राज्य महामार्गात गेलेल्या जमिनीच्या मावेजा साठी शेतकऱ्याकडून रस्ता खोदण्याचा प्रयत्न


केज प्रतिनिधी:- केज तालुक्यातील सुकळी व गोटेगाव येथील शेतकऱ्यांच्या राज्य महामार्गात गेलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा म्हणून संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता खोदून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. 

या बाबतची माहिती अशी की कळंब अंबाजोगाई या राज्य महामार्गावर पूर्वी सुकळी ते गोटेगाव हा जुना रस्ता होता. परंतु धनेगाव प्रकल्पाच्या बॅक वॉटर मुळे हा जुना रस्ता पाण्याखाली गेला. त्यामुळे सुकळी ते गोटेगाव हा सुमारे अडीच ते तीन किमी लांबीचा नवीन रस्ता तयार करीत करण्यात आला. परंतु अद्यापही या नवीन रस्त्याच्याअधिग्रहीत जमिनी बाबत शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारे नोटीस दिली गेलेली नाही किंवा सदर जमिनीचा मावेजा त्यांना मिळालेला नाही. तसेच रस्त्यात गेलेल्या जमिनीचे रेकॉर्ड हे संबंधित शेतकऱ्यांच्या नावे असून महसुली अभिलेख्यातून त्यांचे क्षेत्र कमी झालेले नाही. सदर रस्त्याचा मावेजा मिळण्यासाठी दिनांक २८ डिसेंबर रोजी येथील संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता खोदून वाहतूक बंद करण्याचा प्रयत्न केला. युसुफ वडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळावर जाऊन आंदोलक शेतकरी यांना समज दिली. या आंदोलनात अमर गायकवाड, तुकाराम पवार, अजित रांजणकर यांच्यासह रस्त्यात जमिनी गेलेले शेतकरी सहभागी झाले होते.

टिप्पण्या