नांदेड
प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली (ता. धर्माबाद, जि. नांदेड) येथील वैद्यकीय अधिकारी (वर्ग-अ) डॉ. सोमेश नागोराव मोरे यांना ३,००० रुपयांची लाच स्वीकारताना नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मंगळवारी रंगेहात पकडले. वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर स्वाक्षरी करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती.
नेमकी काय आहे घटना?
तक्रारदार (वय २४ वर्षे) हे प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर (CR) अभिप्राय नोंदवून, त्यावर स्वाक्षरी करून तो अहवाल पुनर्विलोकनासाठी मा. जिल्हा हिवताप अधिकारी, नांदेड यांच्याकडे पाठवण्यासाठी आरोपी वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे (वय ३५) यांनी ४,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
याबाबत तक्रारदाराने ०१ ऑगस्ट २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), नांदेड येथे तक्रार नोंदवली होती.
पडताळणी आणि रंगेहात कारवाई
प्राप्त तक्रारीवरून लाचलुचपत विभागाच्या पथकाने ०३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र करखेली येथे लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणी दरम्यान डॉ. सोमेश मोरे यांनी तडजोडीअंती ३,००० रुपये लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर रचलेल्या सापळ्यात डॉ. सोमेश मोरे यांनी तक्रारदाराकडून ३,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताच, लाचलुचपत विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडून ताब्यात घेतले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
या प्रकरणी आरोपी डॉ. सोमेश नागोराव मोरे यांच्याविरुद्ध धर्माबाद पोलीस ठाण्यात 'भष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८' मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, गुन्हा दाखल होताच आरोपीला अधिकृतपणे अटक करण्यात येणार आहे.
कारवाई करणारे पथक:
- सापळा अधिकारी: कैलास मगर (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. नांदेड)
- पर्यवेक्षक अधिकारी: श्री. राहुल तरकसे (पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. नांदेड)
- सापळा पथक: पोहेका/ यशवंत दाबनवाड, राजेश राठोड, पोका/ श्याम गोरपल्ले, चालक पोहेका/ प्रकाश मामुलवार.
- मार्गदर्शन: ही धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेडचे पोलीस अधीक्षक श्री. श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप आणि पोलीस उप अधीक्षक श्री. राहुल तरकसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

COMMENTS