नांदेड / प्रतिनिधी
साहित्य अकादमी या केंद्रीय साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्यासाठी दिला जाणारा पुरस्कार नांदेड येथील सुप्रसिद्ध बालसाहित्यकार तथा शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या 'आभाळमाया' या संग्रहाला जाहीर झाला आहे. हा सन्मान प्राप्त झाल्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी निवासस्थानी जाऊन लेखक डॉ. सावंत यांचा विद्यापीठाच्या वतीने हृद्य सत्कार केला. विद्यापीठाचे मराठी भाषा विभाग प्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर यांची यावेळी प्रमुख उपस्थित होती.
डॉ. सुरेश सावंत यांच्या निवासस्थानी दिलेल्या सदिच्छा भेटीत कुलगुरू डॉ. चासकर यांनी बालकुमार साहित्याचे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत असणारे योगदान याविषयी सविस्तर चर्चा केली. तसेच डॉ सावंत यांचे शैक्षणिक व वाङ्मयीन योगदान जाणून घेतले.
डॉ. सावंत यांना प्राप्त झालेला साहित्य अकादमीचा सन्मान हा नांदेडच्या साहित्यविश्वाचा लौकिक वाढवणारा असून नवे लेखक-कवी यापासून प्रेरणा घेतील, असा विश्वास कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी यावेळी बोलून दाखवला.
डॉ. पृथ्वीराज तौर यांनी डॉ. सावंत यांच्या बालसाहित्य व बालशिक्षणाच्या क्षेत्रातील कार्याचा गौरव केला. सानेगुरुजींच्या बालनिष्ठेने डॉ. सावंत यांनी ह्या दोन्ही क्षेत्रात केलेले कार्य मराठवाड्यासाठी भूषणावह आहे, असे ते म्हणाले.
डॉ. सुरेश सावंत यांनी सत्काराला उत्तर देताना विद्यापीठाशी मागील तीस वर्षांपासून असलेले ऋणानुबंध व्यक्त केले, तसेच विद्यापीठाविषयी कृतज्ञता भाव व्यक्त केला.
या सत्काराच्या वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. मथु सावंत, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. संकेत सावंत हे उपस्थित होते.
addComments
टिप्पणी पोस्ट करा