जन्म देणारी आई ही भाग्याने मिळते; पण जन्मानंतरच्या आयुष्याला मायेची ऊब, ज्ञानाची शिदोरी, संस्कारांची श्रीमंती आणि जगण्याची नवी दृष्टी देणारा गुरू भेटणे, हे त्याहून मोठे भाग्य असते. माझ्या आयुष्यात अशाच प्रेमळ आणि मार्गदर्शक गुरू भेटल्या, त्या म्हणजे आदरणीय डॉ. मथुताई सावंत. माझ्या आयुष्यात मथुताईंचे स्थान असेच मातृत्वाची अनुभूती देणारे आहे. पीपल्स कॉलेजमधील विद्यार्थिजीवनात मला पुस्तकी ज्ञान तर मिळालेच, शिवाय मायेचा आधार मिळाला, जगण्याची उमेद मिळाली, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळाले आणि जीवनाचं सार्थक कसं करावं, याची शिकवण मिळाली. म्हणूनच त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला मराठी विषयात एम.फिल आणि पीएच.डी ह्या पदव्या सन्मानाने प्राप्त करता आल्या.
डॉ. मथुताई म्हणजे मायेची ऊब, ज्ञानाचा दीप आणि प्रेरणेचा अखंड झरा आहेत याची प्रचिती येत गेली. ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात तब्बल ४२ वर्षे अध्ययन-अध्यापनाचे कार्य करणाऱ्या मथुताई एका अर्थाने ज्ञानतपस्विनीच आहेत. अध्यापन हा त्यांच्यासाठी केवळ व्यवसाय नव्हे ; तर ते एक सामाजिक व नैतिक दायित्व आहे. खेड्यापाड्यांतून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला त्यांनी दिशा दिली. त्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला, त्यांना वाचनाची गोडी लावली, प्रश्न विचारण्याची सवय लावली आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकवले. त्यांच्यासाठी विद्यार्थी म्हणजे केवळ वर्गातील उपस्थिती क्रमांक नव्हता, तर तो घडवायचा एक जीव, उजळवायचे एक भविष्य आणि समाजासाठी तयार करायचा एक संवेदनशील नागरिक होता. म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांच्या मनात मथुताई ह्या प्रेमळ आई, ज्ञानवंत गुरू आणि उज्ज्वल प्रेरणास्रोत या तिन्ही रूपांत आहेत.
मथुताईंच्या जीवनात शिक्षण, साहित्य आणि राजकारण यांचा सुंदर असा त्रिवेणी संगम दिसून येतो. त्यासोबतच समाजकारण हा त्यांच्या आस्थेचा आणि बांधिलकीचा विषय आहे. त्यांच्या साहित्याने समाजातील वेदना, संघर्ष आणि वास्तवाला शब्द दिले; तर सामाजिक व सार्वजनिक जीवनाने त्या वास्तवाशी प्रत्यक्ष जोडून घेण्याची संधी दिली. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वात केवळ पाठ्यघटक शिकविणारा प्राध्यापक किंवा शब्दाशी खेळणारी लेखिका दिसत नाही, तर समाजाच्या सुख-दुःखाशी एकरूप झालेली संवेदनशील कार्यकर्ती दिसते.
डॉ. मथुताई सावंत यांनी १९८७ ते २००५ ही १८ वर्षे राजर्षी शाहू विद्यालय नांदेड येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषयाचे अध्यापन केले. २००५पासून आजपर्यंत पीपल्स कॉलेज नांदेड येथे पदवी व पदव्युत्तर वर्गांना मराठी विषयाचे अध्यापन आणि संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० विद्यार्थ्यांनी एम.फिल पदवी आणि ५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. ही पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी त्यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून शिक्षण क्षेत्रात अध्यापन व संशोधनाचे कार्य करत आहेत.
पीपल्स कॉलेजमधील साहित्याची परंपरा नरहर कुरुंदकरांपासून डॉ. मथुताई सावंत यांच्यापर्यंत अखंड चालू आहे. डॉ. मथुताई सावंत यांनी ‘पाण्यातील पायवाट’, ‘तिची वाटच वेगळी’, ’पाणबळी’, ’निवडुंगाची फुलं’ (कथासंग्रह), ‘राहू-केतू’, आणि ‘जीनगानी’ (कांदबरी), ‘समाजशिक्षिका सावित्रीबाई फुले’, ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे’, ‘राजर्षी शाहू महाराज’ (चरित्र), ‘नवरसांची नवलाई’, ‘लगीनघाई? मुळीच नाही’ (नाटक), ‘कथाकार भास्कर चंदनशिव’, ‘सृजनाचा शोध’, ‘समाज, साहित्य आणि संस्कृती’, ‘साहित्य सौरभ’, ‘अक्षरवाटा’, ‘अधोरेखित’ (समीक्षाग्रंथ) ‘एकनाथ आव्हाड यांचे बालसाहित्य’ आणि ‘भगवान अंजनीकर यांचे बालसाहित्य’ (संपादन) , सूर्यमुद्रा (गौरवग्रंथ संपादन) इ. विपुल साहित्य लेखन व संपादन केले आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाला बहुआयामी स्वरूप प्राप्त झाले आहे.
मथुताईंच्या साहित्याचा विचार केला, तर त्यांच्या लेखणीची ग्रामीण जीवनाशी असलेली घट्ट नाळ दिसून येते. ग्रामीण समाजातील शोषितांचे जगणे, त्यांचा जीवनसंघर्ष, रूढी-प्रथा-परंपरा, सामाजिक विषमता, स्त्रीची दुःखं, तिची स्वप्नं, तिची धडपड आणि तिची अस्तित्वासाठीची लढाई या साऱ्या वास्तवाचे प्रतिबिंब त्यांच्या साहित्यात दिसते. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू प्रामुख्याने ग्रामीण स्त्री हा आहे. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याकडे त्यांनी केवळ सहानुभूतीने पाहिले नाही, तर तिच्या अनुभवांना उद्गार दिला. तिच्या मनातील अस्वस्थता, तिचे मौन, तिचा संघर्ष आणि तिची जिद्द यांना त्यांनी शब्द दिला. डॉ. मथुताई सावंत यांच्या ‘राहू-केतू’ आणि ‘जिनगानी’ या कादंबरी लेखनामुळे 'मराठवाड्यातील पहिली ग्रामीण कांदबरी लेखिका' अशी त्यांची मराठी साहित्याच्या इतिहासात नोंद झाली आहे. मराठवाड्यातील ग्रामीण स्त्रीच्या जीवनाला साहित्याच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या महत्त्वाच्या स्त्री लेखिकांमध्ये मथुताईंचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते.
मथुताईंच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे दर्शन त्यांच्या ‘तिची वाट वेगळी’ या कथासंग्रहातून अतिशय प्रभावीपणे होते. या कथांमधील स्त्री ही केवळ परिस्थितीची बळी नाही, तर ती परिस्थितीशी दोन हात करणारी, स्वतःची वाट स्वतः शोधणारी आणि आपल्या अस्तित्वाचा अर्थ नव्याने सांगणारी स्त्री आहे. ग्रामीण स्त्रीच्या जीवनातील अनेक व्यथा - वेदना कथा त्यांच्या लेखणीतून मुखर झाल्या आहेत. ज्या स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आवाज मिळत नाही, त्यांच्या भावना, प्रश्न आणि संघर्षांना मथुताईंच्या साहित्याने उजागर केले आहे. त्यामुळे त्यांच्या कथा ह्या केवळ गोष्टी राहत नाहीत, तर त्या ग्रामीण स्त्रीजीवनाचा सामाजिक दस्तऐवज बनतात.
मथुताईंच्या लेखनात ग्रामीण साहित्याबरोबरच स्त्रीवादी जाणीवही प्रकर्षाने जाणवते. स्त्रीला केवळ कुटुंबातील जबाबदारी किंवा सामाजिक चौकटीत न पाहता स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून पाहण्याची दृष्टी त्यांच्या लेखनात आहे.
ग्रामीण स्त्रीच्या प्रश्नांना त्यांनी तिच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भांसह समजून घेतले. त्यामुळे त्यांच्या लेखनातील स्त्रीवाद हा केवळ घोषणात्मक नाही, तर तो इथल्या मातीतून उगवलेला, अनुभवातून आलेला आणि वास्तवाच्या पायावर उभा असलेला स्त्रीवाद आहे. मथुताईंच्या साहित्यकृतींच्या शीर्षकांकडे पाहिले, तरी त्यांच्या साहित्यिक जाणिवेची वेगळी ओळख होते. त्यांच्या शीर्षकांतूनच विषयाचा पैस, जीवनातील वास्तव आणि आशयाची दिशा सूचित होते. कोणतेही शीर्षक हे केवळ त्या साहित्यकृतीचे नाव नसते, तर ते त्या लेखनाच्या आत्म्याचे संकेत देणारे प्रतीक असते. मथुताईंच्या लेखनात ही जाणीव विशेषत्वाने दिसून येते.
महाराष्ट्रातील महत्त्वाचे साहित्यिक दांपत्य म्हणून ज्यांचा उल्लेख आदराने केला जातो अशा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक डॉ. सुरेश सावंत आणि गुरुवर्य डॉ. मथुताई सावंत यांनी साहित्य लेखन विपुल प्रमाणात केलेले आहे. हे साहित्यिक दांपत्य म्हणजे नांदेडचे भूषण आहे. यांचे सहजीवन म्हणजे बहुजन समाजातील एक आदर्श आहे. अनेक समकालीन साहित्यिकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत.
साहित्य संमेलने, साहित्यसंवाद, विचारांची देवाणघेवाण आणि नव्या लेखनाला प्रोत्साहन या माध्यमातून त्यांनी साहित्यिक वातावरण समृद्ध केले आहे. त्यांच्या सहवासात राहणे म्हणजे साहित्याच्या विविध प्रवाहांशी परिचित होणे आणि विचारांच्या नव्या वाटा शोधणे, असा अनुभव अनेकांना आला आहे. त्यांच्या ‘राहू-केतू’, ‘तिची वाटच वेगळी’ आणि ‘निवडुंगाची फुले’ या तीन साहित्यकृतींना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती पुरस्कार प्राप्त झाले आहेत. या पुरस्कारांसह त्यांच्या अनेक साहित्यकृतींना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
मथुताईंना साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात अनेक मान-सन्मान प्राप्त झाले. विविध साहित्य संमेलनांचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. हे त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचे आणि सामाजिक योगदानाचे द्योतक आहेच, तथापि मथुताईंच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे मोठेपण त्या पुरस्कारांत किंवा त्यांनी भूषविलेल्या पदांमध्ये नाही. ते आहे त्यांच्या माणसं जोडण्याच्या वृत्तीत, विद्यार्थ्यांना घडवण्याच्या तळमळीत आणि समाजाच्या प्रश्नांशी असलेल्या बांधिलकीत.
माझ्यासाठी मथुताई ह्या केवळ एक लेखिका नाहीत आणि केवळ प्राध्यापक नाहीत. त्या माझ्या आयुष्यातील मायेची सावली आहेत. कधी त्या आईच्या प्रेमाने पाठराखण करतात, कधी कडक गुरूसारख्या वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करतात, तर कधी शांत संवादातून जीवन समजावून सांगतात. त्यांच्या शब्दांत आधार आहे आणि विश्वास आहे. त्यांच्या विचारांत दिशादिग्दर्शन आहे आणि त्यांच्या कृतीत माणुसकी आहे.
मथुताईंनी दिलेली मायेची ऊब, ज्ञानाची शिदोरी आणि जगण्याची दृष्टी ही माझ्या आयुष्यातील अनमोल ठेव आहे. म्हणूनच त्यांचा सहवास आणि त्यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी सदैव प्रेरणादायी राहिले आहे. मथुताईंच्या जीवनाचा विचार केला, तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती ही की, त्यांनी आत्मकेंद्री आणि एकांगी आयुष्य कधीच जगले नाही, तर अनेकांचे आयुष्य घडवले.
४२ वर्षांच्या ज्ञानदानातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवल्या. साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण समाजाचे वास्तव शब्दबद्ध केले. ग्रामीण स्त्रीच्या जगण्याला आवाज दिला. चरित्रलेखन आणि समीक्षणातून साहित्यविश्व समृद्ध केले. सामाजिक व सार्वजनिक जीवनातून समाजाशी आपली नाळ जोडून ठेवली. म्हणूनच मथुताईंची ओळख एक व्यक्ती इतकी मर्यादित राहत नाही, तर त्या ज्ञान व साहित्य यांचा व्यासंग, ग्रामीण जीवनाची संवेदनशील भाष्यकार, स्त्रीच्या अस्मितेची समर्थ लेखिका आणि अनेकांच्या जीवनाला मायेचा आधार देणारी आई आहेत. माझ्या आयुष्यात हे भाग्य मथुताईंच्या रूपाने आले. म्हणूनच, मथुताई म्हणजे माझ्या आयुष्याला ज्ञानाची वाट दाखवणारी आणि जीवनाचं सोनं करणारी मातृछाया आहेत.
अशा मातृतुल्य गुरुवर्य डॉ. मथुताईंच्या सेवानिवृत्तीनिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही निर्मिकाकडे प्रार्थना.
डॉ नारायण शिवशेट्टे, अर्जापूर. जि. नांदेड
९४२२५५८५७३

COMMENTS