मुखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागनाथराव सटवाजीराव रावणगावकर यांचा जन्म दि. ४ जानेवारी १९५० रोजी रावणगाव (ता. मुखेड) येथे ...
मुखेड विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार नागनाथराव सटवाजीराव रावणगावकर यांचा जन्म दि. ४ जानेवारी १९५० रोजी रावणगाव (ता. मुखेड) येथे झाला. त्यांचे सातवी पर्यंतचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या जन्मगावी म्हणजेच रावणगाव (ता. मुखेड. जि. नांदेड) येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण 'मानव्य' विकास विद्यालय, देगलूर येथे झाले. याशिवाय, 'पदवी'पर्यंतचे शिक्षण त्यांनी देगलूर महाविद्यालय देगलूर येथे घेतले. दरम्यान, १९७३ साली ते विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपदही भूषविले आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी वक्तृत्व कलेत व अभ्यासात निपून होते. त्याचकाळामध्ये १९७४ मध्ये मुक्रमाबाद जिल्हा परिषद गटाची निवडणूक लागली. त्यावेळी, हा मतदार संघ 'एस.सी' अर्थातच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव होता. मुखेड तालुक्यात या निवडणूकीला उभे राहण्यासाठी उमेदवार मिळत नव्हता. तेव्हा त्यांच्या गावातील पुढारी आणि मित्र मंडळींनी नागनाथराव यांना या निवडणूकीसाठी प्रोत्साहन देवून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यावेळी, त्यांच्या विरोधात कंधार तालुक्यातील घोडजकर हे उभे होते. त्याचवेळी, रावणगावकर यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजय मिळविला. १९७४ ते १९७९ पर्यंत ते नांदेड जिल्हा परिषदेत समाज कल्याण विभागाचे सभापती म्हणून काम पाहिले.१९७९ला ते जांब या गटातून निवडून आले. १९७९ ते १९८१पर्यंत पुन्हा ते जि. प.अंतर्गत समाज कल्याण विभागाचे सभापती झाले. दरम्यान, १९८० साली शरद पवार यांचे नेतृत्वाखाली 'पुलोद'कडून मुखेड विधासभा मतदारसंघातून निवडणूक लढवली व ते त्यावेळी विजयीही झाले. दरम्यानच्या काळात त्यांची महात्मा फुले विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून निवड झाली. १९८० ते १९८५ पर्यंत ते अध्यक्ष राहिले. तद्नंतर १९८५ ते २०१०पर्यंत खरेदी विक्री संघ, मुखेडचे अध्यक्ष राहिले. १९९५ ते २००० पर्यंत ते 'गोदावरी' मानार सहकारी साखर कारखाना,शंकरनगरचे संचालक राहिले. आपल्या ३६ वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये अत्यंत स्वच्छ आणि निस्पृहपणे रावणगावकर यांनी कारभार पाहिला.शरदचंद्र पवार यांचे 'ते' सच्चे तथा एकनिष्ठ कार्यकर्ते होते.पुलोदच्या निर्मितीपासून ते अखेरपर्यंत शरद पवार यांच्याशी नागनाथराव रावणगावकर हे एकनिष्ठ राहिले. अत्यंत संयमी, निष्कलंक, मनुष्यप्रेमी रावणगावकर यांनी अखेर २ ऑगस्ट २०२१रोजी सकाळी जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.



COMMENTS