धर्माबाद (अहमद लड्डा) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून यंदाच्या दहावी व बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र या परीक्षांसाठी मंडळाने विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. परंतु परीक्षाच न घेतल्याने आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत अशी विनंती वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष नांदेडभूषण प्रा. नितीन दारमोड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र लॉकडाऊन असताना आणि आर्थिक गर्तेत सापडलेले असतांनाही अनेक पालकांनी आपल्या पाल्याचे शिक्षण थांबू दिले नाही. परीक्षा रद्द केल्याने आकारण्यात आलेले परीक्षा शुल्क राज्य सरकारने परत केल्यास कोरोनाच्या काळात आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या सर्व पालकांना ही मदत सहाय्याची ठरेल, अशी विनंतीवजा मागणी प्रा. नितीन दारमोड यांनी केली आहे.

COMMENTS