प्रतिनिधी- महेंद्र पुरी, हिंगोली
हिंगोली जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतुन जिल्ह्यात "जननी" अभियान राबविण्यात येणार असुन या बाबत सर्व पोलिस अधिकारी यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी सर्व ठाणे हद्दीतील गावांमध्ये "जननी महिला सक्षम समाज" अभियान राबविण्याचे ठरविले आहे. या अभियानाची सुरूवात 6 एप्रिल पासुन होणार आहे. बुधवारी शहरातील शिवाजीराव देशमुख सभागृहात दुपारी 4 वाजता "जननी अभियानाचे " उद्घाटन जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख मान्यवरांमध्ये खासदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, आ.तानाजी मुटकुळे, आ.राजु नवघरे, आ. विक्रम काळे, आ.सतीश चव्हाण, आ.विप्लव बजोरीया, आ.संतोष बांगर आदी लोकप्रतिनिधी सह, नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संजय दैने, हिंगोली राज्य राखीव दलाचे समादेशक संदीप सिंह गिल यांची उपस्थिती राहणार आहे.
या अभियाना अंतर्गत प्रत्येक गावात पोलिस अधिकारी कर्मचारी जाऊन विडिओ प्रजेंन्टेशन, बँनर, पोस्टर, व समुपदेशन करून महिलांच्या कायद्याविषयी जनजागृती करणार आहेत. तसेच स्त्रीभ्रुन हत्या, महिला अत्याचार, नाबालीक, विवाहित, विधवा, परित्यक्ता, व्रद्ध महिला, महिला व बालकाचे लैंगिक शोषण, मानसिक व अर्थीक शोषण, अत्याचार पिडीत महिला आदींची जनजागृती पोलिस विभागाचे वतीने करण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील ज्या गावात एकटी व्रद्ध महिला राहत असेल जिला कोणी नातेवाईक नसेल अशा महिलांच्या महिला पोलिस कर्मचारी संपर्कात राहणार आहेत. तसेच रोजंदारी करणारी महिलांसोबत होणारे अत्याचार, बालकाचे शोषण,जादुटोणा, विनयभंग आदीविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात ही विद्यार्थीनींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मुलींसोबत कुठलीही छेडछाड झाल्यास हेल्पलाईन नंबरवर संपर्क केल्यास अवघ्या दहामिनीटात पोलीस मदतीसाठी घटनास्थळी पोहचणार आहेत. याबाबत जिल्ह्यातील तेरा पोलिस ठाण्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षक कार्यालयात दोन दिवस प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच अभियानाचा डेमो सेनगाव तालुक्यातील बन बरडा गावात घेण्यात आला असुन याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतुन सदर अभियान यापुर्वी अकोला जिल्ह्यात राबविण्यात आले होते. आता हिंगोली जिल्ह्यात ही राबविण्यात येणार आहे. महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी जननी अभियान जिल्ह्यात प्रभावी पणे राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक कलासागर यांनी दिली आहे. तर जिल्ह्यात सदर अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपाधिक्षक विवेकानंद वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ठाणेदार प्रयत्न करीत आहेत. जननी अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी जास्तीत जास्त महिला, युवतींनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले आहे.

COMMENTS