नांदेड-लातूर रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी दिवंगत थोर स्वातंत्र्य सेनानी माजी खासदार व माजी आमदार भाई डॉ .केशवराव धोंडगे यांनी सुरू केलेल्या न्याय लढ्याला अखेर यश मिळणार असल्याची माहिती प्रा.डॉ.पुरुषोत्तम धोंडगे यांनी दिली. तब्बल पाच दशकांपासून प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पाच्या अंतिम तांत्रिक तपासण्या पूर्ण झाल्या असून, आता राज्य शासनाने आपला ५० टक्के आर्थिक वाटा तातडीने मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. भाई डॉ.केशवराव धोंडगे यांनी १९७७ मध्ये लोकसभेत नांदेड ते बिदर-गंगाखेड ते बोधन आणि नांदेड व लातूर या रेल्वेमार्गाची मागणी लावून धरली होती. त्यानंतर १९८० ते १९९५ या कालावधीत विधानसभेत, तसेच बाहेर विविध सत्याग्रह, मोर्चे आणि आंदोलने करून त्यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. याप्रसंगी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री मधु दंडवते यांनी या मागणीबाबत सकारात्मक आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतरही हा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन राहिला.
सध्या नांदेड-लातूर रेल्वेमार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून या प्रकल्पासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारने प्रकल्पासाठी ५० टक्के निधी देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, राज्य शासनाकडून उर्वरित ५० टक्के निधीबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा रखडण्याची भीती व्यक्त होत आहे. माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख यांनी १ जूलै रोजी चालू असलेल्या पावसाळी अधिवेशनात डॉ.भाई केशवराव धोंडगे यांची १९७७ पासून मागणी होती. त्यांनी सभागृहासमोर निदर्शनास आणली. या प्रकल्पासाठी लातूरचे खासदार डॉ .काळगे आणि नांदेडचे खासदार प्रा.रवींद्र चव्हाण हे लोकसभेत सातत्याने पाठपुरावा करत असल्याचेही त्यांनी सांगितले. हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यास नांदेड, अहमदपूर, लातूर, तसेच परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विद्यार्थ्यांना मोठा फायदा होऊन वाहतूक व औद्योगिक विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
लेकरू माईच्या कुशीत कुठलीही अट, शर्त न टाकता जाते त्याप्रमाणे साधू संतांचा मराठवाडा बिन शर्त कुठली अट न टाकता, करार मदार न करता, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रमध्ये सामील झाला, अशा या भोळ्या भाबड्या मराठवाड्याची न्याय मागणी मान्य करून न्याय द्यावा. मराठवाड्याने संयुक्त महाराष्ट्रासाठी दिलेल्या योगदानाची आठवण करून देत प्रा.डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी राज्य शासनाने मराठवाड्याच्या या दीर्घकालीन न्याय मागणीला तातडीने मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा आणि भाई डॉ .केशवराव धोंडगे यांच्या स्वप्नातील रेल्वेमार्ग प्रत्यक्षात साकार करावा, अशी मागणी राज्य शासनाला केली आहे.
COMMENTS