकांसाठी इतर भाषांतील उत्तमोत्तम पुस्तके अनुवादित करून मराठीत आणली आहेत. निरपेक्ष बालनिष्ठेशिवाय असे काम संभवत नाही. त्यांच्या लेखनाबरोबरच शिक्षण क्षेत्रातील त्यांचे कामही विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. 'हाटूमुटूचा चंद्र' हा त्यांचा नवीन बालकथासंग्रह मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केला आहे. ह्या देखण्या संग्रहात बाळगोपाळांना आवडतील अशा विषयांवरच्या दहा कथा आहेत.
एसपी १३' हे नाव वाचल्याबरोबर हे एखाद्या उपग्रहाचे नाव आहे की काय, असे वाटण्याची शक्यता आहे. पण हे उपग्रहाचे नाव नाही, तर एका नवीन ग्रहाचे नाव आहे. समायरा नावाच्या तेरा वर्षांच्या एका धिटुकल्या मुलीने हा ग्रह शोधून काढला आहे. म्हणून त्याचं नाव 'एसपी १३'. तिचा मामा आणि त्यांचा ख्रिस नावाचा संशोधक मित्र यांनी स्पेस रिसर्च सेंटरमध्ये तयार केलेल्या स्पेसशीपमध्ये बसून तिने एकटीने हा धाडसी प्रवास केला आहे. समायरा ही भलतीच भारी अंतराळवीर निघाली. मोठ्या प्रयासाने तिचा मामा आणि ख्रिस तिला पुन्हा शोधून काढतात, पण ती आता 'त्या' ग्रहावर इतकी रमली आहे, की ती पृथ्वीवर परत येऊ इच्छित नाही. त्या ग्रहावरच्या लोकांचा प्रेमळपणा आणि वेगळेपणा सांगताना ती म्हणते, की ह्या लोकांनी निसर्गाशी आपली नाळ जोडून ठेवली आहे. निसर्गाकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतात. मामाला समजावून सांगताना ती म्हणते, 'विकास म्हणजे निसर्गाला ओरबाडणं नव्हे, तर निसर्गासोबत जाणे. त्याच्या हातात हात देणे'.
एसपी'चा अर्थ आता तरी समजला की नाही? एसपी म्हणजे 'समायराज प्लॅनेट'. एक नवीन ग्रह एका मुलीच्या नावाने ओळखला जातो. तुमच्यापैकी ज्या मुलामुलींना अंतराळवीर व्हायचं आहे, त्यांनी समायरासारखं धाडस दाखवायला हवं. संशोधक वृत्ती वाढवायला हवी. त्या ग्रहावरच्या माणसांसारखं आपणही निसर्गप्रेम जपायला हवं. ही अद्भुतरम्य गोष्ट जिज्ञासू बालवाचकांना नक्कीच आवडेल. ही उत्कंठावर्धक गोष्ट मुलेमुली आपला श्वास रोखून वाचतील. आपला-आपला स्वतंत्र ग्रह कधी तरी नक्कीच शोधून काढतील.
रेहान आणि अर्पित हे दोघे छोटे दोस्त आहेत. पाचवीत शिकत असलेले. रेहान नुकताच अर्पितच्या गावात राहायला आला आहे. त्याला ह्या नवीन गावातली काहीच माहिती नाही. अर्पित त्याला सगळ्या गोष्टी दाखवतो. डोंगर आणि डोंगरावरचा तलाव पाहून रेहान भलताच खूश होतो. तलावातील रंगीबेरंगी मासे पाहून सुखावतो. रेहानला ते मासे पाण्याच्या बाटलीत भरून घरी न्यावेसे वाटतात. इथली पानं, फुलं आणि रंगीबेरंगी दगड घरी न्यावेसे वाटतात. अर्पितची आजी जे म्हणते, ते तो रेहानला सांगताना म्हणतो, 'आपण निसर्गाकडून सगळंच घ्यायला बघतो. निसर्गाला देत काहीच नाही. करू नये असं. आपण आनंद भरून घ्यावा, मनात. म्हणजे माणूस परत परत तो आनंद घ्यायला इथे येतो. नाहीतर त्याची आठवण तरी मनात कायम ठेवतो'.
डोंगर उतरताना रेहानला पडण्याची भीती वाटते.
त्याला धीर देताना अर्पित म्हणतो,'अजिबात पडणार नाहीस. फिकर नॉट'. असे म्हणताच दोघेही तुफान हसत सुटले. 'फिकर नॉट' ही गोष्टही बाळगोपाळांना निसर्गाच्या जवळ घेऊन जाते.
कर के देखो' ह्या गोष्टीत आपल्याला रेहानसोबत
प्रतीक, ओजस, सागर, निशांत ही सहावीत शिकणारी बच्चेकंपनी भेटते. पूर्वी ही गॅंग 'उनाड गॅंग' म्हणून ओळखली जात असे. पुढे त्यांनी असे काही चांगले काम केले, की ही गॅंग 'कर के देखो' गॅंग म्हणून ओळखली जाऊ लागली. पहिल्यांदा ही गॅंग टेकडीवर ट्रेक करण्यासाठी गेली होती. त्या टेकडीवर लोकांनी प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल, चिप्सची पाकिटे असा खूप सारा कचरा करून ठेवला होता. ह्या गॅंगने तो सगळा कचरा चार पिशव्यांमध्ये गोळा करून टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कचराकुंडीत जमा केला. पुढच्या रविवारी 'इथे कचरा करू नये' असा फलक तयार करून आणून लावला. तरी कचरा होतच होता. त्यांच्या लक्षात आले की नुसते फलक लावून काहीही होत नाही. चांगलं काम नेहमी अवघडच असतं, पण करून बघायला काय हरकत आहे! त्यांनी नियमित टेकडीची साफसफाई चालू ठेवली. अशा प्रकारे 'उनाड गॅंग' ही आपल्या कामामुळे 'कर के देखो' गॅंग' बनली. हळूहळू इतरही लोक तयार झाले. त्यांच्या असे लक्षात आले आहे, की चांगल्या कामात हळूहळू गर्दी होते. आपण केलेला कचरा आपणच उचलणे हे आपले कर्तव्य आहे, हे लोकांना हळूहळू समजू लागले. तरीसुद्धा न थकता 'कर के देखो' गॅंगमधील मुले नवीन भविष्याची बांधणी करत होती. आपणसुद्धा ह्या गॅंगचे सभासद व्हायला काय हरकत आहे!
हल्ली मानवाने मोठ्या प्रमाणात निसर्गाचे शोषण चालविले आहे. मानवाने जंगलतोड केल्यामुळे वन्य प्राणी अन्न-पाण्यासाठी नाइलाजाने मानवी वस्तीत येत आहेत. माणूस आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष सुरू झाला आहे. असाच एक माकडांचा कळप अन्न पाण्यासाठी शाळेजवळच्या चिंचेच्या झाडावर आला होता. त्या माकडांना पळवून लावण्यासाठी लोकांनी झाडाखाली फटाके फोडले. फुटलेला फटाका लागून एका माकडिणीचा डोळा फुटला. त्या माकडिणीला कायमची 'जखम' झाली. ज्याने हा फटाका फोडला होता, त्या मुलाला पुढे चालून खूप पश्चात्ताप झाला. तो आईच्या गळ्यात पडून रडत होता. एकीकडे माकडिणीच्या डोळ्यात 'जखम' झाली होती, तर दुसरीकडे पश्चात्तापामुळे ह्या कथेच्या नायकाच्या अंतःकरणाला 'जखम' झाली होती. त्यामुळे 'जखम' हे ह्या कथेचे शीर्षक अतिशय अर्थपूर्ण आहे! कथेच्या नायकाची ही संवेदनशीलता महत्त्वाचीच आहे, पण आपल्यामुळे मुक्या जीवांना त्रास तर होणार नाही ना? याची आपण वेळीच दक्षता घेतली पाहिजे.
जाऊ दे त्याला' ह्या कथेची नायिका आहे चौथीत शिकणारी निधी नावाची छोटी मुलगी. तिचे वडील फॉरेस्ट ऑफिसर आहेत. अभयारण्याच्या मधोमध एका टेकडीवर त्यांचा मोठा बंगला आहे. त्या जंगलात अस्वल, कोल्हे, बिबटे असे खूप सारे प्राणी होते. यांच्या आधी तिथे शेख नावाचे फॉरेस्ट ऑफिसर होते. शेख साहेबांना निधीएवढीच एक मुलगी होती, अफरोज नावाची. तिथे शबताब नावाचे एक अस्वल होते. ते एखाद्या रक्षकासारखे त्या बंगल्याचे रक्षण करत असे. इतर प्राण्यांना पळवून लावत असे. एके दिवशी निधीला सामानाच्या खोलीत एक जुनी डायरी सापडली. त्या डायरीत अफरोजने केलेल्या काही नोंदी वाचायला मिळाल्या.
एके दिवशी रात्री शबताबही नव्हता आणि सुरक्षारक्षकही आला नव्हता. नेमकी त्याच वेळी लांडग्यांनी अफरोजची शिकार केली. दु:खी झालेले शेख साहेब बदली करून घेऊन दूर निघून गेले. त्या दिवसापासून शबताब विचित्र वागू लागला. शेख साहेबांची मुलगी अफरोज पुन्हा कधी तरी येईल, असे त्याला वाटत होते. एके दिवशी गेटमधून शबताबचा आवाज आला. निधीला पाहताच शबताब एकदम शांत झाला. निधीने त्याला आवाज दिला, पण तो थांबला नाही. खाली मान घालून तो निघून गेला.
निधीचे बाबा तिची समजूत घालताना म्हणाले, 'शबताबला समजलय, की आता आपली अफरोज कधीच परत येणार नाही. मुक्या जीवांना निसर्गानं किती माया दिली आहे! माणूस माणसाला विसरेल, पण हे मुके जीव माणसाची कायम आठवण ठेवतील'.
माणूस आणि मुक्या जीवाच्या जिव्हाळ्याची ही गोष्ट वाचकाला हलवून टाकते. मुक्या जीवांना जीव लावण्याचा संदेश देते.
बाबांची भाषा' ह्या कथेचा नायक सारंग हासुद्धा असाच एक संवेदनशील मुलगा आहे. त्याचे वडील एका अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. एका दवाखान्यात अतिदक्षता विभागात ते उपचार घेत आहेत. सारंगची आई त्याला सांगते, की तुझे बाबा लवकरच बरे होतील, पण बोलू शकणार नाहीत आणि ऐकूही शकणार नाहीत'.
हे ऐकून सारंग हादरतो. कारण त्याचे वडील हे त्याचे जवळचे मित्र आहेत. ते इतके कलंदर आहेत, की ते नेहमी सारंगसोबत हसत, खेळत आणि नाचत असतात. सारंगचे सगळे मित्र त्याचा हेवा करत असतात. आता बाबा ऐकूही शकणार नाहीत आणि बोलूही शकणार नाहीत, म्हटल्यावर सारंग अस्वस्थ झाला. त्याने मनाशी विचार केला, जेव्हा लहानपणी मला बोलता येत नव्हते, तेव्हा बाबांनी माझी बोबड्या बोलांची भाषा शिकून घेतली होती. आता बाबांना ऐकता आणि बोलताही येणार नसेल, तर मला त्यांची खुणांची भाषा शिकून घेतली पाहिजे. त्याने अतिशय मेहनतीने एका कागदावर कसल्याशा खाणाखुणा चितारल्या, कारण आता त्याला 'बाबांची भाषा' हाकारत होती.
स्वप्न' ह्या कथेतली निर्जीव सायकल चक्क बोलते. तुमच्या-माझ्यासारख्या भावना व्यक्त करते. ह्या गोष्टीतला मुलगा दुकानात जाऊन ही महागडी सायकल खरेदी करून घरी आणतो. सायकलचा नवेपणा संपायच्या आतच त्या मुलाला त्या सायकलचा कंटाळा आला. तो तिची अजिबात काळजी घेत नसे. तो तिच्याकडे दुर्लक्ष करीत असे. त्यामुळे ती सायकल घाण झाली होती. बाबांनी ती सायकल घरात काम करणाऱ्या राजू नावाच्या माणसाला देऊन टाकली. त्याच्या मुलाला ती सायकल फारच आवडली. तो फारच खूश झाला. तो तिची खूप काळजी घेऊ लागला. आपल्यामुळे कुणीतरी खूश झाले, हे पाहून सायकलच्या डोळ्यांत पाणी आले. हा मुलगा सायकलची छान देखभाल करू लागला. सायकल मनाशी म्हणाली, 'आपलं स्वप्न आज पूर्ण झालं. आपल्याला अशाच मालकाची गरज होती, जो आपली काळजी घेईल आणि आपले लाडही करील'.
ही गोष्ट वाचल्यावर छोट्या दोस्तांनाही समजेल, निर्जीव वस्तूंनासुद्धा जीव लावलेला आवडतो. ते आपल्या वस्तूंची खूप काळजी घेतील आणि त्यांची निगा राखतील.
साक्षी ही एका गरीब शेतमजुराची छोटी मुलगी आहे. तिला शाळेच्या सहलीसाठी एक हजार रुपये फीस भरायची आहे. पण तिच्या घरी तेवढे पैसेच नाहीत. त्यामुळे ती नाराज झाली आहे. ती रुसून जाऊन शेजारच्या लिंबाच्या झाडाखाली बसली. लिंबाची पानं तिला चंद्राच्या कोरीसारखी दिसतात. लिंबाची बारीक फुलं चांदण्यांसारखी दिसतात. तिची समजूत घालताना आजी तिला म्हणाली, 'हा आपला हाटूमुटूचा चंद्र आहे. हाच चंद्र उद्या खराखुरा चंद्र होईल. आपण आपली चिकाटी सोडायची नाही. देव आपली परीक्षा बघतो आणि आपण झाल्यावर बक्षीसपण देतो. आपण जरा कळ सोसायची. सगळं मिळतं. आज गरिबी आहे, उद्या ती पळून जाईल. आपण आपल्या मनातला 'हाटूमुटूचा चंद्र' कधी हरवू नये'.
हे ऐकल्यावर साक्षीच्या चेहर्यावर 'हाटूमुटूचा चंद्र' फुलला होता. 'हाटूमुटूचा चंद्र' ही गोष्ट आपल्याला धीर धरायला शिकविते. परिस्थितीशी दोन हात करायला शिकविते. एक ना एक दिवस खराखुरा चंद्र आपल्या हाती येईलच. एक ना एक दिवस आपले स्वप्न साकार होईलच, असा विश्वास ही कथा आपल्याला देते. फक्त आपण संयम सुटू द्यायचा नाही.
मंदार हा शहरात चौथीत शिकणारा मुलगा. उन्हाळी सुट्टीत तो आपल्या आईसोबत गावी गेला होता. त्याची चुलत बहीण चंदा त्याला शेतात घेऊन जाते. शेतातील झाडेझुडपे आणि हिरवळ पाहून मंदार भलताच खूश झाला. त्याची बहीण चंदा म्हणाली, 'झाड पेरलं की झाडच येणार. पशुपक्षी, आम्ही सगळेच झाडं लावतो'.
त्यावर मंदार म्हणाला, 'आमच्या शहरात बिल्डिंग पेरतात आणि बिल्डिंगच उगवून येतात'.
त्यावर दोघेही हसू लागले.
चंदा म्हणाली, 'हिरवं सपान मातीच जन्माला घालते. झाडं, झुडपं, फुलं ही सगळी मातीतूनच जन्माला येतात. मातीच हिरव्या सपनाची माय असते'.
मातीचं स्वप्न समजलेला मंदार शहराचं स्वप्न शोधत होता. गावाकडच्या हिरव्या शेतशिवाराने त्याला विचार करायला भाग पाडले. लेखकाने गावाकडचे हिरवेगार जंगल आणि शहरातील कॉंक्रिटचे जंगल यातील फरक लक्षात आणून दिला आहे.
फारुक काझी यांच्या कथेत विषयांची विविधता आहे. काझी आपल्या कथेत इतकी छान वातावरणनिर्मिती करतात, की वाचक त्यात रंगून जातो, मनोभावे रमून जातो. ह्या कथेला गावशिवाराची नितांत ओढ आहे. ही कथा आपल्याला जंगला-डोंगरांतून फिरवून आणते, तशीच ती आपल्याला अंतराळाचीही अनोखी सफर घडविते. काझी यांच्या कथेची भाषाशैली अतिशय ओघवती आहे आणि कथनशैली अतिशय रंजक आहे. ह्या कथेला कवितेसारखी आंतरिक लय आहे. यातली भाषा ही खास आजच्या 'मुलांची भाषा' आहे. ही कथा वाचकाला सगळ्याच गोष्टी तपशीलवार सांगत बसत नाही, तर वाचकाला दिशा दाखवून त्या दिशेने विचार करायला प्रवृत्त करते. ह्या कथेतील अद्भुतरम्यता वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. तरीसुद्धा ह्या कथेचा वास्तवाचा पायाही तितकाच भक्कम आहे.
ह्या कथेतील पात्रे जशी शहरी आहेत, तशीच ती खेड्यापाड्यांतीलही आहेत. कष्टकरी वर्गातील ही पात्रे आपल्या बोलीभाषेत बोलतात. ह्या पात्रांची संवेदनशीलता फारच महत्त्वाची आहे. ही पात्रे इतरांची सुखदु:खे आस्थेने समजून घेतात. त्यांच्या सुखदुःखांशी समरस होतात. ही कथा मुद्दाम संस्कार करण्याच्या भानगडीत पडत नाही, तर संस्कारांचे हळुवार सूचन करते. ही कथा संयमाचे आणि सबुरीचे मोल मनावर बिंबविते. निसर्गाच्या जवळ घेऊन जाते आणि आपला हात निसर्गाच्या हाती सोपविते. ही कथा जगण्यावरचा आपला विश्वास आणखी दृढ करते.
चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या आकर्षक मुखपृष्ठामुळे आणि आतील सुंदर सजावटीमुळे मूळच्या 'अक्षर' लेखनाला रंगसंगतीचा सुगंध लाभला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने पुस्तकाची निर्मिती दृष्ट लागण्यासारखी केली आहे.
*********
'हाटूमुटूचा चंद्र' (बालकथासंग्रह)
लेखक : फारुक एस. काझी
मुखपृष्ठ व सजावट : चंद्रमोहन कुलकर्णी
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.
संपूर्ण रंगीत पृष्ठे ७६ किंमत रु. २५०
*********
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS