प्रतिनिधी- महेंद्र पुरी.
हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा शिवारात वृद्ध महिलेचा मृतदेह अर्धवट स्थितीत पुरल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर याप्रकरणी पोलीस विभागाच्या वतीने कसून तपास करण्यात आला. ज्यामध्ये अटक केलेल्या आरोपीकडून मागील वर्षीच्या खूनाची देखील कबुली मिळाली आहे.
दिनांक 10 एप्रिल रोजी सेनगाव तालुक्यातील साखरा येथील गायरान शिवारामध्ये वृद्ध महिलेचे प्रेत अर्धवट स्थितीत पुरल्याचे आढळून आले होते.
सदर महिला भारजाबाई इंगळे, वय 82 वर्ष, राहणार साखरा येथील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी सेनगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या अंगावरील दागिने गायब असल्याचे समोर आल्यानंतर हा प्रकार लुटण्याच्या उद्देशाने झाल्याचा अंदाज पोलिसांना होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या व सेनगाव पोलिसांच्या पथकाने तपासाची चक्रे फिरविली. संशयित असलेल्या दिलीप अंबादास लाटे, वय 32 वर्ष, राहणार साखरा, तालुका सेनगाव यास ताब्यात घेतले. दिलीप याची कसून चौकशी केली असता भारजाबाई इंगळे यांचा खून आपणच केल्याचे त्याने मान्य केले.
सदर महिलेस झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिला बेशुद्ध करून तिच्या डोक्यात दगड घालून खून करीत प्रेत माळरानावरील खड्ड्यात पुरल्याची माहिती देखील त्याने सांगितली. याचबरोबर मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये साखरा गावातील मनकर्णाबाई सरुळे यांचादेखील दागिने लुटण्याच्या उद्देशाने घरात घुसून रात्रीच्या वेळी सरकारी योजनेची माहिती सांगण्याचा बहाणा करीत डोक्यात दगड घालीत खून केल्याची कबुली दिलीप याने पोलिसांना दिली. दिलीप पोलीस मित्र म्हणून यापूर्वी पोलिसांना विविध स्वरूपाची माहिती उपलब्ध करून देत असे. त्यामुळेच मागील गुन्ह्याच्या नंतर त्याने पोलिसांना दिशाभूल करण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिली होती. शिवाय तहसील कार्यालय परिसरात त्याचा नियमित वावर असे. अशी माहिती पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक उदयन खंडेराय, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, किशोर पोटे, बालाजी बोके, विलास सोनवणे, संभाजी लेकुळे, भगवान आडे, विठ्ठल कोळेकर, किशोर कातकडे, राजू सिंग ठाकूर, शंकर ठोंबरे , ज्ञानेश्वर सावळे, किशोर सावंत आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. पथकाच्या यशाबद्दल पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी त्यांचे कौतुक केले असून यासंदर्भात लवकरच बक्षीस जाहीर करण्यात येईल असेही ते म्हणाले.

COMMENTS