नांदेड: नांदेडच्या 'सिडको' वसाहतीतील नांदेड-वाघाळा शहर 'मनपा'च्या मातृसेवा आरोग्य केंद्रात पाच ते सहा दिवसांपासून कोविड लस उपलब्ध नाहीत. परिणामी, बहुसंख्य नागरिकांची गैरसोय होत आहे. संबंधित विभागाने कोविड लस त्वरित उपलब्ध करून द्यावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
'कोरोना' या महाभयानक साथीच्या रोगाने गत एक वर्षापासून जगभरासह भारतात थैमान मांडला आहे. परिणामी, नांदेड जिल्ह्यासह शहरातही मोठ्या प्रमाणात 'कोरोना' बाधित रूग्ण आढळून येत आहेत. कांही दिवसांपूर्वी कोरोनावर लस तयार झाली. प्रत्येक केंद्रावर जनतेने मोठ्या प्रमाणात या लसीचा पहिला डोस घेतला.त्याचवेळी, 'सिडको' वसाहतीतील
महापालिकेच्या मातृसेवा आरोग्य केंद्रात २२ मार्च २०२१ पासून ही लस देणे सुरू झाले. हजारो लोकांनी या लसीचा पहिला डोस घेतला.शिवाय, दुसरा डोस घेण्याची अनेक नागरिकांची तारीखही जवळपास आली आहे.
विशेष बाब म्हणजे, अनेक वयोवृद्ध ही लस घेण्यासाठी, तर पात्र नागरीक तसेच दुसरा डोस घेण्यासाठी नागरीक रोजच प्रस्तुत आरोग्य केंद्रात येत आहेत. मात्र, संबंधित आरोग्य अधिकारी व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांकडून येथील केंद्रात लस उपलब्ध नसल्याचे सांगितल्या जात आहे. एकीकडे राज्य शासनाकडून लस घेण्याविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्या जात आहे. मात्र, आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने सामान्य जनतेला अनेकदा चकरा माराव्या लागत आहेत. दुसरीकडे उपरोक्त लस घेण्याकरिता वारंवार आरोग्य केंद्राकडे येण्या-जाण्याने 'कोरोना'चा संसर्ग होण्याची भीती हजारो नागरिकांना वाटत आहे.संबंधित प्रशासन व आरोग्य विभागाने नांदेडच्या सिडको-हडको भागातील नागरिकांच्या आरोग्य तथा मृत्युशी खेळणे त्वरित बंद करावे. येत्या दोन दिवसात संबंधित प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून 'मनपा'च्या उपरोक्त मातृसेवा आरोग्य केंद्रात पुरेसे कोविड लस उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा गंभीर इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर 'संभाजी' ब्रिगेडचे नांदेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील व विधानसभा अध्यक्ष दीपक भरकड तसेच सिडको, नांदेड शहराध्यक्ष गजानन शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

COMMENTS