सेलू : अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा हेलस, या शाखेने तीन दशकांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून ३२ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या वर्धापनदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासोबत मनोरंजन व सुसंस्कार रुजवण्यासाठी पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ पुस्तकावर आधारित ‘जागर श्यामच्या कथांचा’ हा अभिनव उपक्रम मंगळवारपासून (८ सप्टेंबर २०२६) पासून सुरू होत आहे. उपक्रमाचे हे सहावे वर्ष आहे.
पूज्य साने गुरुजींच्या ‘श्यामची आई' पुस्तकातील कथा दररोज एक याप्रमाणे सलग ४२ दिवस ४२ संस्कारक्षम कथा ऑडिओ स्वरूपात व्हॉट्सॲप समूहांवर पाठवल्या जाणार असून, उपक्रमाच्या शेवटी ऑनलाइन परीक्षा घेऊन सर्व सहभागी विद्यार्थी व शाळांना ऑनलाइन सहभाग प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
या उपक्रमातील कथांचे उत्कृष्ट अभिवाचन छत्रपती संभाजीनगरच्या उपविभागीय अधिकारी अंजली धानोरकर यांनी केले असून, निर्मिती राजेंद्र जोशी यांची आहे. हा ऑडिओ परिपाठात किंवा वर्ग समूहांवर ऐकवला जाणार आहे.
या उपक्रमात शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजिका कल्पना दत्तात्रय हेलसकर (९४२००३६९३५), डॉ.सुहास सदाव्रते (९४०४५३६७६७), सतीश कुलकर्णी (७५८८४१२८५२), बाबासाहेब हेलसकर, विजय वायाळ प्रमोद देशमुख, मंताजी ढाकरे, आर.आर. जोशी, जमीर शेख, ईश्वर मोताळे यांनी केले आहे.

COMMENTS