संतांच्या संगतीला मानवी जीवनात मोलाचे स्थान आहे. यामुळे मानवाच्या जीवनातील क्रोध, वासना , काम , विकार या वाईट भावनांना आवर घालण्यासाठी आवश्यक ज्ञान प्राप्त होते..
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात असलेले डोंगर शेळके हे गाव सद्गुरू समर्थ महाराज यांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पावन झालेले एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे...
म्हणूनच डोंगर शेळकी हे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र सह कर्नाटक व तेलंगणा राज्यातून लाखोच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येथे येतात.
चैत्र शुद्ध तृतीयेला सद्गुरू समर्थ धोंडू तात्या महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन केले जाते. म्हणून गुढीपाडव्याच्या काळात अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो.
गेल्या ९४ वर्षापासून डोंगरशेळकी येथील ग्रामस्थांनी ही परंपरा कायम जपली आहे. हे गौरवशाली यशस्वी परंपरा शतक महोत्सवाकडे वाटचाल करत आहे. या दृष्टीने या वार्षिक यात्रा महोत्सवाचे विशेष महत्त्व आहे.
सूर्य उपासक ,श्री गुरुदत्त पूजक व आजन्म ब्रह्मचारी असलेल्या समर्थ सद्गुरु धोंडूतात्या महाराज यांचे समाधी स्थळ डोंगर शेळकी येथे आहे.
ह भ प नवनाथ महाराज आरणे यांनी समर्थ धोंडूतात्या महाराजांचे चरित्र ग्रंथ लिहिले आहे. यातून तात्यांच्या जीवनकार्याची तसेच परमार्थ साधनेची माहिती मिळते. श्री धोंडूतात्यांनी आपल्या जीवनामध्ये परमार्थसाधना घडावी म्हणून एकादशीला उपवास करणे ,भगवंताची नित्यसेवा करणे, त्यांच्या नामाचे श्रवण आणि पठण करणे व त्यांचा प्रसार करणे हे महत्त्वाचे कार्य केले. यामुळे या भागात भक्ती मार्गाचा प्रसार त्यांनी केला.
जात ,धर्म ,कुळ ,गोत्र याला मूठमाती देऊन गरीब व श्रीमंत असा भेदभाव न करता समाजातील सगळ्यांना एकत्र करून, भक्ती मार्गाचा उपदेश त्यांनी केला. म्हणून समाजातील प्रत्येक घटकाला ते आपल्या जवळचे वाटू लागले .जणू काही आपल्या नातलगातीलच ते असल्याचे समजायचे... म्हणून लोकांनीच त्यांना "तात्या" ही बहुमानाची पदवी बहाल केली... असे मानले जाते.
श्री सद्गुरु धोंडूतात्यांचे पूर्ण नाव धोंडोपंत अंबादासराव पाठक असे होते. त्यांचे आईचे नाव गंगाबाई होते. त्यांचा जन्म नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे इसवी सन 1830 या काळात झाला. बालपणी पितृछत्र हरवल्यामुळे ते आजोळी आईसोबत विराळ येथे वास्तव्यास आले. त्यांनी ब्रह्मचर्याचे पालन करत सतत 24 वर्ष सूर्य उपासना केली. सदाचार संपन्न ,सत्वशील, संत म्हणून त्यांची प्रसिद्धी चोहीकडे पसरली. परिसरातील भाविक भक्त त्यांना गावोगावी आवडीने घेऊन जाऊ लागली. यातूनच डोंगरशेळकीच्या भाविकांसोबत त्यांचा आपुलकीचा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाला होता.
म्हणून ते अंतिम काळात येथेच राहू लागले होते. चैत्र शुद्ध तृतीया शके 1854 (इसवी सन 1932 )मध्ये ते डोंगरशेळकी ला समाधीस्थ झाले... तेव्हापासून त्यांच्या स्मरणार्थ येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने वार्षिक यात्रा महोत्सव साजरा केला जातो.
डोंगरशेळकी येथे ही नामसंकीर्तनाची परंपरा अखंडपणे चालू आहे. येथे भक्त निवासाची सुविधा उपलब्ध असून वर्षभर अन्नछत्र चालू असते. महाराष्ट्र शासनाकडून या मंदिर स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून" ब "दर्जा दिलेला आहे. यानुसार सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. मंदिर संस्थानाकडून भव्य मंदिर इमारत उभारले असून ,परिसरात मंगल कार्यालय सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
येथे वर्षभर धार्मिक कार्यक्रम आयोजन केले जातात .यामध्ये विशेष करून आषाढी व कार्तिकी एकादशीला तसेच महाशिवरात्रीला शिवाय वर्षभरातील प्रत्येक एकादशीला भाविक भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात. यासाठी कीर्तनाचे आयोजन केले जाते. तसेच गावातही हरीजागरसह कीर्तनाचे आयोजन केले जाते. येथे एकंदर वर्षभराच्या काळात शंभर च्या आसपास कीर्तनाच्या आयोजन केले जाते. यातून मानवतेचा ,बंधुभावाचा संदेश दिला जातो...
महिमा धोंडूतात्यांचा "या विशेषांक मधून संपादक नारायण घटकार गुरुजी यांनी सविस्तर माहिती दिली आहे .यासाठी त्यांनी श्री समर्थ धोंडूतात्या साहित्य अभिरुची मंडळ स्थापन केले आहे.
गावात भजनी मंडळ कडून नित्य नियमाने पूजा_अर्चना ,आरती व भजन सेवा केली जाते. ह भ प शिवाजी मुंडे गुरुजी लिखित, समर्थ धोंडूतात्यांची पोथी मध्ये आरती देण्यात आली आहे. महिलांचेही भजनी मंडळ येथे कार्यरत आहे. यासाठी भानुदास मुंडे गुरुजी ,गोपाल सिंग ठाकूर, हरिश्चंद्र धुळे, कल्पना मारुती मुंडे , मीरा सुवर्णकार, हनुमंत हंडरगुळे, बाळासाहेब मरलापल्ले, पांडुरंग मरेवाड, शिवाजी शिंदे आदींचा पुढाकार असतो...
मार्गदर्शक म्हणून ह भ प सोपान महाराज मुंडे, ह भ प नवनाथ महाराज आरणे, शिवाजी मुंडे गुरुजी , बालाजी मुंडे गुरुजी तर विश्वस्त मंडळाचे व्यंकटराव मुंडे व बाबुराव घटकार हे उल्लेखनीय कार्य करत आहेत...
समर्थ धोंडूतात्या जयंतीच्या दिशताब्दीच्या निमित्ताने तसेच पुण्यतिथीच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने या संस्थानाकडून सामाजिक उपक्रम हाती घेण्याची गरज आहे. यामुळे डोंगरशेळकी या सद्गुरु धोंडूतात्या महाराज संस्थानाचा नावलौकिक राज्यभर व देशभर वाढेल...!
चला, डोंगरशेळकीला जाऊ,
धोंडू तात्यांचे दर्शन घेऊ...
श्री. रघुवीर दशरथ आरणे, सदस्य, ( 9423718476 )
श्री समर्थ धोंडूतात्या साहित्य अभिरुची मंडळ ,डोंगरशेळकी. तालुका .उदगीर ,जिल्हा._ लातूर.

COMMENTS