भाजप-आरएसएसकडून शिवरायांच्या इतिहासाची जाणीवपूर्वक मोडतोड; हर्षवर्धन सपकाळ यांनी उडविला धिरेंद्र शास्त्रीसह बड्या नेत्यांचा थरकाप! मुंबई/प्र...
भाजप-आरएसएसकडून शिवरायांच्या इतिहासाची जाणीवपूर्वक मोडतोड; हर्षवर्धन सपकाळ यांनी उडविला धिरेंद्र शास्त्रीसह बड्या नेत्यांचा थरकाप!
मुंबई/प्रतिनिधी: छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असतानाही, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराजांच्या कर्तृत्वाचा अपमान करण्याचे 'राष्ट्रीय धोरण' आखले असल्याचा खळबळजनक आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या 'इतिहास तोडफोड' मोहिमेचा खरपूस समाचार घेतला.धिरेंद्र शास्त्रींच्या विधानावर मौन का? भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधान केले. विशेष म्हणजे, ज्या मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते, तिथेच हा प्रकार घडला. "एवढ्या मोठ्या नेत्यांसमोर हा 'अशास्त्री' बरळत असताना या तिघांनीही साधा निषेध का नोंदवला नाही?" असा संतप्त सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्या धिरेंद्र शास्त्रीसह या तिन्ही नेत्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली.
इतिहासाची विकृत मांडणी आणि भाजपची 'पिलावळ' सपकाळ पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामींचा संदर्भ जाणीवपूर्वक जोडला जात आहे, वास्तविक दोघांचा कालखंड वेगळा आहे. इतिहासाची ही मोडतोड भाजपचा कुटील डाव आहे." यावेळी त्यांनी भगतसिंह कोश्यारी, मंगल प्रभात लोढा, सुधांशू त्रिवेदी आणि जय भगवान गोयल यांच्या जुन्या विधानांचा व कृतींचा पाढाच वाचला. "आज के शिवाजी: नरेंद्र मोदी" सारखी पुस्तके लिहून महाराजांची तुलना करणे, हा जनतेचा अपमान असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
विचारधाराच शिवद्रोही? गोलवलकर गुरुजींच्या 'बंच ऑफ थॉट' पासून सावरकरांच्या 'सात सोनेरी पाने' पर्यंतच्या साहित्यात शिवराय आणि संभाजी महाराजांबद्दल विकृत लिखाण असल्याचा दावा करत, सपकाळ यांनी भाजप-संघाच्या विचारधारेवरच निशाणा साधला. "संविधानातील मूल्ये हीच शिवरायांच्या स्वराज्याची मूल्ये आहेत, पण हेच विचार भाजपला मान्य नाहीत, म्हणून सातत्याने महाराजांची बदनामी केली जात आहे," असेही ते म्हणाले.
राज्यात या प्रकरणावरून तीव्र संताप व्यक्त होत असून, छत्रपतींच्या अपमानाचा हा प्रकार महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही, असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

COMMENTS