भारताच्या पाच राज्यांतील निवडणुकांचे नुकतेच निकाल लागले. ही निवडणूक नरेंद्र मोदी प्रणित भाजप व विरोधक यांत खेळली गेली. यात देशाच्या पंतप्रधानांसह सर्वच प्रमुख पक्षांतील विरोधक ताकदीने उतरले. देशातील कोरोनाबाधित जनतेच्या जीवाशी क्रूर खेळ खेळण्यात आला. कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आणि अखेरीस कोरोनाचाच विजय झाला.
या निवडणुकांत तोंडाला मास्क लावा, सुरक्षित अंतर पाळा, हात धुवा या त्रिसूत्रीचा तर केव्हाच फज्जा उडालेला दिसला. यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते यांनी या त्रिसूत्रीचे पालन करा, असं साधं सांगण्याचा नैतिक अधिकारही गमावलेला आहे. महाराष्ट्रातील पंढरपुरात तर मोठी कमालच झाली.
वारीला परवानगी नाकारली आणि निवडणुकांतील तमाशाला परवानगी दिली गेली. आज याच पंढरपुरात कोरोनाच्या रुग्णाला साधा बेडही मिळत नाही. जी स्थिती पंढरपुरातील तीच महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील. जनतेला आपत्कालीन स्थितीत लस, बेड, औषधे मिळत नाही. अशा परिस्थितीत जनतेने कर भरायचा कशाला? पालिकेच्या एफडी, भ्रष्ट राजकारणी व उद्योगपतींचा काळा पैसे काय कामाचा?
देशांतील काही राज्यांत लॉकडाऊन आहे, हळूहळू सर्व देशभरात तो लावण्यात येईल. हा लॉकडाऊन कधी संपेल याचा भरवसा नाही. या भीषण संकटात अजून किती जणांचे बळी जातील, याची शाश्वती नाही. अशा भयावह परिस्थितीतही या निवडणूका लादल्या गेल्या. सर्वच पक्षांचे नालायक राजकारणी प्रचारात उतरले. त्यांच्या प्रचारसभांनाही मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. देशभरातील जनतेने यांचा निकालही चवीने पहिला.
कोरोना पसरवायला हे गेंड्याच्या कातडीचे राजकारणी जितके जबाबदार तितकीच या प्रचारात भाग घेणारे मतदार. यातूनच मूळ कोरोनाच्या प्रश्नाला तात्पुरती बगल दिली गेली. जनतेला यावर तावातावाने चर्चा करायला भाग पाडले गेले. अशीच चर्चा मागील वर्षी 'मरकज' प्रकरणावर घडवून आणली.
आज या प्रकरणाला वर्ष उलटले तरीही ठोस कारवाई शून्यच. त्यातच आगामी निवडणुका डोळ्यावर ठेवून कुंभमेळ्यालाही परवानगी देण्यात आली. (वास्तविक कुंभमेळा प्रतीकात्मकरित्या साजरा करण्यात अडचण नव्हती, पण आगामी निवडणुका या मोदींना महत्वाच्या वाटल्या.)
या दोन्ही प्रकरणात कोरोनाचा भयानक प्रसार झाला. मात्र या प्रकरणांनाही हिंदू मुस्लिम असा जातीय रंग देण्यात राजकारणी व त्यांची बटीक बनून राहिलेली मीडियाही यशस्वी झाली. लोकांनाही सोशल मीडियावर फावला वेळ मिळतो, अशा वेळी 'मरकज', 'कुंभमेळा' हे विषय छान पेट घेतात. शेजारच्या माणसाला कोरोना झाल्यावर मदत करायला याना वेळ नसतो, मात्र याच वेळी त्यांना मोदींची भलावण करायला तर काहींना त्यांचा विरोध करायला निवांत वेळ असतो.
असो, आता वेळ अत्यंत महत्वाची आहे. समाजाला गरज आहे, ती कोरोनाला हरवायची. समाजहितासाठी जिहाद किंवा धर्मयुद्ध पुकारायची. माजलेल्या मस्तवाल राजकारण्यांना लोळवायची. यानिमित्ताने आज आठवण येते ती हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची. महाराजांच्या काळी या असल्या जुलमी पुढाऱ्यांचे हात पाय कापून 'चौरंग' करण्याची शिक्षा असे. या क्रूरकर्मी राजकारणी लोकांचे अमानवी कृत्य बघून महाराजांनी तर फर्मानच सोडले असते की 'चौरंग' करा या हरामखोरांचा!
- *उन्मेष पद्माकर गुजराथी*
twitter.com/unmeshgujarathi
https://www.facebook.com/unmesh.gujarathi.1/
९३२२ ७५५०९८

COMMENTS