राम दातीर
माहूर(प्रतिनीधी)आगामी काळातील राजकीय घडामोडी आणि पक्षविस्तार लक्षात घेता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) नांदेड जिल्ह्यात एक मोठा संघटनात्मक निर्णय घेतला आहे. मनसे पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार माहूर तालुक्यातील सध्या कार्यरत असलेली 'मनसे तालुका कार्यकारिणी' पुढील आदेशापर्यंत तातडीने बरखास्त करण्यात आली आहे. मनसेचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष नितीन गणेश मोहरे यांनी एका अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार आणि वरिष्ठ पातळीवरून आलेल्या थेट सूचनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या धडक निर्णयामुळे माहूर तालुक्यातील राजकीय वर्तुळात आणि विशेषतः मनसे सैनिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
माहूर तालुक्यातील पक्षाची पकड अधिक मजबूत करण्यासाठी आणि संघटनेत नवीन ऊर्जा भरण्यासाठी लवकरच पक्षाची 'नवीन, मजबूत आणि पुनर्रचित कार्यकारिणी' वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने जाहीर करण्यात येईल, असे या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
तालुका कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असली, तरी पक्षाचे अधिकृत काम थांबणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत पक्षाची दिशा आणि कामांचे नियोजन वरिष्ठांच्या सूचनेनुसारच चालेल. या काळात तालुक्यातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि सक्रिय कार्यकर्त्यांनी कोणत्याही संभ्रमात न पडता नेहमीप्रमाणे पक्षकार्यात सक्रिय राहावे आणि पुढील अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करावी, असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष नितीन गणेश मोहरे यांनी केले आहे.
तालुक्यातील या मोठ्या फेरबदलानंतर आता मनसेच्या माहूर तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाची आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांचा
धुरा कोणाच्या खांद्यावर दिला जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS