विश्वास वसेकर यांनी चितारलेली बहारदार 'सृष्टी' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...


यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहेत. मनस्वी जगणारा आणि मनस्वी लिहिणारा लेखक अशीच त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या नावावर ११ कवितासंग्रह, ९ ललित लेखसंग्रह, एक कादंबरी, विनोदी लेखनाची ४ पुस्तके, समीक्षेची ७ पुस्तके, ९ संपादने, २ अनुवादित पुस्तके आणि बालसाहित्याची ८ पुस्तके इतकी अर्धशतकी ग्रंथसंपदा आहे. 'सृष्टी' हे त्यांचे निसर्गविषयक लेखनाचे देखणे पुस्तक मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने नुकतेच प्रकाशित केले आहे.
सृष्टी हा विश्वास वसेकर यांच्या केवळ वाचनाचा किंवा विरंगुळ्याचा विषय नसून हा त्यांच्या ध्यासाचा विषय आहे. 'सृष्टी' हे पुस्तक म्हणजे सृष्टीला मी दिलेले रिटर्न गिफ्ट आहे, असे त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे, ते शब्दशः खरे आहे. लेखकाने 'सृष्टी' ह्या पुस्तकाची मांडणी दोन भागांत केली असून पहिल्या भागात वृक्ष-वेलींविषयीचे सविस्तर असे १९ लेख आणि दुसर्‍या भागात छोटेखानी, एकपानी असे ३९ लेख आहेत. ह्या लेखनात लेखकाची निसर्गाप्रतिची कमालीची संवेदनशीलता दिसून येते. ह्या लेखनात एक प्रकारची सहजता आहे. यात कुठेही निसर्गप्रेमाचा लटका आवेश किंवा अभिनिवेश अजिबात नाही.
'अशोक' वृक्षावरील पहिल्याच लेखात लेखकाने झाडांविषयीची कृतज्ञता व्यक्त करताना लिहिले आहे :
'तसा मी खाली 'मान'वाला
झाडांनी मला मान वर करून
चालायला शिकविले'.
ह्या ओळींवरून लेखकाचा झाडांविषयीचा आदराचा दृष्टिकोन लक्षात येतो.
आपल्याकडे सरळसोट आणि उंचच उंच वाढलेल्या झाडाला 'अशोक' समजले जाते, पण प्रत्यक्षात तो 'अशोक' नाहीच. अशोकाचे झाड काही वेगळेच असते, असे सांगून लेखकाने अनेकांच्या आकलनातील गैरसमज दूर केला आहे. लेखकाने सदुसष्ट वर्षांच्या प्रयत्नानंतर खरेखुरे अशोकाचे झाड शोधून काढले आणि त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे. हिंदू आणि बौद्ध धर्मातही अशोकाला पवित्र मानतात, असे सांगून लेखकाने अशोकाचे पूजन केल्यावर शोक नष्ट होतो, ही लोकधारणा अधोरेखित केली आहे.
पारिजातकाविषयी लिहिताना लेखकाने समुद्रमंथनातून निघालेले हे तिसरे रत्न आहे, असे म्हटले आहे. पारिजातकाविषयीच्या आपल्या बालपणीच्या अनेक रम्य आठवणी सांगितल्या आहेत. पारिजातक हे वासनाशून्यतेचे प्रतीक आहे, असे लेखकाला वाटते. म्हणून त्यांनी कवींना पारिजातकाच्या प्रतिमेचा गैरवापर न करण्याचा इशारा दिला आहे.
बोधिवृक्ष म्हणून ओळखले जाणारे पिंपळाचे झाड हिंदू आणि बौद्ध धर्मातही पवित्र मानले जाते. एका पौराणिक कथेनुसार पिंपळाने आपल्या आत अश्वाला स्थान दिले होते, म्हणून त्याचे नाव 'अश्वत्थ' पडले, अशी दंतकथाही ते सांगतात. पिंपळाची छाया ही मधुरतम असते, अशा विधानांतून वाचकांच्या संवेदना जागविल्या आहेत. पिंपळाविषयी लिहिताना लेखकाला गोविंदाग्रज, बा. भ. बोरकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी यांच्या लेखनातील संदर्भ आठवतात.
'बाभळी' ह्या उपेक्षित झाडाविषयी स्वतंत्र आणि सुंदर लेख लिहून वसेकरांनी आपल्या सौंदर्यासक्तीची साक्षच दिली आहे. 'शेळीची लेंडी ही कुठल्याच अर्थाने तिरस्करणीय न वाटणारी एकमेव विष्ठा आहे. वाळल्यावर तर तिचे अत्यंत सौष्ठवपूर्ण शिल्प बनते', ह्यांसारख्या वाक्यांतून लेखकाची सूक्ष्म निरीक्षणशक्ती दिसून येते. डिंकाच्या लोभापायी बाभळीच्या देहाला 'जखमा अशा सुगंधी' होतात, हे लेखकाचे आणखी एक निरीक्षण. बाभळीची पिवळीधम्मक गोल फुले म्हणजे तुफानातील दिवेच आहेत, असे लेखकाला वाटते. बाभळी फक्त त्यागच करते. आपला संपूर्ण देह कापरासारखा झिजवते, याचे लेखकाला भारी कौतुक वाटते. तरीसुद्धा बाभळीला यश नाही आणि सन्मान नाही, याची लेखकाला खंतही वाटते. इंदिरा संतांच्या शब्दांत 'हिला न ठावी नागररीती', असे असल्यामुळे महानगराजवळ 'चिंचवड' असते आणि खेडोपाडी मात्र 'बाभळगाव'.
विश्वास वसेकर यांनी हा सुंदर लेख लिहून बाभळीच्या उपेक्षेची पूर्णांशाने भरपाई केली आहे.
'गुलाब' ह्या लेखात साफो ह्या ग्रीक कवयित्रीने गुलाबाला 'पुष्पांची सम्राज्ञी' हा किताब इसवीसन पूर्व ६००मध्येच बहाल केला, ही माहिती आपल्याला मिळते. कवी यशवंत यांच्या 'गुलामाचे गा-हाणे' ह्या कवितेच्या धर्तीवर वसेकर यांनी 'गुलाबाचे गा-हाणे' लिहिले आहे, जे मुळातून वाचण्यासारखे आहे. गुलाबाविषयी लिहिताना लेखकाने सुप्रसिद्ध इंग्रजी कवी मिल्टन याचा एक रंजक किस्सा सांगितला आहे. लेखकाने गमतीने असेही म्हटले आहे, की गुलाब ही उर्दू शायरांची जहागीर झाली आहे.
'बांबू' ह्या लेखात बांबूची राक्षसी बांबू, कळक, वंश, कीच, कीचक, वेळू, वेणू, चिवारी, कणकी, कणगी, माणगा, अशी कितीतरी समर्पक नावे वाचायला मिळतात. रांजी, थेरू, बास, वेळू, इदी, करकू, वास्ता असे बांबूचे अनेक प्रकार असल्याची माहिती मिळते. लेखकाला निसर्गाचे इतके आकर्षण आहे, की ते बांबूचा बहर पाहण्यासाठी मुद्दाम सहकुटुंब ताडोबा अभयारण्यात गेले होते. बांबू पिवळा पडतो तो पक्व झाल्याने नव्हे, तर त्याच्यातील अग्नीच्या अस्तित्वामुळे, अशी एक प्राक्कथा इथे वाचायला मिळते.
बासरी ही वेळूने आपल्याला दिलेली सर्वोत्कृष्ट सांस्कृतिक देणगी आहे, असे लेखकाला वाटते.
सुंदरलाल बहुगुणा यांनी जंगल वाचविण्यासाठी 'चिपको' आंदोलन केले होते, तसेच नवेगावच्या जंगलात बांबूच्या बचावासाठी माधवराव पाटील यांनी आंदोलन केले होते, अशी माहिती इथे वाचायला मिळते. लेखकाला बांबूची माणसांशी तुलना करण्याचा मोह आवरला नाही. 'बांबू माणसासारखा आहे. माणसाला एकच तारुण्य असते. बांबूलाही एकदाच फुलोरा येतो. माणूस हा समाजशील प्राणी आहे. बांबूसुद्धा गटाने किंवा कळपाने राहणारे झाड आहे'. ही तुलना वाचताना बांबूचे घनदाट बेट नजरेसमोर साकार होते.
लेखकाने हे वेळोवेळी सांगितले आहे, की मी एक पुष्पवेडा माणूस आहे, आणि त्याचे पुरावेही दिले आहेत. उटकमंडच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये मी प्रत्यक्षात सुवर्ण कमलपुष्पे पाहून आनंदाने वेडा झालो होतो, असे त्यांनी म्हटले आहे. निसर्गाइतकी उत्तम आणि परिपूर्ण रचना मानव करू शकत नाही, याबद्दल खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. कमळ आणि कुमुद (वॉटर लिली) यातील फरक अनेकांना समजत नाही. तो समजावून सांगताना लेखकाने लिहिले आहे, की कमळ सूर्यविकासी असते, तर कुमुद चंद्रविकासी असते. लेखाच्या शेवटी लेखकाने लिहिले आहे, प्रत्यक्ष कमळ पाहण्याआधी आपण 'क-कमळाचा' शिकतो. इतके हे फूल प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनाला व्यापून उरले आहे.
बाभळीप्रमाणेच पळसाचे झाडही काही फारसे लक्षवेधक नसते. तरीसुद्धा लेखकाने पळसाविषयी स्वतंत्र लेख लिहून वाचकांचे ह्या जंगली झाडाकडे लक्ष वेधले आहे. या निमित्ताने पद्मपुराणातील शिवपार्वतीची गोष्ट सांगितली आहे. नेत्रदीपक पळसफुलांचे वैभव वर्णन केले आहे. संस्कृत, प्राकृत आणि मराठी लेखक-कवींना ह्या पळसाने कसे वेड लावले, याचे दाखले दिले आहेत. पळस हे निकृष्ट जमिनीचे प्रतीक आहे, असे सांगून पळस आणि मराठवाड्याच्या मातीचे साधर्म्य अधोरेखित केले आहे.
शिरीष आणि पर्जन्य नावाचे झाड दिसायला सारखेच असल्यामुळे भल्याभल्यांची कशी फजिती झाली आहे, हे लेखकाने एका लेखात दाखवून दिले आहे. दुर्गा भागवत, जयवंतराव टिळक आणि शरदिनी डहाणूकर यांची अशीच फसगत झाली असल्याचे लेखकाने निर्भीडपणे नमूद केले आहे. विश्वास वसेकर यांनी पाने, फुले आणि फळे यांची तुलना करून शिरीष आणि पर्जन्यवृक्ष यांच्यातील फरक सोपा करून सांगितला आहे.
आपल्या अंगणातील, दररोजच्या परिचयातील तुळशीला मिळालेली वृंदावनी, विश्वपूजिता, पुष्पसार, नंदनी, कृष्णजीवनी, स्वरूपा, अमृतोद्भव, भक्तिसुधा, विष्णुवल्लभा इ. नावे वाचून कोणीही वाचक स्तिमित झाल्याशिवाय राहणार नाही. तुळशीच्या जन्माच्या काही कथा आपण वाचलेल्या असतात, ऐकलेल्या असतात. इथे लेखकाने स्कंदपुराणातील तुळशीच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे. तसेच तुळशीची शोकात्मिकाही कथन केली आहे. 'मी शेवटचा श्वास तुळशींवरून आलेल्या हवेतच घेणार आहे', असे सांगून लेखकाने आपल्या आयुष्याला तुळशीने कसे व्यापलेले आहे, हे अतिशय लीनतेने सांगितले आहे.
कडुनिंबाचे झाड माहीत नाही, असा माणूस सापडणे कठीण. ह्या लेखात लेखकाने कडुनिंबाचे वनस्पतिशास्त्रीय रूपवर्णन तर केले आहेच, शिवाय त्याचे औषधी गुणधर्मही सांगितले आहेत. ते वाचल्यावर परिभद्र, कल्पवृक्ष, पिचुमंद ही त्याची नावे कशी अन्वर्थक आहेत, याची खात्री पटते.
फूल हा झाडाचा चेहरा असतो, ह्या वाक्याच्या प्रकाशात अमलतासाची पिवळीजर्द लोंबती फुले फारच लक्षवेधक ठरतात. अमलतास आपण पहिल्यांदा औरंगाबादेत पाहिल्याचे लेखकाने लिहून ठेवले आहे. अमलतास उर्फ बहाव्याला सुवर्णिका, बंदरतिरी, कर्णिकार, कॅशिया अशीही छान नावे आहेत. अमलतासाच्या शेंगा खाल्ल्यावर अस्वलाची कशी फजिती होते, ही गोष्ट लेखकाने रंगवून रंगवून सांगितली आहे.
याशिवाय बूच किंवा आकाशनिंब, पारूल, अर्जुनसादडा, सोनचाफा आणि नागकेशर ह्या झाडांविषयीचे लेखही वाचनीय आहेत. आजवर नागकेशराचे फूल पाहायला मिळाले नसल्यामुळे नागकेशराचे फूल हा माझा चिरदाह आहे, असे लेखकाने प्रांजळपणे नमूद केले आहे. त्यांचा तो चिरदाह लवकर कमी व्हावा, अशा शुभेच्छा तर आपण नक्कीच देऊ शकतो.
'सृष्टी' ह्या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात रुई, गुलमोहर, बकुळ, निशिगंध, तामण, जुई, उंबर, चिंच, वड, मरवा इ. ३९ वनस्पतींविषयीचे लेख आहेत. पहिल्या भागातील लेखांच्या तुलनेत हे लेख अगदीच लहान, म्हणजे केवळ एकपानी आहेत. या भागात आपल्याला जास्वंद चीनमधून आला, नीलमोहर ब्राझीलमधून आला, हादगा मलायातून आला, झेंडू मॅक्सिकोतून आला, घाणेरी अमेरिकेतून आली आणि अबोली श्रीलंकेतून आली, अशी ज्ञानरंजक माहिती मिळते.
'सृष्टी'तील लेख वाचत असताना ह्या लेखांत लेखकाचे सौंदर्योपासक, कलारसिक, बहुश्रुत आणि समृद्ध व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झालेले आहे, असे आपल्याला पानोपानी दिसते. विश्वास वसेकर यांची चित्रदर्शी लेखनशैली हा ह्या लेखनाचा महत्त्वाचा विशेष आहे. ह्या पुस्तकातील प्रत्येक लेख हे स्वतंत्र असे शब्दचित्र आहे. ह्या लेखनात वाचकांना मोहरून टाकण्याचे सामर्थ्य नक्कीच आहे. ह्या ललित लेखांत लेखकाने त्या त्या वनस्पतींची शास्त्रीय माहिती दिली असली, तरी प्रत्येक लेख ही लेखकाची आत्मानुभूती आहे. लेखकाचे निसर्गप्रेम ह्या पुस्तकाच्या पानोपानी प्रत्ययास येते. ह्या लेखांमध्ये लेखकाने आधी वाचलेल्या लेखांचे, पुस्तकांचे, लेखकांचे आणि कवींचे संदर्भ येतात, तसेच चित्रपटगीतांचेही संदर्भ येतात. पौराणिक ग्रंथांतील संदर्भ येतात, तसेच लोकसाहित्यातील आणि लोकजीवनातील नोंदीही येतात.
रंगांची आणि गंधांची उधळण करणाऱ्या वृक्ष - वेलींची ही उत्कट वर्णने अतिशय प्रत्ययकारी उतरली आहेत. लेखकाने अधूनमधून मराठी, हिंदी आणि संस्कृत कवितेच्या ओळी पेरल्यामुळे हे लेखन अतिशय ओघवते आणि काव्यमय झाले आहे. केळ विताना ऐकू नये, अशा लोकधारणाही इथे आढळतात. 'सृष्टी' ह्या ललित लेखनाच्या माध्यमातून लेखकाने स्वतंत्र अशी प्रतिसृष्टी निर्माण केली आहे. ह्या प्रत्येक लेखात लेखकाची निखळ सौंदर्यदृष्टी जाणवते. प्रत्यक्षात दुर्मीळ होत चाललेली आणि वाचकांना हवीहवीशी वाटणारी, सुखावणारी वनश्रीसृष्टी लेखकाने आपल्या शब्दांतून साक्षात केली आहे. रूपवान वृक्षवेलींचे वर्णन करणारी ही 'सृष्टी' म्हणजे एक प्रकारचे निसर्गसुक्तच आहे. पुष्पसृष्टीचा सारा सुगंध ह्या ललित लेखनात दरवळतो आहे, असेच वाटत राहते आणि हेच ह्या कलाकृतीचे खरे यश आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
  • 'सृष्टी' (निसर्गविषयक ललितलेखसंग्रह)
  • लेखक : प्रा. विश्वास वसेकर
  • प्रकाशक : मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई
  • मुखपृष्ठ : सतीश भावसार
  • पृष्ठे : १७६ किंमत रु. ३००
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group