नांदेड, १- स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि सातत्य अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला अपयश आले तरी खचून न जा...
नांदेड, १- स्पर्धा परीक्षेत यश संपादन करण्यासाठी योग्य नियोजन, नियमित अभ्यास आणि सातत्य अत्यंत आवश्यक आहे. सुरुवातीला अपयश आले तरी खचून न जाता नव्या उमेदीने अभ्यासाला सुरुवात करावी. नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, असे प्रतिपादन साहित्यिक डॉ. राम वाघमारे यांनी केले.
नवीन नांदेड येथील लातूर फाटा-सिडको रोड परिसरातील सह्याद्री अभ्यासिकेच्या वतीने सीईटी परीक्षेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत सहशिक्षक म्हणून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा सोमवार ३१ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. वाघमारे बोलत होते.ते म्हणाले, सध्याचे युग स्पर्धेचे असून स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची गरज आहे. एखाद्या प्रयत्नात अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. आपल्या चुका ओळखून त्यावर मात करत अधिक जोमाने अभ्यास करावा. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी पर्यायी बी प्लॅन देखील तयार ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी जिल्हा परिषदेत सहशिक्षक म्हणून निवड झालेल्या आश्विनी गलांडे, संतोष भोसले आणि मंगेश सूरेवाड यांचा शाल, पुष्पहार व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचा अनुभव आणि अभ्यासाच्या प्रवासाबद्दल मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मिलिंद व्यवहारे, भालचंद्र जोंधळे, सह्याद्री अभ्यासिकेच्या प्रमुख मनीषा रोहित कंधारकर, व्यवस्थापक प्रमोद कांबळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS