नरेंद्र येरावार
उमरी प्रतिनिधी
सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि भौतिक सुखाच्या मागे धावण्याचे युग आहे. माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा मिळवण्यात व्यस्त आहे, पण या सगळ्यात तो मनाचे खरे समाधान आणि आनंद हरवून बसला आहे. हा खरा आनंद बाजारात विकत मिळत नाही, तो मिळतो फक्त संतांच्या संगतीत आणि भगवंताच्या अखंड नामस्मरणात. त्यामुळे मिळालेल्या दुर्लभ मनुष्य जन्माचे सार्थक करायचे असेल तर प्रत्येकाने भक्तिमार्गाला लागावे, असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, कीर्तनकार आणि प्रवचनकार ह.भ.प. साध्वी मुक्ताई नाथ माऊली यांनी केले.
श्री विद्यार्थी गणेश मंडळाच्या वतीने आयोजित प्रवचनमालेत त्या बोलत होत्या.
यावेळी माऊलींनी आपल्या ओघवत्या, रसाळ वाणीने उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.
नरदेह हा अतिशय दुर्लभ आहे. ८४ लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य जन्म मिळतो. हा देह भोगासाठी नाही तर भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे. या देहाचे सार्थक करून घ्यावे, "संगत ही जीवन घडवते आणि बिघडवतेही. वाईट संगतीने माणूस अधोगतीला जातो तर संत संगतीने माणसाचा उद्धार होतो. म्हणून नेहमी चांगल्या, सात्विक लोकांच्या संगतीत राहावे, कलियुगात नामस्मरण हेच सर्वात मोठे साधन आहे. कोणताही मोठा यज्ञ, तप करण्याची गरज नाही. फक्त मुखाने अखंड विठ्ठल-विठ्ठल, राम-कृष्ण-हरी नाम घेतले तरी जीवनाचे कल्याण होते, असे त्यांनी सांगितले. त्यांनी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर माऊली, नाथ संप्रदायातील अनेक अभंगांचे दाखले देत जीवनाचे तत्वज्ञान सोप्या भाषेत समजावून सांगत आजची तरुण पिढी मोबाईल आणि व्यसनाच्या आहारी जात आहे. याला कारण म्हणजे घरातील संस्कार कमी होणे. प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना वारकरी संप्रदायाचे, भक्तीचे संस्कार द्यावेत आणि आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे हे पटवून दिले

COMMENTS