नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून शासनाने शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित सेवा विषयक बाबी, रिक्त पदे भरणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, शंभर टक्के अनुदान मिळणे, BLO व SIR कामातून मुक्त करून विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी वेळ देणे ,10.20.30. आश्वासित प्रगती योजना लागू करणे,शिक्षकांची अशैक्षणिक कामातून मुक्त करणे,पदोन्नती प्रक्रिया गतीमान करणे, अनुदान, वेतनातील विसंगती दूर करणे, तसेच इतर प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अशी मागणी केली.
आंदोलनादरम्यान शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विविध मागण्यांचे निवेदन संबंधित प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविण्यात आले. शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांची तातडीने दखल न घेतल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने देण्यात आला.
या धरणे आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांतराव विश्वासराव, सहसचिव रेखा सोळुंके, जिल्हाध्यक्ष व्ही आर.चिलवरवार,आर. पी वाघमारे, बालाजी टीमकीकर, अब्दुल हसीब, राम येडते, डॉक्टर विठ्ठल भंडारे,उत्तम लाटकर, आतनूरकर, शेख साहल, गंगाधर तेलंग, शंकर हनुमंते, धनगरे, पाटील जी व्ही, विनोद भुताळे, बाबाराव घाटे, गणेश बडुरे,यांच्यासह सर्व पदाधिकारी, जिल्हा व तालुका प्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते.

COMMENTS