मुंबई बंदरातील मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनला ३ मे २०२१ रोजी १०१ वर्षे पूर्ण होत असून, गेल्या वर्षी शंभर वर्षे पूर्ण झाली. परंतु जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा न करता ऑन लाईन द्वारे पदाधिकाऱ्यांची मिटिंग घेऊन छोट्या प्रमाणात शताब्दी महोत्सव साजरा केला होता . यावर्षी देखील कोरोनाचे दुसरी लाट आल्यामुळे परिस्थिती बिकट आहे, तरी सुद्धा यावर्षी ३ मे २०२१ रोजी सकाळी १०.३० ते १२.३० च्या दरम्यान मुंबई बंदरातील या ऐतिहासिक कामगार संघटनेचा १०१ वा वर्धापन दिन ज्येष्ठ कामगार नेते ऍड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय कामगार नेत्यांच्या प्रमुख उपस्थित ऑन लाईन द्वारे साजरा करण्यात येणार आहे.
मुंबई बंदरातील या ऐतिहासिक युनियनबद्दल थोडक्यात माहिती अशी की, भारतीय कामगार चळवळीचे पितामह कै. ना. म. जोशी यांच्या आशीर्वादाने एक थोर समाजसुधारक कै. एस. एच. झाबवला यांनी कै. एफ. जे. जिनवाला, कै. इ. एम. बहादूरजी या दोन सॉलिसिटर्सच्या सहकार्याने युनियनची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. वर्कशॉपमधील कसबी कामगार कै. सदानंद गडकर व मेकॅनिकल इंजिनिअरिंग सेक्शनमधील जहाजातून मालाची चढउतार करणारे क्रेन ड्रायव्हर्स व त्यांचे इतर सहकारी यांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे ३ मे १९२० रोजी बी. पी. टी. एम्प्लॉईज युनियन ( आताचे नाव मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन ) ची स्थापना करण्यात आली. स्थापनेनंतर ६ वर्षांनी म्हणजेच १९२६ साली ट्रेड युनियन ऍक्ट हा युनियन बनविण्याचा अधिकार देणारा कायदा अस्तित्वात आला. मात्र बंदर व गोदी कामगारांनी हा कायदा येण्यापूर्वीच संघटना बांधण्याची हिंमत केली. गोदी कामगारांनी अन्यायाविरुद्ध केलेल्या संघर्षातून निर्माण झालेल्या ऐतिहासिक लढाऊ कामगार संघटनेला ३ मे २०२१ रोजी १०१ वर्षे पूर्ण होत आहे.
भारतातील जुन्या युनियनपैकी टिकून राहिलेली ही एकमेव कामगार संघटना असावी. एखादी संघटना प्रदीर्घ काळ टिकविण्यासाठी कुशल नेतृत्व, निष्ठावंत कार्यकर्ते, संघटनांतर्गत लोकशाही आवश्यक असते. त्यानुसार या संघानेला एस. एच. झाबवला, एफ. जे. जिनवाला, जमनादास मेहता, ईश्वरभाई पटेल ( सरदार वल्लभभाई पटेल यांचे पुतणे) अशोक मेहता, स्वातंत्र्य सैनिक, मुंबईचे माजी महापौर व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल अशा दिग्गज कामगार नेत्यांनी या संघटनेचे नेतृत्व केले. आता या संघटनेचे अध्यक्ष ऍड. एस. के. शेट्ये असून जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज आहेत. डॉ. शांती पटेल यांनी कामगारांमधूनच निर्माण केलेले नेतृत्व आज यशस्वीपणे या संघटनेची धुरा सांभाळत आहे.
बंदर व गोदी कामगारांचा पगारवाढ व इतर मागण्यांसाठी १९४८ साली ४८ दिवसांचा सर्वात मोठा संप झाला होता. या संपात कै. जयप्रकाश नारायण यांच्या मध्यस्थीने महात्मा गांधीजी यांची भेट ठरली होती, परंतु ही भेट होऊ शकली नाही. केंद्रीय मुख्य श्रम आयुक्तांच्या मध्यस्थीने हा संप मागे घेण्यात आला. त्यानंतर १९५८ साली प्रमुख बंदरांमध्ये गोदी कामगारांचा आपल्या न्याय मागण्यांसाठी ११ दिवसाचा संप झाला. या संपात कामगार नेत्याबरोबर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मध्यस्थी केली व संप यशस्वी झाला. त्या काळात आणीबाणीला विरोध करणारी भारतातील ही एकमेव कामगार संघटना असावी, कामगार विरोधी आणीबाणीला विरोध केला म्हणून डॉ. शांती पटेल, ऍड. एस. के. शेट्ये यांच्या सहित २३ कामगार कार्यकर्त्यांना नाशिक जेलमध्ये अटक करण्यात आली होती. या संघटनेने नेहमीच पक्षाहीतापेक्षा कामगारहिताला जास्त महत्व दिले. या संघटनेमार्फत मुलुंड येथे शांती कॅम्पस हौसिंग सोसायटी, कंझुमर्स सोसायटी, पतपेढी, समाज प्रबोधनासाठी पोर्ट ट्रस्ट कामगार अंक, कौटुंबिक स्नेह संमेलन,विद्यार्थ्यांचा गुण गौरव, कामगार कलाकार, खेळाडू गुणगौरव, महिलांसाठी शिवणवर्ग, कामगारांच्या मुलांना प्रशिक्षण, गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत इत्यादी विविध विधायक कार्य युनियनच्यावतीने केली जातात. जहाज तोडणी उद्योगातील असंघटित कामगारांना संघटित करण्याचे मोठे कार्य मुंबई व अलंग येथे चालू आहे. गोदी कामगारांच्या कुशल नेतृत्वामुळे बंदर व गोदी कामगारांना चांगली पगारवाढ व पेन्शन मिळते. कोरोना काळात अत्यावश्यक सेवेत काम करणारे गोदी कामगार, हॉस्पिटलचे कर्मचारी व डॉक्टर जीवावर उदार होऊन काम करतात. त्यांच्या या कार्याला सलाम. कामगार हिताचे रक्षण व कर्तव्याची जबाबदारी हे युनियनचे कार्य यापुढेही अविरतपणे चालू राहील. सर्व गोदी कामगार, सभासद, कार्यकर्ते व हितचिंतकाना युनियनच्या १०१ व्या वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
मारुती विश्वासराव
प्रसिद्धिप्रमुख
मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन

COMMENTS