नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी
अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावसाने पूर्णपणे ताण दिल्यामुळे नांदेड जिल्ह्यासह अर्धापूर तालुक्यात भीषण दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन आणि कापसाचे पीक शेतातच करपून गेले असून वरून पीक उभे दिसत असले तरी शेंगांमध्ये दाणेच भरलेले नाहीत. अशा अत्यंत नाजूक स्थितीत प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे दौरे केवळ पाहणी आणि बैठकांमधील काजू-बदामाच्या मेजवानीपुरतेच मर्यादित राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या या ढिसाळ आणि उदासीन कारभारावर जोरदार हल्लाबोल करत थेट आव्हान दिले आहे. तुमच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण शेतात फिरून १ किलो सोयाबीन काढून दाखवावे आणि बदल्यात आमच्याकडून क्विंटलभर काजू, बदाम आणि पिस्ता घेऊन जावा... यासाठी लागणारा खर्च आम्ही गावात वर्गणी गोळा करून करू," असा घणाघाती टोला संतप्त शेतकऱ्यांनी मारला आहे.
दाभडच्या आत्माराम टेकाळे यांनी मांडली व्यथा....
दाभड ता. अर्धापूर येथील स्थानिक शेतकरी आत्माराम टेकाळे यांनी वाळलेल्या शेतात उभे राहून आपबीती मांडली. पावसाच्या खंडामुळे संपूर्ण सोयाबीन उभे वाळून गेले आहे. शेंगांमध्ये दाणेच धरले नसल्याने पिकावर झालेला भांडवली खर्चही निघणे अशक्य झाले आहे. आता या वाळलेल्या पिकाची काढणी तरी कशी करावी आणि मजुरीचा खर्च कसा भागवावा?" असा सवाल टेकाळे यांनी उपस्थित केला आहे. प्रसारातील शेतकरी आक्रमक झाले असून आता तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे.
COMMENTS