नांदेड दि. 29 मार्च : वीजबीलांच्या थकबाकी वसुलीसाठी रणरणत्या उन्हातही ग्राहकाभिमूख सेवा देत घरोघरी जावून राबविलेल्या हरघर दस्तक मोहिमेची फलश्रृती दिसून येत आहे. जिल्हयातील पाच गावांनी वीजबिलांची थकबाकी शुन्यावर आणली आहे. विहीत वेळेच्या आत गावे थकबाकीमुक्त झाल्यामुळे मथकबाकीमुक्त झालेल्या गावांना वीजसेवा देणाऱ्या जनमित्रांचे कौतूक मुख्य अभियंता श्री दत्तात्रय पडळकर यांनी केले आहे.
गावकरी ते राव ना करी हा वाक्यप्रचार तंतोतंत खरा करून दाखविण्याची किमया वडाची वाडी, दुधड, तलहारी, तलहारी तांडा आणि सेवादास तांडा येथील ग्रामस्थांनी करून दाखवली आहे. औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ मंगेश गोंदावले यांच्या संकल्पनेतून राबविण्या आलेल्या हरघर दस्तक या माहिमेअंतर्गत थकबाकीदार वीजग्राहकांच्या घरो-घरी जावून महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी थकबाकीमुक्त करण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.
महावितरणच्या सरसम शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या वडाची वाडी आणि दुधड या गावाचा वीजपुरवठा अखंडीत ठेवणारे जनमित्र श्री साईनाथ कल्याणकर यांनी ग्राहकाभिमूख दिलेल्या सेवेमुळेच आदीवासी बहूल असलेल्या वडाचीवाडी गावातील 48 वीजग्राहकांकडे असलेली 32 हजार 300 रूपयाची थकबाकी तसेच दुधड येथील 249 वीजग्राहकांनी 1 लाख 25 हजार 630 रूपयांची थकबाकी भरत संपुर्ण गाव थकबाकीमुक्त केले आहे. जनमित्र साईनाथ कल्याणकर यांनी वेळोवेळी वीजग्राहकांच्या हाकेला दिलेल्या प्रतिसादामुळेच गावे थकबाकीमुक्त झाल्याचे उद्गार दोन्ही गावातील ग्रामस्थांनी काढले आहेत. त्याचबरोबर इस्लापूर शाखा कार्यालयांतर्गत येणाऱ्या तलहारी, तलहारी तांडा आणि सेवादास तांडा येथील 42 वीजग्राहकांनी 51 हजार 215 रूपयांचे वीजबील भरत आपली गावे थकबाकीमुक्त केले आहेत. इस्लापूर शाखेतील ग्राहकप्रिय जनमित्र श्री राहूल वाठोरे यांनी फोन करताच हजर राहत दिलेल्या ग्राहकाभिमूख सेवेमुळे तसेच वीजबील भरले तरच आपल्याला अखंडीत वीजतसेवा मिळू शकते हा दिलेला विश्वासच गाव थकबाकीमुक्त होण्यासाठी सार्थ ठरला आहे. श्री वाठोरे यांच्या प्रयत्नामुळे शिवनी हे गावही थकबाकीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. पाच गावे थकबाकीमुक्त होण्याच्या दृष्टिने नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री सुधाकर जाधव, भोकर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री मोहन गोपुलवाड यांच्या निर्देशानुसार हिमायतनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री नागेश लोणे यांनी परिश्रम घेतले. नांदेड जिल्हयातील पाच गावे थकबाकीशुन्य झाल्यामुळे जनमित्रांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
*फोटो ओळ: संपुर्ण वीजबील भरत थकबाकीमुक्त झालेले वडाचीवाडी येथील ग्रामस्थ व जनमित्र साईनाथ कल्याणकर*

COMMENTS