मुखेड - ( विठ्ठल कल्याणपाड )मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय उदासीनता आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्ण आणि दिव्यांगांचे अतोनात हाल ह...
मुखेड - ( विठ्ठल कल्याणपाड )मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय उदासीनता आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य रुग्ण आणि दिव्यांगांचे अतोनात हाल होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन असूनही रिपोर्टिंग बंद असल्याने आपत्कालीन रुग्णांचे प्राण धोक्यात येत आहेत,तर दुसरीकडे मूलभूत सोयींअभावी दिव्यांगांना UDID प्रमाणपत्रासाठी रुग्णालयाचे हेलपाटे मारावे लागत आहेत.या दोन्ही गंभीर समस्यांवर त्वरित तोडगा काढावा,या मागणीसाठी शहर काँग्रेसच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक (नांदेड) व वैद्यकीय अधीक्षकांना संयुक्त निवेदन देण्यात आले आहे.उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅनची सुविधा उपलब्ध असून तंत्रज्ञांमार्फत स्कॅन काढले जातात.परंतु, टेली-रेडिओलॉजीचे (Tele-radiology) कंत्राट बंद पडल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून रुग्णांना रिपोर्टच मिळत नाहीत.अपघातग्रस्त किंवा मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या रुग्णांचे रिपोर्ट वेळेत न मिळाल्यामुळे डॉक्टरांना तात्काळ उपचार करणे अशक्य होत आहे.परिणामी,गरीब रुग्णांना नाईलाजाने महागड्या खाजगी केंद्रांमध्ये जाऊन स्कॅन करावा लागत आहे अथवा उपचारासाठी थेट नांदेड गाठावे लागत आहे.मुखेड रुग्णालयात स्वावलंबन पोर्टलवर अर्ज केल्यानंतर वैद्यकीय तपासणीचे (Medical Board) कोणतेही स्पष्ट वेळापत्रक उपलब्ध नाही.डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतरही अहवाल पोर्टलवर वेळेवर अपलोड केले जात नसल्याने प्रमाणपत्र मिळण्यास मोठा उशीर होत आहे.शिवाय,रुग्णालयात दिव्यांग रुग्णांसाठी रॅम्प,व्हीलचेअर आणि स्वतंत्र मदत कक्षाचा (Helpdesk) अभाव असल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या दिव्यांगांची मोठी अडवणूक होत आहे.सीटी स्कॅन रिपोर्टिंगचे कंत्राट त्वरित नूतनीकरण करावे आणि प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हंगामी रेडिओलॉजिस्टची सोय करावी.दिव्यांग तपासणीसाठी ठराविक वार व वेळ निश्चित करून त्याचा माहिती फलक रुग्णालयात लावावा.तपासणी अहवाल तात्काळ ऑनलाइन अपलोड करून ई-प्रमाणपत्रे वेळेत वितरीत करावीत.दिव्यांगांच्या सोयीसाठी स्वतंत्र मदत कक्ष,रॅम्प आणि व्हीलचेअर उपलब्ध करून द्याव्यात. रुग्णालयात रुग्णांसाठी इंजक्शन, औषधींचा तुटवड्यामुळे होणारी रुग्णांची गैरसोय टाळावी यासाठी शहर काँग्रेसचे अध्यक्ष हणमंत नारनाळीकर, पत्रकार राजु बनसोडे यांनी उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील वैद्यकीय अधिक्षकांना भेटून दिनांक 22 रोजी निवेदन दिले आहे.मुखेड उपजिल्हा रुग्णालय हे हजारो गरीब आणि ग्रामीण रुग्णांसाठी महत्त्वाचे केंद्र आहे.अत्यावश्यक सेवा अशा प्रकारे अर्ध्यावर ठप्प राहणे चिंताजनक आहे या निवेदनाच्या प्रति आरोग्य संचालक,जिल्हाधिकारी, स्थानिक खासदार,माजी आमदार आणि तहसीलदारांना पाठवण्यात आल्या असून,प्रशासनाने यावर तात्काळ तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचे शहराध्यक्ष हणमंत नारनाळीकर यांनी निवेदनातून सांगीतले आहे.

COMMENTS