एकनाथ आव्हाड यांची ज्ञानरंजक 'पिवळीधमक सगुणाबाई' डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

  एकनाथ आव्हाड हे एक नामवंत बालसाहित्यकार आणि कथाकथनकार आहेत. गेली ३२ वर्षे ते मुंबई महापालिकेच्या सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कथा, कव...

 

एकनाथ आव्हाड हे एक नामवंत बालसाहित्यकार आणि कथाकथनकार आहेत. गेली ३२ वर्षे ते मुंबई महापालिकेच्या सेवेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. कथा, कविता, नाट्यछटा, चरित्र, काव्यकोडी इ. वाङ्मयप्रकारांतील त्यांची ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या एकूण साहित्यसेवेवर समीक्षणात्मक ५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. 

आव्हाड यांच्या 'पिवळीधमक सगुणाबाई' ह्या बालकथासंग्रहात तेरा कथा आहेत. 


विरंगुळा म्हणून, गंमत म्हणून बालसाहित्य लिहिणे वेगळे आणि निष्ठापूर्वक, जिवीच्या जिव्हाळ्याने, सातत्याने गुणवत्तापूर्ण बालसाहित्य लिहिणे वेगळे. एकनाथ आव्हाड हे सानेगुरुजींच्या बालनिष्ठेने बालसाहित्य निर्मिती करतात. त्यांच्या रक्तात बालसाहित्य आहे आणि त्यांच्या श्वासातही बालसाहित्य आहे. त्यांच्या लेखनात मनोरंजन, ज्ञान आणि संस्कार ही तिन्ही मूल्ये अगदी हातात हात घालून येतात. यांच्या लेखनात सहजता, सुलभता आणि साधेपणा असतो. त्यांची प्रत्येक कलाकृती ही बालमनाची पकड घेते. त्यांच्या काही पुस्तकांचे हिंदी आणि इंग्रजीत भाषांतर झाले आहे. काही पुस्तके ब्रेल लिपीत आली आहेत. त्यांच्या साहित्याचा शालेय आणि विद्यापीठीय पाठ्यपुस्तकांत समावेश करण्यात आला आहे. त्यांच्या 'छंद देई आनंद' ह्या बालकवितासंग्रहाला २०२३चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.


एकनाथ आव्हाड यांनी आजवर बालसाहित्याचे फार मोठे अवकाश आपल्या कवेत घेतले आहे, तरी अजूनही त्यांची बालसाहित्य निर्मितीची घोडदौड अखंडपणे चालू आहे. लेखन विपुल असले, तरी त्यात कुठेही तोचतोचपणा येत नाही. नावीन्य आणि प्रयोगशीलता हे त्यांच्या लेखनाचे विशेष आहेत. 'पिवळीधमक सगुणाबाई' हा त्यांचा आठवा बालकथासंग्रह म्हणजे ह्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा, कळसाध्याय आहे, असे म्हटले, तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. 

'पिवळीधमक सगुणाबाई' ह्या कथेतली मेधा ही मोठी जिज्ञासू मुलगी आहे. तिच्या शाळेतल्या कामतबाईंनी औषधी वनस्पतींची लागवड करण्याची स्पर्धा ठेवली आहे. हळद ह्या औषधी वनस्पतीवर ती आपला प्रकल्प तयार करते. मेधामुळे आपल्याला हळदीचे अनेक औषधी गुणधर्म सहजगत्या समजतात. ही कथा मनोरंजनाबरोबरच बालवाचकांच्या ज्ञानातही भर घालते. 


हल्ली जगभर पाणीटंचाई जाणवते आहे. आपण दररोज वेगवेगळ्या कामांसाठी पाण्याचा भरपूर वापर करतो. आपण अनेकदा पाणी वाया घालवतो. माधवच्या घरचा नळ माधवला पाण्याच्या वापराबाबत अनेक गोष्टी सांगून त्याचे डोळे उघडतो. वेलीवर फूल उमलून यावे, इतक्या सहजतेने एकनाथ आव्हाड यांच्या प्रत्येक कथेत छान छान कविता फुलून आलेली असते. 'थेंबे थेंबे तळे साचे' ह्या कथेतही एक सुंदर कविता आहे. 

'पाण्यामुळेच सुखावतो, ओसाड उजाड माळ

पाण्यामुळेच सुरक्षित, आपला भविष्यकाळ' 

ह्या ओळी पाण्याचे महत्त्व पटवून देतात. कथेतून सहजपणे उमलून आलेल्या कवितेच्या ओळी मूळ कथाशयाला पुष्टी देतात. माधवच्या माध्यमातून लेखकाने 'पाणी वाचवा जीवन वाचवा' आणि 'प प पाण्याचा, पाणी जपून वापरण्याचा' असा अनमोल संदेश दिला आहे. 


'हे तर आलं' ह्या कथेचा नायक, पाचवीत शिकणारा सुशांत हा एक चिकित्सक मुलगा आहे. उत्सुकता, उत्कंठा आणि कुतूहल हे गुण त्याच्या अंगी ठासून भरलेले आहेत. तो घरी आईवडिलांना आणि शाळेत शिक्षकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. वेगवेगळ्या विषयांवर तो आई-वडिलांशी छान संवाद साधत असतो. एकदा आलं या विषयावर तो आईवडलांकडून भरपूर माहिती मिळवतो. आपल्याला चहात आणि भाजीत आले ठेचून घालतात एवढंच माहिती आहे. पण आल्याचे आणखीही कितीतरी औषधी उपयोग आहेत हे ह्या गोष्टीतून आपसूक कळते. आई-वडील आणि सुशांत ह्या तिघांच्या संवादातून ही कथा फुलत जाते. आईवडलांनी आणि शिक्षकांनीही ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की जिज्ञासेतूनच ज्ञानाचा जन्म होत असतो. म्हणून लहान मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त केले पाहिजे. या दृष्टीने ही कथा येथे मला महत्त्वाची वाटते. 


'नंतरला असतं अंतर' ह्या कथेचा नायक चिन्मय आहे. प्रत्येक कामाचा त्याला भारी कंटाळा. कोणतेही काम सांगितले, की 'नंतर करतो' हे त्याचे उत्तर ठरलेले! या त्याच्या सवयीमुळे आई आणि आजी त्याला सारख्या टोकत असतात. त्याच्या अशा आळसामुळे, पाणी न दिल्याने कुंडीतील रोपं मलूल होतात. घरातील ओल्या कच-याचा वेळीच बाहेर नेऊन न टाकल्यामुळे त्याचा वास सुटतो. आपल्यातही असा एक आळशी चिन्मय दडून बसलेला असू शकतो. आळशी चिन्मयला समजावून सांगताना आजी एक तालकथा सांगते. कथेच्या शेवटच्या कडव्यात जीवनोपयोगी संदेश देताना म्हणते :

'म्हणून कोणत्याही गोष्टीचा 

वेळीच विचार करावा

वेळच्यावेळी कामाचा 

सतत आग्रह धरावा'. 

हा संदेश एकट्या चिन्मयसाठी नाही, तर सगळ्यांसाठी आहे, असे वाटते. 


शैक्षणिक सहल म्हटली की खूपच मौजमजा! सहल प्रत्येकालाच आवडते. 'ऐकू या जरा' ह्या कथेतील बाळूला महाबळेश्वरच्या सहलीला जायचे आहे. त्यासाठी बाबांनी परवानगी तर दिलीच, शिवाय सहलीविषयी जी गोष्ट सांगितली, ती अधिक महत्त्वाची आहे. 'सहल म्हणजे अभ्यास आणि आनंद यांचा सुरेख मेळ. सहल म्हणजे निसर्गाची नवलाई जवळून पाहण्याची, अनुभवण्याची मिळालेली एक संधीच. त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे'.

ते पुढे म्हणाले, की माणूस हा जन्मभर विद्यार्थीच असतो. हा मंत्र लक्षात ठेवून बाळू महाबळेश्वरच्या सहलीला जाऊन आला. येताना त्याने सहलीवर एक छान कविता लिहिली आहे. ती मुळातून वाचण्यासारखी आहे. या सहलीतून बाळूला काय मिळाले, याचे उत्तर ह्या कवितेत सापडते. गोष्ट वाचता वाचता नकळत आपणही बाळूसोबत महाबळेश्वरच्या सहलीचा आनंद घेऊन येतो. 


पाचवीत शिकत असलेला राघव हा भलताच भारी कलाकार आहे. तो स्वतःच नाट्यछटा लिहून शाळेतील कार्यक्रमात सादर करतो. एके दिवशी त्याला नाट्यछटेचा विषयच सुचत नाही, आणि वरून आई त्याला काम सांगते. त्या धांदलीत मिठाची बरणी त्याच्या हातून निसटते आणि फुटते. खाली सांडलेलं मीठ चक्क राघवशी बोलू लागतं. आपले औषधी गुणधर्म त्याला सांगतं. मिठाचे सेवन कमी किंवा जास्त झाले, तर काय दुष्परिणाम होतात, याची जाणीव करून देतं. त्यावरून राघवला नाट्यछटेचा विषय मिळाला, 'जरा ऐकून तर घ्या - मी मीठ बोलतोय'. ही कथा आपल्याला मिठाविषयी जागरूक करते आणि आपल्या ज्ञानात भरही घालते. 


शेजारच्या माधवकाकांनी कोकणातील हापूस आंब्यांची पेटी आणून दिली आहे. त्यांचा सुगंध घरभर दरवळतो आहे. सोहम आणि सोनाली हे भाऊ-बहीण आमरस पुरीचे जेवण करण्यासाठी अगदी उतावीळ झाले आहेत. इतक्यात माधवकाका आले आणि त्यांनी आंबे पिकवण्याच्या दोन पद्धतींची माहिती दिली. 'रायप्निंग चेंबर' ही नैसर्गिक पद्धतीने आंबे पिकवण्याची पद्धत आहे. ही खूप चांगली आहे. काही लोक भरपूर नफा कमावण्यासाठी कृत्रिम पद्धतीने आंबे पिकवतात. त्यासाठी कॅल्शियम कार्बाईड पावडरचा वापर करतात. ही पद्धत आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. याची माहिती 'झाडावर पिकलाय आंबा' ह्या कथेत वाचायला मिळते. ही कथा वाचल्यानंतर नैसर्गिकरीत्या पिकलेला आंबा कसा ओळखावा हे सहज मुलांच्याही लक्षात येईल.


उन्हाळ्याच्या सुट्टीत गीता आणि गीतेश मामाच्या गावी गेले होते. 'खा, प्या, खेळा, वाचा आणि नाचा' अशी त्यांची मौजमस्ती चालली होती. गीतेशला नदीत पोहायची खूप इच्छा होती, पण गावाला संतोष आणि आनंद देणारी संतोषी नदी आटली होती. पाण्याशिवाय ती नदी बापुडवाणी दिसत होती. लोकांनी नदीपात्रात प्लास्टिकचा कचरा टाकला होता. कारखान्याचं सांडपाणी नदीत सोडलं होतं. निर्माल्य नदीत टाकले होते. गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन नदीतच केले होते. लोकांनी नदीपात्र घाण करून टाकले होते. एके दिवशी ही नदी गीतेशच्या स्वप्नात येऊन आपली खंत बोलून दाखवते. गीतेश नदीला साफसफाईचे वचन देतो. सगळे जण गीतेशचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी झटतात. 'सरिता करते का कधी खंत' ह्या कथेच्या माध्यमातून लेखकाने नदीप्रदूषणाच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले आहे आणि त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज पटवून दिली आहे. 


पूर्वी 'मामाचा गाव' हा शहरी मुलांच्या आकर्षणाचा विषय होता. पण आता ते चित्र पूर्णतः बदलले आहे. लोकसंख्यावाढ आणि पाणीटंचाईमुळे खेडी उदास आणि भकास झाली आहेत. 'जागर पर्यावरणाचा' ह्या कथेतील पार्थ आणि आणि आर्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला, म्हणजे धरणगावला गेले होते. गावाचे नाव जरी धरणगाव असले, तरी तिथे तीव्र पाणीटंचाई होती. त्या पाणीटंचाईने पार्थ आणि आर्याला पाणीबचतीचे महत्त्व शिकवले. पाण्याचा अपव्यय टाळायला शिकवले. ह्या कथेत लेखकाने लोकसंख्यावाढीच्या दुष्परिणामांकडेही वाचकांचे लक्ष वेधले आहे. 


२२ एप्रिल हा दिवस 'वसुंधरा दिन' म्हणून जगभर साजरा केला जातो. 'वसुंधरा दिन' ह्या कथेत लेखकाने चीनमध्ये घडलेली एक खरीखुरी गोष्ट सांगितली आहे. निसर्गाचा समतोल राखायचा, तर झाडे, प्राणी, पक्षी सगळेच महत्त्वाचे, हा विचार अधोरेखित केला आहे. 

'परोपकारी लसूण' ह्या कथेतला लसूण खरोखरच परोपकारी आहे. तो माणसासारखाच चालतो आणि बोलतोसुद्धा! तो प्रत्येक गरजू माणसाला आपल्या पाकळ्या देत राहतो. लोकांना दु:खमुक्त करत राहतो. आपण इतरांना देत देत संपत आलो, याचे त्याला अजिबात वाईट वाटत नाही. उलट आपण इतरांच्या उपयोगी पडलो, याचा त्याला आनंदच झाला. 

ही अद्भुतरम्य गोष्ट बाळगोपाळांना नक्कीच आवडेल. 'चला, झाड होऊ या' ह्या कथेची भाषा अतिशय लयबद्ध, तालबद्ध आणि नादमधुर अशी आहे. ह्या कथेतील सुधाचे वृक्षप्रेम आपल्या सगळ्यांच्या अंगी यायला हवे. 


'अश्शी घडली जादू' ह्या कथेतील राजीव हा मुलगा घरी आल्यावर विज्ञानावर आधारित जादूचे प्रयोग करून दाखवतो. ते पाहून त्याची आई म्हणते, 'शाळेत मिळविलेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा रोजच्या जीवनात उपयोग करणं हेच खरं शिक्षण. यालाच म्हणतात, ज्ञानाचं उपयोजन'. 

पुस्तकी ज्ञानाचं उपयोजन करायला शिकवणा-या ह्या गोष्टी आनंददायक आणि ज्ञानवर्धक आहेत. 

पाण्याचा नळ माधवला बोलतो, फुटलेल्या बरणीतलं मीठ राघवला बोलतं, गीतेशला नदी बोलते, अशी सगळी उत्कंठावर्धक अद्भुतरम्यता ह्या कथांमध्ये आहे. 


एकनाथ आव्हाड यांच्या कथेत, कथा आणि कवितेचे फारच छान अद्वैत दिसून येते. आव्हाडांची प्रत्येक कथा ही हसत-खेळत काही एक विचार देऊन समृद्ध करणारी कथा आहे. 

ह्या कथेत 'ज्याचा हात मोडेल, तो त्याच्याच गळ्यात पडेल', 'चोराच्या उलट्या बोंबा', 

'उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग', 'प्रयत्नांती परमेश्वर', 'अति खाणं आणि मसणात जाणं', 

ह्यांसारख्या चपखल म्हणी येतात. ह्या म्हणी कथेच्या आशयाला आणखी उठाव देतात. 

'उन्हाचा ताप, बापरे बाप!' असे हे  ओघवते लेखन वाचकाच्या मनाचा ठाव घेते. एकूणच ह्या पुस्तकातील सर्वच कथा मुलांचे मनोरंजन करता करता निसर्ग, पर्यावरणाबाबत मुलांमध्ये जाणीव जागृती विकसित करणाऱ्या आणि वैज्ञानिक दृष्टी व्यापक करणाऱ्या आहेत. म्हणूनच या कथांचे मोल मला अनमोल वाटते.


ह्या पुस्तकाला लाभलेली चंद्रमोहन कुलकर्णी यांची नितांत सुंदर चित्रे आणि नेत्रदीपक सजावट म्हणजे सोन्याला लाभलेला सुगंधच जणू! डॉ. बाळ फोंडके यांनी ह्या पुस्तकाला प्रस्तावना लिहून पाठराखण केली आहे. उत्कृष्ट कागदावर रंगीत छपाई करून मेहता पब्लिशिंग हाऊस यांनी ह्या पुस्तकाची निर्मिती अतिशय अप्रतिम केली आहे! ह्या पुस्तकाच्या सहवासात बच्चे कंपनीची उन्हाळी सुट्टी आनंददायी होईल, यात काही शंकाच नाही! 

लेखक आणि प्रकाशक, ह्या दोघांचेही हार्दिक अभिनंदन!


**********


'पिवळीधमक सगुणाबाई' (बालकथासंग्रह)

लेखक : एकनाथ आव्हाड

मुखपृष्ठ व सजावट : चंद्रमोहन कुलकर्णी

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे.

पृष्ठे ९६          किंमत रु २९५/-


*********


पुस्तक परिचय : डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group