'काळ्यानिळ्या रेषा' : एका व्यक्तीचे स्वकथन नव्हे, समग्र उपेक्षित अधोविश्वाचे जीवनदर्शन डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

राजू बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'काळ्यानिळ्या रेषा' ह्या स्वकथनाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हे पुस्तक सध...
राजू बाविस्कर यांनी लिहिलेल्या 'काळ्यानिळ्या रेषा' ह्या स्वकथनाला नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे हे पुस्तक सध्या चर्चेत आले आहे. नव्वदच्या दशकात दलित स्वकथनांनी एका अपरिचित अशा उपेक्षित विश्वाचे दर्शन घडविले होते. त्यापेक्षा जरा 'वेगळे' असे ह्या स्वकथनाचे स्वरूप आहे. 'वेगळे' या अर्थाने की बहुतेक सर्व आत्मकथने ही नायकाला मध्यवर्ती ठेवून कालानुक्रमाने विकसित होत गेलेली असतात. मात्र ह्या स्वकथनात लेखकाने नायकाला मध्यवर्ती ठेवून हे कथन केलेले नाही, तर आपल्या आयुष्यात आलेल्या प्रमुख पात्रांच्या व्यक्तिचित्रणांतून हे स्वकथन घडविले आहे. याचा अर्थ असा, की लेखकाने 'स्व'ला कमी महत्त्व देऊन आपल्या सभोवतालच्या उपेक्षित समूहाला अधिक महत्त्व दिले आहे. 'स्व'चा लोप करून किंवा 'स्व'ला गौणत्व देऊन समूहाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो मनाचा मोठेपणा लागतो, तो ह्या लेखकाकडे निश्चितच आहे. गतआयुष्यातील दु:खद आठवणी उगाळणे क्लेशकारकच असते. तरीसुद्धा लेखकाने अतिशय तटस्थपणे ह्या आठवणींचे खोदकाम आणि बांधकाम तितक्याच कुशलतेने केले आहे.

लेखक, चित्रकार राजू बाविस्कर यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील, चोपडा तालुक्यातील 'ठोक्यांचे लासूर' ह्या छोट्याशा खेड्यात मांग कुटुंबात झाला. सातपुडा डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या ह्या वस्तीच्या गावकुसाबाहेर मांग, महार, भिल्ल आणि पावरा अशा विविध जातींना सामावून घेणा-या झोपडपट्टीत लेखकाचे बालपण गेले. आईवडील गावकामगार, म्हणजे त्यांना ह्या गावाची वडिलोपार्जित वतनदारी मिळालेली. 'वतनदार' हा शब्द जरी ऐकायला वजनदार वाटत असला, तरी त्यांना घाणीतली सगळी कामे करावी लागत. नेमून दिलेल्या गल्लीत मेलेली कुत्री-मांजरं ओढत गावाबाहेर दूर नेऊन टाकायची. मेलेली जनावरे दूर गावाबाहेर न्यायची आणि ती फाडून चामडे चांभारांना विकायचे. नेमून दिलेल्या गल्लीत अमावास्या मागायची. दोन वेळची भाकरी मागायची. गावात एखाद्या घरी माणूस मेले असेल, तर तिथे जाऊन डफडे वाजवायचे. लोकांनी दिलेल्या भाकरीवर उपजीविका करायची. अशी ही वतनदारी!
आईवडलांनी अशी कामे करत मुलगी नबा, थोरला मुलगा कचरू आणि धाकटा राजू (बापू) ह्या लेकरांना श्रममूल्याचे संस्कार देत घडविले. आपल्या अंगावरचे दूध पिऊन लेकरं जगत नाहीत, अशी राजूच्या आईची समजूत होती. म्हणून शेजारची वडार बाई राजूला आपल्या अंगावर दूध पाजायची. लेखकाने तिचा उल्लेख 'दूधमाय' असा केला आहे. बहीण नबाचा सासरी खूप छळ होत होता, पण तिचा दोन्ही भावांमध्ये खूप जीव होता. राजूला ती लाडाने 'भु-या' म्हणत असे. शेवटच्या आजारात दवाखान्यात ती डोळ्यांत प्राण आणून भु-याची वाट पाहात होती. पण शेवटची भेट झालीच नाही.
लेखकाचा रंग्यामामा दरोडे टाकून खूप पैसे मिळवत असे. एके दिवशी रात्री तो खूप सारे नोटांचे बंडल घेऊन यांच्या झोपडीत आला. त्याने ते पैसे ठेवून घेण्याची लेखकाच्या आईवडलांना विनंती केली. तेवढे पैसे पाहून दोघेही घाबरले. दोघांनीही ते पैसे घ्याला नकार दिला. चुकीच्या कमाईबद्दल त्यांचे म्हणणे असायचे, 'गावातले भाकरीचे तुकडे मागून खाऊ, पण असलं काम करणार नाही. असल्या कामात हात काळे करण्यापेक्षा भुकेले मेलेलं बरं'.
आईवडलांनी हेच इमानदारीचे संस्कार आपल्या लेकरांवर केले होते.
'खंड्याबाप्पा' हे व्यक्तिचित्र वाचताना अण्णा भाऊ साठे यांच्या 'फकिरा'ची आठवण होते.
लेखकाची आई आपल्या दोन्ही मुलांना मांग समाजातील चो-यामा-या करणाऱ्या माणसांच्या गोष्टी सांगून शेवटी त्यांचे कसे हाल झाले, याचे दाखले देत असे. हे सांगण्यामागे आपली मुलं अशा चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत, हा तिचा उद्देश असे. खंड्या मांग हा त्यापैकीच एक होता. तो चो-या करून झोपडपट्टीतील गरीब व आजारी लोकांना मदत करत असे. त्याला शिक्षण घ्यायला मिळाले नसले, तरी त्याला शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्याविषयी लेखकाने लिहिले आहे, 'त्याचंही शिक्षणाचं दार माझ्यासारखंच गरिबीचं होतं. त्या दारातून बाहेर येताना गरिबी निश्चितच तुमचं पाऊल चुकवते. हालअपेष्टा, गरिबी हीच खंड्याबाप्पाला या मार्गाने घेऊन गेली असेल का? पण त्याचा बंड पुकारणारा मदतीचा हात नेहमी गरिबांच्या चेहर्‍यावरचं दु:ख पुसत जाणारा होता, हेही विसरता येत नाही'. (पृष्ठ ७१)
पन्नास वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील मांग समाजातील लोक ग्रहण काळात भिक्षा मागत. मागताना ते म्हणत, 'देताजी दान, सुटे चंद्रगिर्हान, दानपुन करा, मायची'. त्याविषयी लेखकाच्या आईची श्रद्धा अशी होती, की 'आपल्याला देवाचं वरदान हे ह्या समद्या गावचं. समद्या पिरथमीचं संकट आपण झेलतो. या पिरथमीवर गिरहान पडतं, तव्हा आपण ते मांगलं की समद्या बिचा-या लोकांचे संकट निघी जातं. कोनाच्याभी संकटामधी कामले आलं की तेवढं चांगलं -हातं'.
या प्रथेवर भाष्य करताना लेखकाने लिहिले आहे :
'या गरिबीला कंटाळलेली माणसं किती अफाट मनाचं दार मोकळं ठेवून नको त्या श्रद्धेवर आयुष्य निमूटपणे जगत होती. या अशिक्षित माणसांना जवळ काही नसतानाही खूप काही मिळाल्यासारखं वाटत असावं'. (पृष्ठ ७८)
लेखकाने 'सिकंदरचाचा'चे व्यक्तिचित्र फारच छान रेखाटले आहे. तडवी समाजातील सिकंदरचाचा पोहण्यात पटाईत होता. विहिरीच्या पाण्यात बुडालेली मोटार सहज काढून देत असे. गावासाठी आपला जीव धोक्यात घालून कोणतेही काम करत असे. कोणाच्याही घरात निघालेला साप सहज पकडत असे. पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरची मोटार हातोहात दुरुस्त करून लोकांची पाणीटंचाईची समस्या दूर करत असे. सांस्कृतिक कार्यक्रमातही हा सिकंदरचाचा आघाडीवर असे. सर्वांगाला भगवा शेंदूर फासून हनुमानाचे पात्र करत असे. गावातल्या बायाबापड्या ह्या हनुमानाला भक्तिभावाने ओवाळत. हा सिकंदरचाचा त्या दिवसांपासून सर्व गावाचा सेवक रक्षणकर्ता वाटायचा. त्याचा धर्म कुठला आणि हा तर अंगाला शेंदूर लावून हनुमान होतो, हा प्रश्न ना त्याच्या डोक्यात आला किंवा चुकून कोणत्याही गावच्या एखाद्या माणसाच्या डोक्यात आला. कोणी कुठंही असू द्या. तरी माणसासाठी माणूस काहीतरी देत असे'. (पृष्ठ ९१)
अशा परिस्थितीत लेखकाला प्रश्न पडतो, माणूसपण हरवण्याची सुरुवात कुठून झाली, काही समजलं नाही. लेखकाने पुढे लिहिले आहे : 'आज जेव्हा गावाला जातो, तेव्हा गावाची नजर एका वेगळ्याच कल्पनेने घराला, मंदिराला, मस्जिदीला रंग देण्याचं काम करते. आम्ही बघितलेला गावाच्या नजरेचा रंग फक्त माणुसकीचा होता. त्याला खरडायला सुरुवात कधी झाली, तेच कळलं नाही. आणि एका काल्पनिक रंग फासलेल्या जगात गाव विरघळून गेलं'. (पृष्ठ ९१)
चिरफाळलेल्या समकालीन समाजजीवनाविषयी लेखकाने व्यक्त केलेली ही खंत अस्वस्थ करणारी आहे.
ह्या मिरवणुकीसमोर लेखकाच्या वडलांचा डफड्याचा आवाज घुमत असे. त्याविषयी लेखकाने एका वाक्यात लिहिले आहे, 'डफड्याच्या आवाजाला किंमत नव्हती आणि त्यालाही'.
भिलाटीत शेजारी राहणारी भिल्ल समाजातील विमलामावशी लहानपणी राजूवर खूप जीव लावायची. लाडाने खाऊपिऊ घालायची. राजूला ती आईइतकीच जवळची वाटायची. ती सुंदर होती आणि तिची झोपडीही टापटीप होती. तिच्या राहणीमानावरून ती भिल्ल वाटायचीच नाही. तिने अंगणात लिंबाची दोन झाडं लावून वाढवली होती. तरुणपणी तिच्याकडे 'दाजी' नावाचा एक श्रीमंत माणूस यायचा. ह्या दोघांच्या संबंधांविषयी लेखकाने काहीच लिहिले नाही, पण ते वाचकांच्या लक्षात येते. ती आजारी पडली, तेव्हा दाजीचे तिच्याकडे येणेजाणे बंद झाले. विमलामावशीची झोपडी एकटी पडली. एके दिवशी ती बेपत्ता झाली. दाजीने तिचा शोध घेतला नाही. तकलादू मानवी नातेसंबंधांवर टोकदार भाष्य करताना लेखकाने लिहिले आहे : 'माणूस माणूसच असतो. तो बदलत असतो पावलापावलांनी. निसर्ग खूप प्रामाणिक. विमलामावशीने लावलेली लिंबाची दोन झाडं आजही आहेत. त्याच जागेवर मोठी झालेली. त्या झाडांत ना दाजी दिसतो, ना मी. फक्त विमलामावशी दिसते. त्या दोन झाडांच्या आतमध्ये कुठेतरी'. (पृष्ठ ९८)
ह्या वाक्यात लेखकाने माणसाचा कृतघ्नपणा आणि निसर्गाचा प्रामाणिकपणा अधोरेखित केला आहे.
राजूला कोणतेही शिक्षण-प्रशिक्षण न घेता, अगदी बालपणापासूनच चित्रकलेची आवड होती. ह्या आवडीबद्दल लेखकाने लिहिले आहे : 'मंदिर गाठले की, भाऊ त्याचा अभ्यास करत बसायचा. त्याच्या वह्यांवर काडीपेटीच्या काड्यांनी मी काळ्या रेषांनी काहीही चित्र काढत राहायचो. त्याच्या वह्या खराब झाल्या म्हणून सर त्याला रागवायचे आणि मला कधीकधी तर रिकामचोट वगैरे काहीमायी शिव्या देत बाप झोडायचा. या काळ्या रेषांचे चित्र त्यावेळी चित्र होते की नाही, हे ठाऊक नाही, पण जगण्याचे ठसे असणाऱ्या या बालपणाच्या काळ्या रेषा पुन्हा वर्तमानात चित्रात आल्या. अशा जगण्याची अनेक वलये स्वतःभोवती गुंडाळत रंग बाद करून रेषांची मांडणी अमूर्ताकडे झुकत गेली'.
'एका बाजूला माणसाची आध्यात्मिक ओढ, काहीतरी गूढ असल्याचे कुतूहल आणि दुस-या बाजूला जगण्यातले ताणतणाव यामधून कलाप्रकार तयार झाले' असे लेखकाला वाटते.
आपल्या चित्रकलेबद्दल लेखकाने म्हटले आहे, 'मी वेदनेची पिले कॅनव्हासवर मोकळी सोडतो, म्हणून ते वेदनेचेच चित्र होणार'. (पृष्ठ १०२)
लेखकाचे आयुष्य निसर्गाशी एकदम एकरूप झाले होते. त्या संदर्भात लेखकाने लिहिले आहे, 'माझं जगणं जेव्हा मी माझ्या आजूबाजूला निसर्गाशी जोडू पाहतो, तेव्हा मला आठवतो माझ्या आत न संपणारा निसर्ग, ज्याने आमच्या संपूर्ण भिलाटीला, त्या झोपड्यांच्या जमिनीसकट आम्हाला, लेकरासारखं कवेत घेऊन फिरवलं'.
आपल्या गरिबीविषयी आणि आईच्या संवेदनशीलतेविषयी लेखकाने लिहिले आहे, 'इतकी गरिबी आमच्या पाठीला गोचडीसारखी घट्ट चिकटलेली असताना आई मात्र त्या गरीब लोकांचा विचार करत होती'.
आपल्या शाश्वत भुकेबद्दल लेखकाने लिहिले आहे, 'होती ती फक्त पोटाची भूक. हा पोटाचा प्रश्न जेव्हा आतड्याच्या आत खड्डा निर्माण करतो, तेव्हा कितीही मोठा विद्वान समोर शाळेत तत्त्वज्ञानाचे अमृत पाजत असेल, तरीही ते शाश्वत वाटत नाही. गरिबीत पोटाचा प्रश्न नेहमीच खुंटीला बांधून ठेवलेल्या बैलासारखा असतो'. (पृष्ठ १२८)
ही इरसाल भूक लेखकाने आणि त्याच्या गणगोताने अनुभवली आहे.
लेखकाची आई अतिशय हिंमतबाज, धाडसी आणि संघर्षशील होती. ती कोणत्याही संकटाशी लीलया दोन हात करत असे. ती परिस्थितीसमोर कधीही शरणागती पत्करत नसे. उलट वडील अतिशय सरळमार्गी, भित्रे आणि पापभीरू होते. वडलांच्या जीवनसंघर्षाबद्दल लेखकाने फारच समर्पक शब्दांत लिहिले आहे : 'बाप गावात उन्माद करणाऱ्या गो-ह्याला आंड कुटून, त्याला ठिकाणावर आणून त्या शेतकऱ्याच्या ताब्यात त्याला बैल बनवून द्यायचा, पण त्याला गो-ह्यासारख्या काही वृत्तींना असं कुटता आलं नाही. कारण त्याच्या अंगातलं मांस दारिद्र्याने काढून घेतल्यासारखं झालं होतं. गावात आडदांड, माजलेल्या गो-ह्याला बाप पूर्ण बैल बनवून शेतकऱ्याच्या कामाला लावायचा. असं कसं म्हणता येईल, की बाप काहीच नव्हता. त्याच्यात काही तरी तं होतंच. पण हे गरिबीत त्यालाच दिसलं नसेल'. (पृष्ठ १२८ व १२९)
अशा प्रकारे लेखकाने आपल्या गरिबाऊ वडलांना त्यांच्या सामर्थ्यासह आणि त्यांच्या मर्यादांसह समजून घेतले आहे.
वतनदारीच्या नावाखाली पोळ्याच्या आदल्या दिवशी प्रत्येक घराला तोरण बांधण्याची जबाबदारी मांग समाजावर सोपविण्यात आली होती. वेशीवर गावतोरण बांधण्याची जबाबदारी असलेल्या माधू मांगाने तोरण न बांधल्यामुळे ग्रामपंचायतीने सर्व मांगांना गावात आठ दिवस भाकरी न मागण्याची शिक्षा दिली. त्या काळात लेखकाच्या कुटुंबाची जी उपासमार झाली, त्याबद्दल लेखकाने आलंकारिक शब्दांत लिहिले आहे, 'आमच्या पोटात भूक सापाच्या वेगाने फिरायची. आतड्यांना भाकरीची सवय कमी आणि पाण्याचीच सवय जास्त झाली होती. जेव्हा जेव्हा पोळा येतो, तेव्हा तेव्हा पोटात भूक सैरावैरा धावत सुटते, तिची आठवण करून द्यायला. माझ्यासाठी पोळा म्हणजे माझी लहान बहीण भुकेल्या पोटी गेल्याची एक ओळख आहे'. (पृष्ठ १६२)
ह्या पार्श्वभूमीवर, आपल्या जगण्याला अपरिहार्यपणे, जळवासारख्या चिकटलेल्या जीवघेण्या दारिद्र्याबद्दल लेखकाने स्वच्छपणे लिहिले आहे : 'दारिद्र्य आणि गरिबी ज्या घरात नांदतात, त्या घरातील माणसांना स्वाभिमान सोडून देऊन लाचारीच्या कुबड्या घेऊन आपल्या झोपडपट्टीत जगण्याचा तोल सांभाळण्याची कसरत करावी लागते. कुणी कितीही उपदेश केला, तरीही स्वाभिमानी नसणे आणि लाचार होणे ही फारशी चांगली गोष्ट नाही. गरिबीच्या पाठीवर नेहमीच कष्टाचे ओझे असल्याने तत्त्वाचे भारूड तिच्या कानी पडत नाही. चिंता नावाच्या साथीदाराबरोबर गरिबीची नेहमीच मैत्री असते. दारिद्र्य, गरिबी, चिंता या गोष्टी दूर करण्याचा रस्ता आधी पोटाला स्पर्श करूनच पुढे जातो'. (पृष्ठ १५२)
कुल्फीवाला कालूचाचा' हा काही लेखकाच्या नात्यातला नव्हे. तो पोटासाठी, दुसर्‍या गावावरून लेखकाच्या गावात कुल्फी विकण्यासाठी येत असे. अतिशय मायाळू असलेला कालूचाचा, गावात कुल्फी विकून झाल्यावर उरलेल्या कुल्फीचे तुकडे भिलाटीतल्या गरीब मुलांना मोफत देत असे. कधीकधी उधारीही देत असे. त्यामुळे लेखकाला आणि त्याच्या बालमित्रांना कालूचाचा हा देवदूत वाटत असे. लेखकाने त्या कालूचाचाचे व्यक्तिचित्र अतिशय आत्मीयतेने चितारले आहे. त्यात ते लिहितात : 'आम्हा लहान मुलांना कुठल्याही शिक्षणाच्या पुस्तकातली परीची किंवा सांगितल्याबरोबर हातात काहीतरी खाण्याचं काढून देणा-या देवाची गोष्ट माहीत नव्हती. पण हा देवासारखं त्या डब्यात हात घालून पोरांना कुल्फीचे तुकडे काढून द्यायचा'. (पृष्ठ १७२)
ज्या सत्रासेन घाटात कालूचाचावर चोरांनी हल्ला केला, तो घाट 'कालूचाचांचा घाट' आहे, असे लेखकाला वाटते.
गरिबीशी झुंज देत असताना लेखकाच्या वडलांना स्वतःचे बॅंड पथक सुरू करण्याची कल्पना सुचली. पण त्यासाठी लागणारे भांडवल त्यांच्याकडे नव्हते. म्हणून त्यांनी गावचे वतन आठशे रुपयांत गहाण ठेवून सातशे रुपयांत बॅंडचे जुने साहित्य विकत घेतले. खरेतर वडिलोपार्जित वतन गहाण ठेवणे ही मांग समाजात नामुष्कीची गोष्ट होती, पण हा निर्णय घेताना वडलांच्या पाठीशी आई खंबीरपणे उभी राहिली होती. कारण पतीच्या स्वप्नांसाठी ती सदैव झटत होती. आई शब्दांची पक्की होती, तर बाप ध्यासाचा पक्का होता. त्या दोघांनी दारिद्र्याचे पंख लावून बॅंड विकत घेण्याची झेप घेतली होती. ह्या घटनेबद्दल लेखकाने अभिमानाने लिहिले आहे : 'गाव गहाण ठेवून बॅंड विकत घेण्याची गोष्ट नेहमी एखादी कंपनी विकत घेण्यापेक्षा जास्त महत्त्वाची वाटली'. (पृष्ठ २१४)
प्रतिकूल परिस्थितीमुळे एव्हाना राजू शाळाबाह्य विद्यार्थी ठरला होता. दुसरीनंतर शिक्षण सोडून तो वडलांच्या बॅंडमध्ये ट्रंपेट वाजवत होता. राजूला झिंग्याकाकाने ट्रंपेट वाजवायला शिकविले. झिंग्याकाका हा एक नामांकित ट्रंपेटवादक होता. राजूने झिंग्याकाकाच्या मार्गदर्शनाखाली ट्रंपेटचा इतका सराव केला, की त्याच्या ओठांतून रक्त येऊ लागले. ट्रंपेटचा आवाज येणाऱ्या समोरच्या गोल भागातून कधीकधी थेंब थेंब रक्त पडायचं. वाजवताना त्याला माऊथपीस ओठांना लावूच नये, इतका त्रास व्हायचा. हळूहळू त्याच्या दोन्ही ओठांवर कोड फुटल्यासारखे पांढरे डाग दिसायला लागले. हे ओठांवरचे पांढरे डाग म्हणजे तोंडाचा चांगला कारागीर असणारी पुरस्काराची खूण आता त्याच्या ओठांवर दिसत होती. राजू खूपच नाद भरल्यासारखा ट्रंपेट वाजवायचा. त्यामुळे त्याच्या नाकातोंडातून रक्त पडायला लागले. त्याबद्दल नातेवाईक राजूच्या आईवडलांना दोष देत असत. ही किंमत मोजल्यानंतर 'तालुक्यातील एक उत्तम ट्रंपेटवादक' असा राजूचा लौकिक झाला होता.
राजू अधूनमधून ट्रंपेटवादन आणि अधूनमधून शाळा करत असे. आपल्या ह्या कष्टप्रद वाटचालीबद्दल लेखकाने लिहिले आहे : 'कष्टाला इमानदारी चिकटलेली असेल, तर ती यशाच्या दिशेने तुमच्या प्रगतीच्या पावलांना बळ देते. याच इमानदारीचं बळ बापाला मिळालं होतं. ते हळूहळू आमच्या पावलांतही आलं'. (पृष्ठ २६६)
लेखकाच्या लासूर ह्या गावात मध्यवर्ती ठिकाणी अलमगीर नावाच्या माणसाची सुंदर पानटपरी होती. अलमगीर हा अतिशय चोखंदळ असा कलारसिक होता. त्याच्या पानटपरीवर नेहमी हिंदी चित्रपटातली नवीन गाणी वाजायची. अलमगीर ह्या पानटपरीवर दर्शनी भागात, चित्रकारांनी काढलेली आकर्षक चित्र लावत असे. ही टपरी म्हणजे चित्राला प्रसिद्धी देणारी ह्या गावातली महत्त्वाची जागा होती. ह्या पानटपरीवर लेखकाच्या, विजय नावाच्या मित्राची चित्र झळकली होती. येणारा-जाणारा प्रत्येक माणूस तिथे थांबून गाणी ऐकत असे आणि चित्र पाहात असे. चित्राचे कौतुक करत असे. त्यामुळे लेखकाला वाटायचे, की एकदा ह्या अलमगीरच्या गॅलरीत आपले चित्र झळकले पाहिजे. आठवीच्या वर्गात शिकत असताना राजूने स्मिता पाटील यांचे ब्लॅक अँड व्हाईट चित्र काढले होते. दिवाळीच्या सुमारास राजूचे ते चित्र अलमगीरच्या गॅलरीत झळकले. पुढे राजू बाविस्कर यांचे जहांगीर आर्ट गॅलरीत तीन वेळा शो झाले, तरी लेखक अलमगीरची गॅलरी विसरू शकत नाही, कारण अलमगीरची पानटपरी ही माझी पहिली आर्ट गॅलरी होती, असे तो म्हणतो.
लेखक राजू बाविस्कर, त्यांचे वडील आणि भाऊ, असे सगळ्यांनी मिळून आपले बॅंडपथक अतिशय अद्ययावत केले होते. कारण त्यांना आपला बॅंड नंबर एक करायचा होता. इतर बॅंडपथकांशी स्पर्धा करायला त्यांना आवडत असे. नांदेड ह्या गावी होणाऱ्या एका मोठ्या लग्नसमारंभात नवरदेवाकडून एक नामांकित बॅंडपथक येणार होते. त्या लग्नात नवरीकडून वाजविण्याची लेखकाच्या बॅंडपथकाला सुपारी मिळाली होती. स्पर्धेत उतरायचे म्हणून लेखकाचे बॅंडपथक उत्सुक होते. त्यांनी सगळी तयारी केली होती, पण ऐनवेळी उलटेच घडले. शेवंतीच्या वेळी बुलेट पाहिजे म्हणून नवरदेव रुसून बसला. ही बातमी नवरीला समजली. नवरीमुलीने डोळ्यांत एक अश्रूही न आणता सगळ्यांसमोर सांगितले, 'नवरदेवाकडच्या पाहुण्यांना परत पाठवा. मला अशा लोभी मुलाशी लग्न करायचे नाही. मला अशा पद्धतीने शिकलेली माणसं नको. मुलीलाही काही किंमत असते, हे त्यांना समजू द्या. आपल्याकडे आत्यांचा मुलगा आपल्या घरी घरकाम करतो. त्याला बोलवा. त्याच्याशी माझे लग्न लावून द्या'.
मुलीच्या वडलांना हिंमत देत, त्या हिंमतबाज नवरीचे तिच्या आत्याच्या मुलासोबत लग्न लावण्यात आले. ह्या नाट्यमय प्रसंगाविषयी लेखकाने अतिशय स्वागतशीलतेने लिहिले आहे : 'आपण इथे बॅंडची स्पर्धा डोक्यात घेऊन आलो होतो. मात्र खरी जीवनाची स्पर्धा वेगळीच होती. या मुलीचं धाडस, संघर्ष आणि शिक्षणामुळे आलेल्या परिवर्तनवादी विचाराने पुरुषांना आव्हान दिल्यासारखं झालं होतं.
मलाही आठवत राहील, मी एका मावलीच्या धाडसाला बॅंड वाजवून सलामी दिली होती'.
(पृष्ठ ३४२)
लेखकाच्या अशा चित्रदर्शी वर्णनशैलीमुळे, एखाद्या चित्रपटासारखा हा प्रसंग वाचकाच्या नजरेसमोरून जिवंत होऊन सरकत जातो. लेखकाच्या कुंचल्याइतकीच त्याची लेखणीही प्रत्ययकारी आहे, याची खातरी पटते.
याच काळात लेखकाने शाळेला दांडी मारून पंधरा दिवस तमाशात ट्रंपेट वाजविण्याचे काम केले. त्याबद्दल त्याला आईच्या शिव्या खावे लागले होते. राजू दहावीत शिकत असताना त्याचा थोरला भाऊ कचरू बी. ए. बी. एड्. होऊन गावातील शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला लागला. गावात बॅंड वाजवणारा मांगाचा मुलगा शिकवायला लागला, तर मुलं त्याचं ऐकतील का, असा प्रश्न एका संचालकाने उपस्थित केला. त्यावर गांधीवादी विचाराच्या रामदास बापू आणि माधवराव दादा यांनी केलेला युक्तिवाद फारच जबरदस्त आहे! ते म्हणाले, 'अरे, याला नोकरी दिली, तर गरिबाचं एक कुटुंब सुधारून जाईल. भिल्लांच्या, मांगा-महाराच्या पोरांना वाटेल, की आपणही बाविस्कर सरांसारखं शिक्षण शिकावं'. (पृष्ठ ३५९)
हा युक्तिवाद तंतोतंत लागू पडला आणि कचरू बाविस्कर यांना शिक्षकाची नोकरी मिळाली.
अशा प्रकारे परिस्थितीशी झटझोंबी करत, अनेक दिवस शाळाबाह्य असलेला राजू दहावी उत्तीर्ण झाला. काही दिवस जळगावला रवी पेंटरकडे राहून साईन बोर्ड रंगविण्याचे काम केले.
भावाला नोकरी लागल्यामुळे मांग समाजात लेखकाच्या कुटुंबाला मान मिळू लागला. अज्ञानाच्या वाटेतून बाहेर निघण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे, हे आता लेखकाला पटले होते. मागून भाकरी खाण्याच्या सवयीमुळे मांगवाड्यातला शिक्षणाचा अवयव निकामी झाला असेल का? शिक्षणाच्या वाटेने जाणाऱ्या आत्मसन्मानाच्या चळवळीमागे आमची पावलं का पडली नसतील? सन्मानाचा, आत्मसन्मानाचा मुख्य लढा मांगवाड्यात नीट उभा का राहिला नाही? (पृष्ठ ४०६)
असे काही प्रश्न लेखकाला सतावतात.
पुढे लेखकालाही शिक्षकाची नोकरी मिळाली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा मान आणखी दुपटीने वाढला. लेखकाने नोकरी लागल्यावरही काही दिवस बॅंडमध्ये वाजवण्याचे काम केले. लग्नात बॅंड वाजवताना लेखकाने जे पाहिले, ते चित्र अस्वस्थ करणारे आहे. मांग समाजातील आपल्या मायाबहिणी आजही लग्नघरी भांडी घासून मागून खातात. हे चित्र आजही फारसे बदलले नाही. हे दृश्य पाहताना लेखकाच्या अंतःकरणाला यातना होतात. माझ्यासारखे जे शिकून बाहेर पडले, ते सुटले. बाकी जे आहेत, ते तिथेच आहेत. याची लेखकाला तीव्रतेने जाणीव होते. थोरल्या भावाचं बोट धरून आपण ह्या प्रकाशाच्या वाटेवर चालायला शिकलो, याबद्दल लेखकाने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
काळ्यानिळ्या रेषा' ही अहोरात्र जीवनसंघर्ष करणाऱ्या मांग समाजातील एका कष्टाळू कुटुंबाची आनंदपर्यवसायी गोष्ट आहे. सुरुवातीच्या काळात रंग आणि रेषांच्या माध्यमातून स्वतःला अभिव्यक्त करणाऱ्या राजू बाविस्कर यांनी 'काळ्यानिळ्या रेषा' ह्या पुस्तकात स्वतःला शब्दांच्या माध्यमातून अभिव्यक्त केले आहे. यात कुठेही आपण लेखक असल्याचा आवेश किंवा अभिनिवेश नाही. लेखकाची भाषाशैली अतिशय ओघवती आहे आणि कथन अतिशय प्रांजळ आहे. लेखकाने रंगवलेली प्रसंगचित्रणे आणि निसर्गचित्रणे अतिशय प्रत्ययकारी उतरली आहेत. नायकाचे निवेदन प्रमाण मराठी भाषेत असले, तरी पात्रांचे संवाद अहिराणी बोलीतील आहेत. त्यामुळे ह्या निवेदनात आणि संवादातही एक प्रकारचा रसरशीतपणा आहे. जे जगले, भोगले तेच त्यांनी शब्दांत मांडले आहे. आपण जे दाहक जीवन भोगले, त्याची रंजक गोष्ट सांगून उर्वरित समाजाची सहानुभूती मिळवावी, हा काही लेखकाचा हेतू नाही. किंवा ज्या समाजाने आपल्यासमोर जगण्याचे हे वाईट वाढण वाढून ठेवले, त्याबद्दल कोणावर तरी दोषारोप करावा, कोणावर तरी आगपाखड करावी, असाही लेखकाचा हेतू नाही.
ठसठशीत व्यक्तिचित्रे :
लेखकाने रंगवलेले लेखकाचे जीवननिष्ठ आईवडील, शिक्षक झालेला थोरला भाऊ कचरू, सावत्र आई रूपामाय, राजूला अंगावर पाजणारी वडार समाजातील दूधमाय, वेडसर कमली, राजूला 'भु-या' म्हणून हाक मारणारी थोरली बहीण नबा, मंजुळ पावा वाजवणारा धुडक्या, दरोडे टाकून मिळालेला पैसा गोरगरिबांना वाटणारा रंगूभाई, शिक्षणाचे महत्त्व जाणणारा बंडखोर खंड्याबाप्पा, गावासाठी जीव धोक्यात घालणारा सुसंस्कृत सिकंदरचाचा, राजूचे लाड करणारी विमलामावशी, झाडूंच्या खरेदी - विक्रीचा व्यवसाय करणारी धुपी, कुल्फीवाला प्रेमळ कालूचाचा, लोकांच्या श्रद्धेचा फायदा उठवणारा शिवाभगत, गरिबीमुळे भिलाटीत राहायला आलेली नितांतसुंदर हिरा सिनकर, राजूला ट्रंपेट शिकवणारा झिंग्याकाका, चिडून शाळेचे बॅंड साहित्य विहिरीत फेकून देणारा आत्ममग्न चिल्या, अंत्ययात्रेत उधळलेली नाणी वेचताना बोटे गमावलेला तीन बोट्या, स्मशानातलं सोनं शोधणारा जाडा रम्या, मिस्तरीकाम करणारे जसूकाकू, बॅंड पथकातील मुलांचे मनोरंजन करणारा इव-या, बॅंड पथकाची बॅटरी डोक्यावर वाहणारा मल्या, लेखकाचा मावसभाऊ माधूआप्पा, पानटपरीवाला कलारसिक अलमगीर, बेभरवशाचा बळ्या, चित्रकलेतील राजूचा गुरू रवी पेंटर ही सगळीच व्यक्तिचित्रे अतिशय ठसठशीत आहेत. पुस्तक वाचून संपले, तरी ही पात्रे आपल्या नजरेसमोरून दूर जात नाहीत.
लेखकाने जशी आपल्या कुंचल्यातून, कोणताच सामाजिक चेहरा नसलेल्या माणसांची चित्रं रंगवली आहेत, तशीच हीसुद्धा चेहरा नसलेल्या उपेक्षित माणसांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. आपल्या चित्रांतील माणसांबद्दल लेखकाने नम्रपणे लिहिले आहे :
'या गरिबीत चेहरा नसलेली माणसं माझ्या आसपास नेहमीच होती. हीच चेहरा नसलेली माणसं माझे रंग ब्रश, कॅनव्हास यातून येतात. हीच माणसं माझ्या चित्रांची मुळाक्षरं आहेत'. (पृष्ठ २८७)
लेखकाच्या चित्रांची मुळाक्षरं असलेली, ही चेहरा नसलेली उपेक्षित आणि वंचित माणसं 'काळ्यानिळ्या रेषां'त साजिवंत झाली आहेत.
अशिष्ट शब्द / शिव्या, म्हणी / लोकोक्ती :
ह्या स्वकथनातील पात्रांच्या तोंडी कष्टकरी वर्गाच्या जगण्याचा अविभाज्य भाग असलेल्या शिव्या किंवा अशिष्ट शब्द अगदी सहजतेने येतात. ग्रामीण माणसाला त्याबद्दल काहीच गैर वाटत नाही. उदाहरणार्थ,
'मल्हे न तुले, घाल कुत-याले'. (पृष्ठ १३३)
'बायकोची मी झऊ, काय सांगे भौ येल्हे'. (पृष्ठ १४१)
'त्या गांडचाट्याले काय दयामाया हे की नी?' (पृष्ठ १४२)
'रांडनानी पाडी टाकं पाणी. थांब छिनालना मीभी तुन्हा हातले धक्का मारमू'. (पृष्ठ १६४)
'तोंड करे बाता नी गांड खाये लाता'. (पृष्ठ ३०९)
अशा लोकोक्तींतून ग्रामजीवनाचे दर्शन घडते.
बहुजनांच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा :
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अगदीच पुसट असते. श्रद्धेचा अतिरेक झाला, की तिथे अंधश्रद्धा डोकवायला लागते.
'गरिबीला कुठंतरी निराकार आधार असतो. तोच त्याला सांभाळणारा असतो'. (पृष्ठ १२३)
ही लेखकाच्या मनातली श्रद्धा आहे. ही श्रद्धाच गरीब माणसाला जगण्यासाठी बळ पुरवत असते.
उच्च वर्गातील एक आई लेखकाच्या आईला म्हणते, 'अनु, बरं झायंवं माय. सुभ कामना येळले उनी तू मना दार मां. मांगीन मावशीना पाय पडीलेवं, पोरी'. (पृष्ठ १८१)
ग्रामीण भागात शुभप्रसंगी मांगीणीचे तोंड पाहणे हे शुभ मानले जाते, ही जनमानसातील एक श्रद्धाच आहे. तिचा उल्लेख इथे आला आहे.
लेखक मात्र श्रद्धा आणि अंधश्रद्धांच्या बाबतीत नेहमीच सजग आहे, सावध आहे. 'शिवाभगत' ह्या व्यक्तिचित्रात लेखकाने लिहिले आहे :
'गरिबीत जगणाऱ्या माणसांना चुलीतली राख श्रद्धेने अंगाला लावून अंधश्रद्धेच्या दाराशी मरणाची वाट पाहणं या पलीकडे कोणतंच नशीब वाट्याला येत नाही'. (पृष्ठ १८३)
लेखकाने ह्या संपूर्ण लेखनात पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचीच पाठराखण केली आहे.
स्पृश्य समाजातील एका बाईला कुष्ठरोग झाल्यावर नातेवाईकांनी तिला अस्पृश्य ठरवून भिलाटीत आणून टाकून दिले होते. स्पर्शातून कुष्ठरोग होतो, ह्या अंधश्रद्धेवर टोकदार भाष्य करताना लेखकाने लिहिले आहे :
'या कुष्ठरोगाची चुकीची समज सर्वच गावात त्या वेळी माणसांना एकटं सोडून मारून टाकणारी होती'. (पृष्ठ २००)
ह्या वाक्यात लेखकाने माणसाला माणसापासून तोडणा-या अमानवी प्रवृत्तीचा निषेध नोंदविला आहे.
अज्ञान आणि अंधश्रद्धेत बुडालेल्या आपल्या गोतावळ्याविषयी लेखकाने वेळोवेळी भाष्य केले आहे.
'भगत आणि जादूटोण्याच्या आहारी जाऊन भिलाटी मात्र पार बुडाल्यासारखी होती'. (पृष्ठ २८६) हे लेखकाचे निरीक्षण वस्तुस्थितीचे निदर्शक आहे.
जीवनविषयक सकारात्मकता :
ह्या सबंध लेखनात कुठेही, कोणाविषयी कटुता व्यक्त झालेली नाही. राजू बाविस्कर यांच्या जगण्या-वागण्यात, जीवनविषयक चिंतनात आणि लेखनात कमालीची सकारात्मकता आहे.
लेखकाने कृतज्ञता हे मूल्य अतिशय कटाक्षाने सांभाळले आहे. त्यांनी वेळोवेळी आईवडलांविषयी आणि भावाबहिणीविषयी तर कृतज्ञता व्यक्त केली आहेच, शिवाय ज्यांनी ज्यांनी आयुष्याच्या वाटचालीत जे काही योगदान दिले, त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. अंगावर दूध पाजणारी वडार समाजातील दूधमाय, लाडाने खाऊपिऊ घालणारी विमलामावशी, भिलाटीला आसरा देणारे गावकरी, कुल्फीवाला कालूचाचा, ट्रंपेट शिकवणारा झिंग्याकाका, चांगल्या चित्रांची ओळख करून देणारा मित्र चट्टा, सिनेमा दाखवणारा गुणग्राहक मावसभाऊ माधूअप्पा, पानटपरीवर चित्र प्रदर्शित करणारा अलमगीर, चित्रकलेची दृष्टी देणारा रवि पेंटर इ. सगळ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे, तर खंड्या कुत्र्याविषयीसुद्धा कृतज्ञता व्यक्त केली आहे. कृतज्ञता हे मूल्य दुर्मीळ होत चाललेल्या ह्या कालखंडात लेखकाने व्यक्त केलेली ही कृतज्ञता लाखमोलाची ठरते.
स्त्रीत्वाचा आदर :
लेखकाच्या मनात आपल्या आईविषयी नितांत आदर आहे आणि ते स्वाभाविकच आहे. शिवाय त्यांच्या आयुष्यात आलेल्या सर्वच स्त्रियांविषयी ह्या पुस्तकाच्या पानोपानी नितांत आदर व्यक्त झालेला आहे. कोणत्याही स्त्रीविषयी कुठेही चुकूनसुद्धा एकही अनुदार शब्द आलेला नाही.
विमलामावशीविषयी लिहिले आहे :
'लहान मुलांवर प्रेम करणा-या बायांच्या मनाची व्याप्ती भव्य झाडासारखी अफाट असते. त्यांचं मन वडाच्या झाडाला लागलेल्या पारंब्यांइतकंच मोकळं असतं, लहान मुलांना खेळवत ठेवणारं' (पृष्ठ ९२)
कुटुंबासाठी खस्ता खाणा-या श्रममूर्ती स्त्रियांच्या समर्पणाचा लेखकाने वेळोवेळी गौरव केला आहे. आपल्या मावसभावाची पत्नी सिंधूवहिनी यांच्याबद्दल लेखकाने अतिशय आदरपूर्वक लिहिले आहे :
'खरं तर बाई ह्या नावातच एक विस्तव असतो, कष्टाने तावूनसुलाखून निघणारा आणि घराला सतत उजेड देणारा. कष्टाने सजलेल्या बाया मला नेहमीच आनंद वाटताना दिसल्यात'. (पृ. २९५)
आपल्या मावशीबद्दल लेखकाने लिहिले आहे :
'आई नावाची गोष्ट बायांमध्ये उपजतच असते. ती जातीवर आणि धर्मावर अवलंबून नाही, इतकंच मी म्हणेन' (पृष्ठ ३७१)
ह्या शब्दांत लेखकाने प्रत्येक बाईत दडलेल्या मायाळू आईला विनम्र अभिवादन केले आहे.
स्त्रियांच्या दु:खाविषयी लेखक अतिशय संवेदनशील आहे. एकूण स्त्रीजातीच्या शोषणाविषयी लेखकाने लिहिले आहे 
'बाईने जेव्हा जेव्हा दु:खाला प्रश्न विचारले असतील, तेव्हा तेव्हा दु:खालाही सापडलं नाही तिचं उत्तर. दु:खालाच उत्तर न सापडलेल्या या मावल्यांचं मी काय चित्र काढू?' (पृष्ठ २०४)
नायकाने आयुष्याच्या पटावर जाणता-अजाणता ज्या काही काळ्यानिळ्या रेषा ओढल्या, त्या रेषांनीच त्याचे कलेच्या आणि साहित्याच्या क्षेत्रातील स्थान निश्चित केले, त्यामुळे पुस्तकाचे 'काळ्यानिळ्या रेषा' हे शीर्षक अतिशय समर्पक आणि अर्थपूर्ण आहे. प्रफुल्ल शिलेदार यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे स्वकथन म्हणजे महत्त्वाचा सामाजिक दस्तावेज आहे. विकास मलारा यांच्या मुखपृष्ठामुळे ह्या कलाकृतीची उंची आणखी वाढली आहे.
'काळ्यानिळ्या रेषा' ह्या स्वकथनाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्यामुळे वंचित जनसमुदायातील, चेहरा नसलेल्या सामान्यातिसामान्य माणसाचा सन्मान झाला आहे, असे मला वाटते.
'काळ्यानिळ्या रेषा' (स्वकथन)
लेखक : राजू बाविस्कर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : विकास मलारा
पृष्ठे ४०७ किंमत रु. ५५०


पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत,
मथुरेश बंगला, क्र. १. १९. २२०,
राज मॉलच्या पाठीमागे,
आनंदनगरजवळ,
शाहूनगर, नांदेड ४३१ ६०२.
भ्र. ८८०६३८८५३५, ९४२२१७०६८९.
sureshsawant2011@yahoo
.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group