नांदेड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून १०६ टक्के 'महसूल वसूली'ची उद्दिष्ट पुर्ती

 


१७७ कोटींचे महसूल वसूलीचे उद्दिष्ट असताना 

प्रत्यक्षात तब्बल १८८ कोटींची 'महसूल' वसूली


नांदेड.(विशेष प्रतिनिधी) 'कोरोना'सारख्या महामारीच्या कालावधीतही नांदेड येथील 'आरटीओ' अर्थात प्रादेशिक परिवहन कार्यालय महसूल वसूलीच्या प्रक्रियेत मागे राहिलेले नसून, तब्बल १८८ कोटी रूपयांची महसूल वसूली करून नांदेड विभागाने १०६ टक्के 'उद्दिष्ट'पुर्ती केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने नांदेड येथील 'आरटीओ' तथा प्रादेशिक परिवहन विभागाला (२०२१-२०२२) या आर्थिक वर्षाकरिता १७७ कोटींचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. दरम्यान, नांदेड येथील प्रादेशिक परिवहन विभागाने २०२१-२०२२ आर्थिक वर्षात १८८ कोटी रूपयांची महसूल वसूली करून उद्दिष्टपुर्ती केली आहे. उपरोल्लेखित महसूल उद्दिष्टपुर्तीकरिता नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, परभणी व हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांचे सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले असल्याचे नांदेड येथील 'आरटीओ' तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.  

विशेष बाब म्हणजे, शासनाने १७७ कोटींचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना नांदेड विभागाने १८८ कोटींची महसूल वसूली करत १०६ टक्के उद्दिष्टपुर्ती केली आहे. याशिवाय फ्लाइंग स्कॉड अर्थात 'आरटीओ'च्या वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक आणि त्यांच्या सर्व सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वाहन अंमलबजावणी तथा वाहन तपासणी मोहिमेदरम्यान, एकूण १३ हजार ४२० दोषी वाहन धारकांकडून तब्बल ६९६ लाख रूपयांची दंडात्मक वसूली केली आहे. याशिवाय, नांदेड येथील परिवहन कार्यालयाने आकर्षक नोंदणी 'क्रमांका'च्या माध्यमातून एकूण २ हजार १८४ वाहन धारकांकडून अधिकृतपणे तब्बल १६८ लाख रूपयांचा महसूल प्राप्त केला आहे. 

सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे, कोरोना या साथरोगाच्या महामारीचे कालावधीतसुध्दा नांदेड प्रादेशिक परिवहन विभागाने मागील तीनही आर्थिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी केली असून, राज्य शासनाकडून देण्यात आलेले महसूल वसुलीचे उद्दिष्ट अगदी १०० टक्के पूर्ण केले आहे. महसूल वसुलीच्या उद्दिष्टपुर्तीसाठी परभणी व हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने अगदी चोखपणे कामगिरी बजावण्यात आली असल्याचे सांगून, चालू आर्थिक वर्षातदेखील महसूल वसुलीसाठी आपण पूर्णपणे प्रयत्न करणार ळअसल्याचेही नांदेड येथील आरटीओ तथा प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या