कोणत्याही साहित्यप्रकारापेक्षा कादंबरी हा साहित्यप्रकार मोठ्या वाचकांना वाचायला आवडतो, तसाच तो मुलांनाही वाचायला आवडतो. अर्थात मुलांच्या बाबतीत येथे प्रौढ कादंबरीचा उल्लेख करायचा नसून बालकादंबरीच्या अंगाने उल्लेख करायचा आहे. मुळातच कादंबरी हा दीर्घ साहित्यप्रकार आहे. प्रौढ कादंबरीइतकी बालकादंबरी दीर्घ नसली, तरी लहान मुलांच्या वयाच्या आणि आकलनाच्या दृष्टीने तिला दीर्घच म्हणावे लागेल. तिच्यामध्ये सलग असे कथानक असल्याने आणि घटना - प्रसंगांची आकर्षक गुंफण असल्यामुळे कादंबरी हा साहित्यप्रकार दीर्घ असला तरी लहान मुलांना तो मनापासून आवडतो. इतकेच नव्हे, तर काही प्रौढ वाचकसुद्धा आवडीने बालकादंबरी वाचतात. म्हणून कादंबरीला समाजाभिमुख साहित्यप्रकार मानले जाते.
कादंबरी हा साहित्यप्रकार लहानांपासून प्रौढांपर्यंत सगळ्यांना आवडतो. याविषयी मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. महेंद्र कदम आपल्या , 'कादंबरी सार आणि विस्तार' या समीक्षाग्रंथाच्या मनोगतात म्हणतात, 'कादंबरी ही अधिक समाजाभिमुख गोष्ट असल्याने अभिव्यक्तीऐवजी आशयाकडे अधिक लक्ष जाणे स्वाभाविक आहे'.
ते पुढे असेही म्हणतात की, 'असे असले तरी कादंबरीचा रूपाच्या अंगाने विचार व्हायला हवा. ज्या आशयाला ती अभिव्यक्त करीत आहे तो आशय किती तऱ्हांनी आविष्कृत होत आहे, याचा विचार केला जायला हवा'.
कोणत्याही कादंबरीचा आशय वाचकांना भुरळ पाडत असतो, पण हा आशय लेखकाने कोणत्या पद्धतीने मांडला आहे, त्याला त्यांनी अभिव्यक्ती म्हटले आहे. मराठी साहित्यात प्रौढांसाठी लिहिलेल्या कादंबरी लेखनाच्या अनेक अभिव्यक्ती आपल्याला अभ्यासायला मिळतात. शैलीविज्ञानाच्या दृष्टीने कादंबरीच्या अभिव्यक्तीपद्धती लेखक आपल्या आशयाला पूरक असणाऱ्या पद्धतीने मांडतात.पण बालकादंबरी बालसाहित्यिक मुलांसाठी लिहीत असतो. त्यामुळे येथे बालसाहित्यकाराला अभिव्यक्तीच्या फार आविष्कारपद्धती अवलंबता येत नाहीत. त्याला एकच कथानक सरळ पद्धतीने मांडावे लागते. कारण अधिक गुंतागुंतीची आणि अवघड वाटणारी कादंबरीची रचनाशैलीचे स्वातंत्र्य त्याला घेता येत नाही.
बालकादंबरी लिहिताना बालसाहित्यकाराला मुलांचे वय, विचार, अनुभवविश्व आणि आकलनशक्ती विचारात घेऊनच कादंबरीचा पट आटोपशीर पद्धतीने मांडावा लागतो. कादंबरी लिहिताना त्या कादंबरीत लेखक एक विधान करीत असतो. त्या विधानाच्या अंगाने तो स्वतंत्र भावविश्व निर्माण करतो. हे विधान भावविश्वाच्या अंगाने मुलांना समजले पाहिजे. पण त्याला नव्याने अभिव्यक्तीशैली निर्माण करता येत नाही. असे नाही की बाल साहित्यकार नव्या अभिव्यक्ती शैलीचा शोध लावत नाही. तो तशा अभिव्यक्तीशैली निर्माणही करू शकतो, पण ती बालकांना किती रुचेल आणि समजेल याचा विचारही त्याला करावा लागतो. कारण वयाने लहान असलेल्या मुलांना गुंतागुंतीपेक्षा सरधोपट कथानक आवडते.
बालकादंबरी काल्पनिक असली, तरी बालकादंबरीकाराला कादंबरीत एक वास्तव उभे करावे लागते. हे वास्तव बालकादंबरीकार सभोवतालच्या वातावरणातून उभे करीत असतो. हे वास्तव बालकांच्या परिवेशातून आणि बालकांच्या नजरेतून त्याला शोधावे लागते. लहान मुलांना अद्भुतरम्य आणि चमत्कारिक विश्व आवडते. हे अद्भुतरम्य विश्व परी, राक्षस, राजा, प्राणी, विज्ञान, अंतराळ, एलियन, यांच्याशी निगडित असेल, तर ते अधिकच आवडते. बालकादंबरीकाराला या अद्भुतरम्य विश्वालाही वास्तवाची झालर लावावी लागते.
येथे आपण मुलांच्या आवडत्या प्राणीविश्वाच्या अंगाने चर्चा करणार आहोत.
लहान मुलांना प्राणीविश्व आवडते. प्राण्यांवर लिहिलेले बालसाहित्य त्यांना अद्भुत वाटते. कारण काही प्राण्यांशी बालकांचे भावनिक नाते गुंतलेले असते. म्हणूनच अनेक बालसाहित्यिक प्राणीविश्वावर बालसाहित्य लिहितात. यालाच परविश्व असेही म्हणतात.
जगातील अनेक मान्यवर कवी/ लेखकांनी अनेक पशुपक्ष्यांवर कथा, कविता आणि कादंबऱ्या लिहिल्या आहेत. 'भालू विनी- द - पुह,' 'शरारती खरगोश पीटर रॅबिट', 'चतुर ग्रफालो' या इंग्रजीतील प्राणीविषयक साहित्याने अनेकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. बालकादंबरीतील प्राणीविश्वांतील पात्रे प्राचीन असोत किंवा समकालीन, त्यांनी बालसाहित्याच्या परिदृश्याला आकार दिला आहे, आशय दिला आहे आणि वाचकांच्या अनेक पिढ्या प्रभावित केल्या आहेत.
बालसाहित्यात अवतरलेल्या प्राणीविश्वातील प्राणी अगदी माणसांसारखे व्यवहार करतात. माणसांसारखे बोलतात. त्यांना बोलणारे प्राणी म्हणतात. बोलणाऱ्या प्राण्यांच्या बालसाहित्याविषयी मादाम मोंटेसरी असे म्हणतात की, "बोलणाऱ्या प्राण्यांच्या पुस्तकांचा अस्वीकार करण्याऐवजी मी मुलांना गरजेपेक्षा जास्त उपदेश देणाऱ्या बालपुस्तकांचा अस्वीकार करणे पसंत करीन".
म्हणजेच त्यांचे असे मत आहे, की दहा वर्षापर्यंतच्या मुलांना बोलणाऱ्या प्राण्यांची पुस्तके वाचायला दिली, तरी हरकत नाही. कारण ही पुस्तके लहान मुलांना भावनात्मक दुरावा प्रदान करीत असतात. पात्रांपासून अलग होण्याची संधी देत असतात. त्यातून अलिप्ततावादाचे वास्तव मुलांना अनुभवायला मिळते. प्राण्यांचे केलेले मानवीकरण हे वास्तववादी असते, ही एक सार्वत्रिक अवधारणा आहे. आदिमानवाच्या काळापासून प्रकृतीची पूजा करणे आणि दुनियेची कार्यप्रणाली समजण्यासाठी मानवीकरणाचा सहारा घेतला आहे. मादाम मॉन्टेसरी म्हणतात की, "लहान मुलांना या मानवी परंपरेपासून वंचित ठेवणे चुकीचे आहे."
म्हणूनच लहान मुलांना बोलणाऱ्या प्राण्यांचे साहित्य आवर्जून वाचायला दिले पाहिजे.
सन 2025चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेल्या डॉ. सुरेश सावंत यांच्या 'अवखळ अप्पू' या नुकत्याच प्रकाशित झालेल्या बालकादंबरीच्या अनुषंगाने 'बालसाहित्यातील प्राणीविश्व' याविषयी येथे आपण चर्चा करणार आहोत. 14 नोव्हेंबर 2025 रोजी ही बालकादंबरी दिलीपराज प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केली आहे. ही कादंबरी हत्तीच्या एका छोट्या पिल्लावर आधारित आहे. त्याचे नाव आहे, अप्पू. लहान मुलांप्रमाणेच हा अप्पूही खूप अवखळ आहे. ही एक कल्पनारम्य कथा आहे. काल्पनिक कथेशिवाय मानवजातीचे अस्तित्व असंभवनीय आहे. कारण हीच काल्पनिकता मुलांना वास्तविकतेची जादुई दुनिया दाखवीत असते. मुलांची जिज्ञासा आणि आकर्षण वाढवीत असते. डॉ. सुरेश सावंत यांची 'अवखळ अप्पू' ही कादंबरी मुलांची जिज्ञासापूर्ती तर करतेच. शिवाय मुलांचे बालसाहित्याविषयीचे आकर्षण आणखी वाढवते.
या कादंबरीत 'अप्पू' नावाच्या हत्तीचे एक अतिशय लोभसवाणे चित्र लेखकाने उभे केले आहे. हत्ती हा जंगली प्राणी आहे. तो जंगलात उघड्यावर राहतो, पण काही जण हत्तीला पाळतात. आपला 'अप्पू' जंगलीही नाही आणि पाळीवपण नाही. तो हत्तीसंवर्धन केंद्रात लहानाचा मोठा होत आहे. 'अप्पू' हे हत्तीचे एक पिल्लू आहे. हत्तीचे पिल्लू म्हटले की ते चंचल, खोडकर आणि मिळून मिसळून राहणारे असते. कोणत्याही प्राण्याचे पिल्लू हे चंचल आणि खोडकरच असते. शिवाय काही प्राण्यांना आपण मानवाने लेबलं लावलेली आहेत. उदाहरणार्थ, कोल्हा लबाड असतो. आपण सिंहाला जंगलचा राजा ठरवून टाकले आहे. प्राण्यांचे असे पारंपरिक रूप आपण मुलांपुढे उभे केलेले असते. याचा अर्थ असा असतो, की लहान मुलांनी कोणत्याही प्राण्यांवर लिहिलेले पुस्तक उघडले की ते कथेचा सारांश लवकर आत्मसात करतात. त्या प्राण्यांविषयी वाचलेली माहिती लहान मुलांना चटकन समजते आणि ते त्या कथानकाकडे सहज आकर्षित होतात.
बालसाहित्यातील प्राण्यांच्या चित्रणामुळे ते त्या प्राण्यांना ओळखतात. त्यांच्याविषयी सहानुभूती विकसित करण्यास बालसाहित्य त्यांना मदत करते.
'अवखळ अप्पू' या कादंबरीतील अप्पू हा केरळमधील 'दुबारे हत्ती संगोपन केंद्रात' आपल्या सगळ्या परिवारासोबत राहतो. हा अप्पू खूप खटपट्या, चळवळ्या आणि धडपड्या आहे. आपल्या आईचा तो फार लाडका आहे. या कादंबरीत अप्पूच्या जन्मापासून ते अप्पूला मंदिराला दान करण्यापर्यंतचा त्याचा प्रवास लेखकाने फारच छान रेखाटला आहे. ही कादंबरी वाचताना मुलांना मानवी तर्काचा खूप उपयोग होतो. हे पुस्तक सजीव विज्ञानाशी संबंधित असल्याने हत्ती या प्राण्याची जास्तीत जास्त माहिती मिळविण्यासाठी या कादंबरीचा खूप उपयोग होतो. अर्थात कोणत्याही प्राणीविश्वावर बालकादंबरी लिहिताना लेखकाला त्या प्राण्याची परिपूर्ण माहिती करून घ्यावी लागते. येथे लेखकाने ती माहिती अभ्यासपूर्ण पद्धतीने मिळवूनच ही ओघवती बालकादंबरी लिहिली आहे.
या कादंबरीत 'कण्णन' नावाचे एक मानवी पात्र आहे. कण्णन माहुताचे काम करतो. तो अप्पूचे खूप लाड करतो. त्याने अप्पूच्या गळ्यात एक कवड्यांची माळ घातली आहे. त्यामुळे अप्पू खूप छान दिसतो. अप्पूची कण्णनसोबत छान गट्टी जमलेली असते. कण्णन जसा करेल, तसा अप्पू करायचा. अप्पू त्याच्या शेजारी झोपायचा. आपल्या अन्नात कोणी वाटेकरी होऊ नये, म्हणून अप्पू खारुताईला पळवून लावतो. लहान मुलांप्रमाणेच अप्पूचे खाणे कमी आणि धिंगाणा जास्त असतो. अप्पूची आई त्याला समजावते की, 'अप्पू, असा अधाशीपणा बरा नव्हे'.
अप्पू आपल्या कळपासोबत जंगलात चरायला जाताना रस्त्याने तो कधीच सरळ चालत नसे. रस्त्यात टायर दिसला की तो टायर खेळत जात असे. 'धडपडून पडशील', अशा सूचना त्याची आई त्याला देते. त्याचे काका नदीतील वाळू सोंडेने अंगावर टाकायचे. हा घाणेरडा खेळ अप्पूला आवडत नसे. पण अंगावर वाळू टाकली की माशा, किडे, डास चावत नाहीत, असे ज्ञान त्याची आई त्याला देते.येथे आपल्याला लेखकाने हत्तींविषयीची अभ्यासपूर्ण माहिती ललितरम्य शैलीत दिली आहे. लहान मुलांना प्राण्यांविषयी मनोवैज्ञानिक आकर्षण निर्माण करून देण्यात लेखकाने यश मिळवले आहे प्राण्यांच्या कथा - कादंबऱ्यांत जे वास्तव प्रतिबिंबित झाले आहे, त्याच्या माध्यमातून मानवी जीवनातील नीती, विचार, जीवनशैली, पृष्ठभूमी आणि अनुभवाला प्रस्तुत करते. प्राण्यांच्या कथा लहान मुलांना सकारात्मक बनवण्यात उपयोगी पडतात. शैक्षणिक नीती, विभिन्न दृष्टिकोन, मानव - पशु मित्रता, एकमेकांविषयीची निष्ठा आणि सदगुणांचा परिचय करून देतात.
अवखळ अप्पू' या कादंबरीत डॉ. सुरेश सावंत यांनी अप्पूच्या आयुष्यातील निवडक प्रसंगांच्या साहाय्याने मुलांमध्येही सद्गुण पेरण्याचा प्रयत्न केला आहे. अप्पूसोबत या बालकादंबरीत इटुकली खारुताई, पिटुकली टिटवीबाई, मिठू मिठू पोपट, हरणाचे पाडस, मगरबाई, लेकुरवाळी बदकूबाई ही पात्रेही येतात. अप्पू कधीकधी त्यांच्या खोड्या काढतो आणि कधीकधी त्यांच्याकडून आपली फजिती करून घेतो. अप्पूला लवकर लवकर मोठे होण्याची घाई झालेली आहे. तो सतत आपल्या आईला विचारत असतो की, "आई,मी मोठा कधी होईन ग?"
अप्पूचे पप्पा हौदात पाणी प्यायला गेलेल्या हरणाच्या पाडसाला वाचवतात. तेव्हापासून तर त्याला मोठे होण्याची खूपच घाई झालेली असते. कारण हरणाची पिल्ले टुणुक टुणुक उड्या मारतात. तशा उड्या अप्पूला मारायच्या आहेत. पण त्याची आई त्याला सांगते की, "कोणाशीही आपली तुलना करू नये. कोणताही एक जीव दुसऱ्यासारखा नसतो."
जंगलात निघालेल्या अप्पूला रस्त्यात एक मंदिर दिसते. मंदिरातील पुजारी त्याच्या कपाळावर त्रिशूल काढतो. तेव्हा अप्पू खूप मनमौजीपणे उड्या मारतो. रस्त्याने जाताना कण्णनच्या घरासमोर खेळणाऱ्या मुलींसोबत तो खेळू लागतो. सोंडेने रिंग फेकतो. फुटबॉल खेळतो. त्याला मानवी मुलांप्रमाणे व्यायाम करायची इच्छा होते. त्याला झोका खेळायचा असतो. सी-सॉ खेळायचा असतो. टायर खेळताना त्यात अडकून त्याची फजिती होते. असा हा अप्पू लहान मुलांसारखा सदैव धडपडत असतो.
या कादंबरीत अप्पू लहान मुलांसारखे खेळ खेळण्याचा प्रयत्न करतो. लहान हत्तींना एकामागोमाग एक उभे करून आगीनगाडीचा खेळ करतो. त्यालाही इतर मोठ्या हत्तींसारखे झाड उपटून काढायची इच्छा आहे, पण ते जमले नाही. त्याच्या पाठीवर बगळा बसला, तरी त्याला तो जड वाटू लागतो. अप्पू सर्कशीतल्यासारखी सायकल चालवतो.
जेव्हा अप्पू मोठा आडदांड हत्ती होतो. भरदार छाती, भव्य कपाळ, खांबासारखे जाडजूड पाय, तेव्हा माहूत त्याच्या पायात कडी आणि साखळदंड घालतो. एक दिवशी एक मोठा ट्रक अप्पूला न्यायला येतो. त्याला आंघोळ घातली जाते. गंध लावला जातो. हार घातला जातो. अप्पूला एका मंदिरासाठी दान केलेले असते. शेवटी अप्पू मंदिराकडे जातो. सगळे त्याला 'देवाचा हत्ती' म्हणतात. त्याचे दर्शन घेऊन त्याला खाऊ देतात. पण तरीही अप्पू मंदिराच्या दारात शिबिरातील त्या सुंदर दिवसांची आठवण काढत अस्वस्थ होतो. आठवणीने झुरत राहतो. अप्पूचे असे मनोहारी बालपण रेखाटणारी ही कादंबरी बालवाचकांना निखळ आनंद मिळवून देते. लहान मुलांना हत्तींच्या जीवनाशी जोडते. हत्तींप्रति प्रेम, जिव्हाळा आणि सहानुभूती बाळगण्याची संधी प्रदान करते. हत्ती या प्राण्याची जीवनशैली आणि जीवनानुभव प्रस्तुत करते.बालसाहित्यात प्राणीविश्वाची भूमिका काय? प्राचीन काळापासून प्राणीविश्व आपल्या आयुष्याचे अभिन्न अंग का राहिले आहे? याचा शोध घेताना असे जाणवते की, मानव प्राण्यांव्यतिरिक्त इतर प्राण्यांचे लहान मुलांना भारी आकर्षण वाटते. हे आकर्षण मनोवैज्ञानिक आहे. मानवी भेदांच्या पलीकडे जाण्याची क्षमता या प्राणीविश्वात आहे. बालकुमारांना पृथ्वीतलावरील प्राण्यांची भूमिका आणि त्यांचे जीवन जाणून घेण्याची तीव्र इच्छा असते. बालसाहित्यात प्राणीविश्व लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे लहान मुले प्राण्यांशी भावनात्मकरीत्या जोडली जातात. ते आपल्या भावना प्राण्यांशी जोडण्याचा प्रयत्न करतात. ही भावनात्मकता मुलांमध्ये सहानुभूती आणि आत्मजागृती विकसित करण्यास मदत करते. प्राणीविश्वाच्या अनुभवाच्या माध्यमातून ते आपल्या भावना ओळखतात आणि समजून घेतात. प्राणीविश्वाच्या माध्यमातून मुलांच्या कल्पना आणि रचनात्मकता विकसित होतात.
लेखक बालसाहित्यातील प्राण्यांचे मानवीकरण करतो. प्राण्यांना मानवी गुण आणि क्षमता देऊन लेखक एक अशी अद्भुतरम्य दुनिया उभी करतो, की जेथे काहीही शक्य आहे. वास्तवाच्या सीमा ओलांडून मुले विचार करण्यास प्रेरित होतात. बालसाहित्यातील प्राणीविश्वामुळे मुलांच्या कल्पना वाढीस लागतात. प्राण्यांचे काल्पनिक खेळ मुलांमध्ये संज्ञानात्मक विकास घडवतात. मुलांचे समस्या - समाधान, रचनात्मकता आणि अमूर्त विचार विकसित करतात.
अवखळ अप्पू' या कादंबरीतील अप्पूच्या खोड्या पाहून आणि वेळोवेळी होणारी त्याची फजिती पाहून मुलांमध्ये हास्य पिकते. काहीतरी गमतीशीर, मजेशीर वाचल्याचा त्यांना आनंद मिळतो. अप्पूच्या ठिकाणी ते स्वतःला पाहू लागतात. झाडावर चढण्यासाठी अप्पूची होणारी कसरत मुलांच्या ओठांवर हास्य फुलविते. नदीच्या काठावर पसरलेल्या बागेमध्ये उडणारी फुलपाखरे पाहून अप्पूलाही फुलपाखरू व्हावेसे वाटते. एक मोठे फुलपाखरू! तेच फुलपाखरू जेव्हा अप्पूच्या डाव्या डोळ्यावर बसते, तेव्हा त्याला सोंडेने उडवू, की शेपटीने उडवू अशी त्याची द्विधा अवस्था होते. खरे तर लहान मुले अशा गमतीजमतींमध्ये हरवून जातात. हरखून जातात. डॉ. सुरेश सावंत 'अवखळ अप्पू' या कादंबरीत अप्पूचे बालपण लहान मुलांच्या नजरेतून पाहतात. पण ते कुठेही प्राणीविश्वाशी विसंगत होणार नाही, याची काळजी घेतात आणि अप्पूला लहान मुलांचा मित्र बनवतात. परिस्थितीचे आणि प्रकृतीचे वास्तव नैसर्गिक परिवेशातून रेखाटल्यामुळे ही कादंबरी निसर्गसौंदर्य आणि निसर्गातील विविधता यांना उजागर करते.
'अप्पू' या हत्तीच्या पिल्लाबरोबरच निसर्गातील अनेक पशुपक्षी कथानकाच्या अंगाने येतात. त्यामध्ये वानर, मगर, खारुताई, टिटवी, पोपट, बदक, यांचीही ओळख प्रत्येकाच्या स्वभावानुसार मुलांना होते.
'अवखळ अप्पू' ही कादंबरी लहान मुलांना प्राण्यांविषयी आकर्षण तर शिकवतेच, पण प्राण्यांवर प्रेम करायला शिकवते. अशा मनोरंजक बालसाहित्यातूनच मुलांचा भाषिक विकास होतो. त्यांची भावनिक साक्षरता विकसित होते. मानव आणि प्राणी यांच्यातील परस्परसंबंध शिकवते. प्राणीविश्वातील संवाद आणि प्राण्यांची शब्दावली मुलांना माहिती होते.
बालसाहित्यातून कोणत्याही प्राण्याचे समावेशी चरित्र वाचताना लहान मुलांमध्ये सहानुभूती आणि समज विकसित होते. प्राण्यांचा सहज स्वभाव आणि अनुभव पाहून लहान मुलांमध्ये आनंद, दुःख, भीती, प्रेम अशा भावना विकसित होतात. प्राण्यांविषयीच्या करुणेत सहभागी होऊन लहान मुले आपल्या आजूबाजूच्या दुनियेशी जोडली जातात.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही भाषेतील, कोणत्याही बालसाहित्यात रेखाटलेले प्राणीविश्व सांस्कृतिक आणि भौगोलिक सीमा ओलांडून पलीकडे जाते. असे देशांच्या सीमा ओलांडून, बालसाहित्य अनुवादित होऊन जगभरातील मुलांपुढे गेले, तरी त्यांना ते बालसाहित्य आपलेच वाटते. प्राणीविश्वाची शाश्वत प्रकृती जगभरातील मुलांमध्ये सांस्कृतिक सेतूची भूमिका पार पाडते. त्यादृष्टीने 'अवखळ अप्पू' ही बालकादंबरी निर्विवाद यशस्वी झाली आहे. अनुवादित होऊन जागतिक स्तरावर जाण्याची क्षमता ह्या बालकादंबरीत आहे. बालसाहित्यकार म्हणून डॉ. सुरेश सावंत यांचे हे यश अतिशय लखलखीत आहे!
- अवखळ अप्पू (बालकादंबरी)
- लेखक : डॉ. सुरेश सावंत
- प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन, पुणे.
- मुखपृष्ठ व सजावट : विजयकुमार चित्तरवाड
- संपूर्ण रंगीत पृष्ठे ८० किंमत रु. २३०
- पुस्तक परिचय :
- प्रा. साईनाथ पाचारणे, खेड, राजगुरुनगर (पुणे)

COMMENTS