नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; १२५ स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकरी-ग्राहक थेट भेट नांदेड : "भारत कृषीप्रधान देश ...
नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन; १२५ स्टॉल्सच्या माध्यमातून शेतकरी-ग्राहक थेट भेट
नांदेड : "भारत कृषीप्रधान देश असून शेतकरी आपला अन्नदाता आहे. केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, शेतकऱ्यांनी आता 'एआय' (कृत्रिम बुद्धिमत्ता) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती करावी," असे प्रतिपादन राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी केले.नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर आयोजित तीन दिवसीय (१५ ते १७ मार्च) जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन रविवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
बातमीचे ठळक मुद्दे:
बजेटमधील दिलासा: शासनाने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा आणि नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे चव्हाण यांनी आवर्जून सांगितले.
महिला शेतकऱ्यांचा गौरव: संयुक्त राष्ट्र संघाने २०२६ हे वर्ष 'महिला शेतकरी वर्ष' म्हणून घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. एकूण ३६ शेतकऱ्यांना यावेळी सन्मानित केले गेले.
पूरक व्यवसायांची जोड: खासदार रवींद्र चव्हाण यांनी कमी खर्चात अधिक उत्पादनासाठी शेतीला जोडधंद्यांची (पशुपालन, प्रक्रिया उद्योग) जोड देण्याचे आवाहन केले.
डिजिटल कृषी: महोत्सवाच्या निमित्ताने www.nandedkrushimahotsav.in या पोर्टलचे उद्घाटन झाले. यामुळे ग्राहकांना घरबसल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून शेतमाल खरेदी करता येईल.
महोत्सवात काय आहे खास?
या प्रदर्शनात एकूण १२५ स्टॉल्स लावले आहेत. यात गोदाकाठची ज्वारी, सेंद्रिय डाळी, लाकडी घाण्याचे तेल, बांबूच्या वस्तू, केळीचे वेफर्स आणि महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
उपस्थिती: यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, कृषी उपसंचालक कैलास वानखेडे व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.

COMMENTS