पंडित दीनदयाळ उपाध्याय संस्थेचा पुढाकार
पंडित दीनदयाळ उपाध्याय शैक्षणिक व सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या वतीने शहरातील प्रतिभा निकेतन हायस्कूल येथे भव्य 'रक्त तपासणी व आरोग्य मार्गदर्शन' शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. अरुण मुदगलकर होते.
मान्यवरांची उपस्थिती
या शिबिराचे उद्घाटन माजी महापौर तथा विद्यमान नगरसेविका सौ. जयश्री पावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुनील पल्लेवाड (वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय), डॉ. शेखर चौधरी (श्री गुरुजी रुग्णालय), डॉ. मधुकर हात्ते (वैद्यकीय अधिकारी) आणि डॉ. मार्तंड आयनिले (वैद्यकीय अधिकारी) यांची उपस्थिती होती. तसेच संस्थेचे सहसचिव भास्कर डोईबळे, महालॅबचे अक्षय सोनकांबळे, सुरज वाघमारे, कांबळे मॅडम, गोळवलकर गुरुजी रक्तपेढीचे बालाजी शिंदे, राजकुमार शेळके आणि माधव सुवर्णकार उपस्थित होते.
'फास्ट फूड'च्या दुष्परिणामांवर प्रकाश
कार्यक्रमादरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. वडापाव, पाणीपुरी, समोसा, कचोरी, आईस्क्रीम आणि चॉकलेट यांसारख्या पदार्थांच्या अतिसेवनामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत त्यांनी सतर्क केले. "फास्ट फूडची सवय आरोग्यासाठी घातक आहे. जिभेचे चोचले पुरवण्यासाठी कधीतरी हे पदार्थ खाणे ठीक आहे, परंतु शरीर आणि स्नायूंच्या बळकटीसाठी घरचा प्रोटीनयुक्त आणि सकस आहारच घ्यावा," असा सल्ला यावेळी देण्यात आला.
मोबाईलचा वापर प्रगतीसाठी करा
केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्याबाबतही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. तासनतास मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया न घालवता, तंत्रज्ञानाचा वापर केवळ उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या प्रगतीसाठी करावा, असे आवाहन वक्त्यांनी केले.
उत्साही प्रतिसाद
या शिबिरात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून आपली रक्त तपासणी करून घेतली. मान्यवरांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाची संकल्पना आणि सूत्रसंचालन अंकिता कामतीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS