अजीम नवाज राही हे मराठीतील एक महत्त्वाचे कवी आहेत. यापूर्वी त्यांचे 'व्यवहाराचा काळा घोडा', 'कल्लोळातला एकान्त', 'वर्तमानाचा वतनदार' आणि 'तळमळीचा तळ' हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले होते. 'वळिवाच्या वेळा' हा त्यांचा नवीन कवितासंग्रह अथर्व पब्लिकेशन्सने २०२५मध्ये प्रकाशित केला आहे.
हा कवितासंग्रह म्हणजे कवीचे काव्यमय आत्मकथनच आहे.
'थरथरणार्या विजेसारखी लवलव
बसू देत नाही स्वस्थ
आयुष्याच्या मुळावर उठला कवितेचा छंद
झोपेतून दचकून जागे करते
रोज एक कविता असंबद्ध' (पृष्ठ १४२)
इतके ह्या कवितेने कवीच्या आयुष्याला वेढून टाकले आहे. किंबहुना कवी आणि कविता एकजीव झाले आहेत.
कवीला ह्या गोष्टीची जाणीव आहे, की
'माझी कविता खेळतच नाही
अक्षरांच्या सागरगोट्यांचा खेळ
वेळ मिळेल तेव्हा
वास्तवाच्या गाभ्यात
गिरमिटासारखी घुसते आरपार' ( पृष्ठ ७)
हा कवीने आपल्या कवितेविषयी व्यक्त केलेला आत्मविश्वास आहे. ही कविता गिरमिटासारखी वाचकाच्या मेंदूत घुसते आरपार, यात काही शंकाच नाही.
आपल्या कवितेची ओळख करून देताना कवी लिहितो,
'मी कविता लिहितो म्हणजे
रचत नाही शब्दांची उतरंड निरर्थक
सोलून काढतो स्वतःला अंतर्बाह्य
मनासारखं कोसळलो नाही कागदावर
तर स्वतःवर उगारतो आसूड कैक वेळा
पाळले आजवर सृजनाचे कायदे सक्त
कणभर अभिव्यक्तीसाठी जाळले मणभर रक्त'. (पृष्ठ १३)
हा संग्रह वाचल्यावर आपल्याला कवीच्या ह्या शब्दांची प्रचिती येते. ह्या निर्मितीप्रक्रियेत कवीने स्वतःला अक्षरशः सोलले आहे, याची खातरी पटते.
ह्या कवितेच्या माध्यमातून कवीने
'कागदाचा शिवार समृद्ध करणारी
मानसन्मानाच्या कणग्या भरणारी
सृजनाची सुगी बारमाही' (पृष्ठ १८)
अनुभवली आहे. याचे कवीला समाधान आहे.
आपल्या कवितेचे वेगळेपण सांगताना कवी लिहितो :
'एक बरे झाले
माझ्या कवितेला जडली नाही
गतकाळाची क्लेशदायी
रेवडी चघळण्याची सवय
शब्दांनी टाळला जखमा कुरवाळत बसण्याचा
ऊर बडवण्याचा कंठाळी मार्ग
तिच्या सोशिकतेचा पदर धरून
वावरलो व्यवहारी दुनियेत शांत, सोशिक'. (पृष्ठ २०)
अजीम नवाज राही यांच्या कवितेला गतकाळात रमण्याची, जखमा कुरवाळण्याची आणि ऊर बडवण्याची सवय नाही, ही मोठीच गोष्ट आहे!
कधी 'निर्मितीशून्य दिवसांच्या गिधाडांनी मनसोक्त तोडले प्रसवसुलभ जाणिवांचे लचके' तरी कवी खंत करत बसत नाही, हे विशेष!
'स्वतःला खणत गेलो खोल खोल
ओल लागली तेव्हा कुठे कवितेची' (पृष्ठ २२)
हा कवीचा धीरोदात्त काव्यानुभव आहे.
कधीतरी कवी आपल्या काव्यजीवनाचा उल्लेख
'ही चाळीस वर्षीय शाब्दिक हमाली' असाही करतो.
कविता आपल्या आयुष्यात नसती, तर काय झाले असते, याचाही हिशेब कवीने एका कवितेत मांडला आहे.
'कविता नसती तर
कुठे असतो मीही
खितपत पडलो असतो
गावच्या काळोख्या कोपर्यात कुजत
मोजदादविरहित जगणे
पडले असते पदरात कायमस्वरुपी
विनाकारण उगवला असता दिवस
अंगणात उतरली असती
संवेदनाशून्य सांज रिकामटेकडी'. (पृष्ठ २८)
आपल्या आयुष्यात कविता नसती, तर काय झाले असते याबद्दल कवीने आणखी एका ठिकाणी लिहिले आहे :
'कविता नसती तर
असतो कुठे मीही
आयुष्यावर पसरली असती
अस्तित्वशून्यतेची झाकोळ विनासायास
मोहल्ल्याच्या एका कोपर्यात
खितपत पडले असते घर माझे'. (पृष्ठ ६२)
शेवटी कवितेच्या समृद्ध करणा-या, आश्वासक सहवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना कवी म्हणतो :
'आता समरसून गेली कविता माझ्यात
अन् मी कवितेत
प्रत्येक वादळवा-यात तगतोय
कविता झाली प्राणवायू म्हणून जगतोय'. (पृष्ठ २९)
कवीच्या आयुष्यात कवितेला प्राणवायूचे स्थान लाभले आहे. कारण जीवनातील कठीण प्रसंगात याच कवितेने साथ दिली आहे.
कवी जिथे राहतो, त्या मोहल्ल्यातील वातावरण कवीच्या सृजनासाठी फारसे अनुकूल नाही. इथे गोंधळ आहे, गजबज आहे, गोंगाट आहे, कोलाहल आहे, म्हणून कवीने :
'निर्मितीविषयक गुंतागुंत समजण्याइतपत
प्रगल्भ नाही परिसर रहिवासाचा' (पृष्ठ १३२)
ह्या शब्दांत आपली खंत व्यक्त केली आहे. तरीसुद्धा आपल्या मनाची समजूत घालताना कवी लिहितो :
'माझ्यासाठी गोंगाट
काव्यपोषक मालमत्ता आहे
गोंगाटाच्या वाळलेल्या हातात
सृजनसुलभ शक्यतांचा पत्ता आहे'. (पृष्ठ १०२)
ही कवीने प्राप्त परिस्थितीशी केलेली तडजोड आहे. तथापि कवीच्या अंतःकरणातील भळभळती वेदना ह्या कवितेतून वाहती झाली आहे. संयतशीलता हा ह्या कवितेचा स्थायीभाव असला, तरी ह्या कवितेत भावानुभवाची आर्तता जाणवते.
कवीने ज्या पर्यावरणात जीवन व्यतीत केले, त्या ठिकाणचे 'कळपाचे तत्त्वज्ञान' कवीला ज्ञात आहे. तेथील परिस्थितीविषयी कवी लिहितो :
'ज्याची टोळी भारी
तोच म्हाळ्या करतो जंगलावर राज्य'. (पृष्ठ ९)
कवीचे हे निरीक्षण अतिशय वस्तुनिष्ठ आहे.
'समंजस त्यांचा कैफ, समंजस त्यांची मस्ती' अशा उपरोधिक शब्दांत त्यांनी ह्या कळपांचे आणि टोळ्यांचे तत्त्वज्ञान अधोरेखित केले आहे. हे भल्याभल्यांना समजत नाही, म्हणून कवी म्हणतो :
'टोळक्यात शिरू पाहणाऱ्यांच्या
टाळक्यात बसला नाही अद्याप
एकसंध कळपातला अंतर्गत खेळ'. (पृष्ठ १२)
'टोळके' आणि 'टाळके' ह्या दोन शब्दांचा प्रास साधत कवीने ह्या टोळीयुद्धावर नेमकेपणाने बोट ठेवले आहे.
टोळ्यांच्या साम्राज्यावर झगझगीत प्रकाश टाकताना कवीने लिहिले आहे :
'टोळ्यांचेच असते अधिराज्य गावावर
टोळ्यांच्याच आदेशाबरहुकूम
गाव करत असते हालचाली बिनदिक्कत
टोळ्यांचाच असतो जल्लोष सणावाराचा' (पृष्ठ १३४)
सभोवताली असे टोळके, टोळ्या आणि कळप असतानासुद्धा कवीने
'घातले नाही कधी
कळपातल्या सुरक्षित रहिवासाला खतपाणी
एकलेपणाचा केला नाही बाऊ
कळपाचे शिष्यत्व पत्करून
करून घेतला नाही कोंडमारा भावनिक' (पृष्ठ ७३)
याचे कवीला मानसिक समाधान आहे. समाधान याचेही आहे, की कवीने कधीही शहामृगासारखा रेताडात सुरक्षित लपण्याचा प्रयत्न केला नाही.
कवीच्या आयुष्यात असेही दिवस आले, की
'जेव्हा उद्ध्वस्त झाल्या होत्या स्वप्नांच्या वसाहती
होत्याचे नव्हते झाले कित्येक वेळा
तशी केली जगण्याची नव्याने मांडामांड' (पृष्ठ १११)
म्हणूनच जगण्याचे तत्त्वज्ञान सांगताना कवी लिहितो :
'नापिकीतून उचलावी लागते रसद हिमतीची
चिघोर उमेदीचा गळू द्यायचा नसतो
प्रतिकूलतेच्या वादळवा-यातही
फळाला येते मशागत'. (पृष्ठ ११९)
'वळिवाच्या वेळा' वाचत असताना कवीची मशागत फळाला आली, याची खातरी पटते.
कवीच्या आणि कवी जिथे राहतो, त्या मोहल्ल्याच्या वाट्याला वारसाहक्काने कष्टाळू जिणे आले आहे. त्याबाबत कवीची अजिबात तक्रार नाही. कवीच्या भोवती 'धास्तीच्या वावटळी फेर धरून नाचणा-या, पण आतले आत्मविश्वासी बुरूज सहीसलामत आहेत'. (पृष्ठ १८) हा केवढा दिलासा आहे!
प्रतिकूल परिस्थितीतही कवीने स्वतःवरचा आणि आपल्या कवितेवरचा विश्वास ढळू दिलेला नाही, हे महत्त्वाचे! 'तुटपुंज्या मिळकतीचा चेहरा समोर दिसत असला, तरी रेंगाळत राहिली गर्भश्रीमंतीची जाणीव संगमरवरी' (पृष्ठ २९) हा कवीचा जीवनानुभव आहे. परिस्थितीचे चटके सहन करत असताना उपजीविकेसाठी स्थलांतराची वेळ आली, पण भावविश्वाचे भरणपोषण करणारी गावची मायाळू माती कवीला सोडवली नाही. कारण स्थलांतर म्हणजे पलायनवाद आहे, असे कवीला वाटते.
कवीच्या आयुष्याला स्थैर्य कधी लाभलेच नाही.
'आयुष्यगडाच्या अठ्ठावण्णाव्या पायरीवर
दिवस असतो
कधी जात्यात, तर कधी सुपात
स्थिरनिश्चिंतता आजवर
जमा झाली नाही खात्यात आयुष्याच्या' (पृष्ठ ४८)
अशा शब्दांत कवीने आपल्या आयुष्याचा ताळेबंद मांडला आहे.
रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असे आयुष्य कवीच्या वाट्याला आले आहे. म्हणून कवी म्हणतो :
'दैनंदिनी रोज नवनव्या जखमांची दुनिया थाटते
मनासारखा घाव झाला नाही की
चुकल्याचुकल्यासारखे वाटते'. (पृष्ठ ७०)
यातून कवीचा जिगरबाजपणा दिसून येतो.
हलाखीच्या परिस्थितीत कवीने एकान्त ते लोकांत आणि लोकांत ते एकान्त असे सगळे अनुभव पचवले, रिचवले. पण त्यांचा सराईत सबुरीचा कणा कधी ढळला नाही. कारण कवितेमुळे त्यांच्या मनाचे भांडे हर्षाने शिगोशिग भरलेले होते.
अभावग्रस्त जीवनात उधारी आणि उसनवारी ह्या दोन गोष्टी नाइलाजाने स्वीकाराव्या लागतात. उधारी आणि उसनवारी यांच्या मर्यादा सांगताना कवीने लिहिले आहे :
'उधारी कासवगतीने शिरते आयुष्यात
हळूहळू फुटतात तिला हरिणाचे पाय
उसनवारीच्या दुधावर येत नाही कधी
आत्मिक समाधानाची चमचाभर साय'. (पृष्ठ ८७)
कवीला समकाळाची आणि सभोवतालाची फारच सखोल जाण आहे. कवीचे निरीक्षण आणि आकलन अतिशय स्वच्छ आहे. समकाळाची असंवेदनशीलता वर्णन करताना कवीने लिहिले आहे :
'पॉलिथीन अंथरलेले तलाव
देत नाहीत ओंजळभर पाणी तहानलेल्यांना
वा झिरपू देत नाहीत छिटाभर ओल
थेंबाथेंबासाठी तरसणा-या तळासाठी'. (पृष्ठ १३६)
हा 'आहेरे' वर्गाचा 'नाहीरे' वर्गासाठीचा कोरडेपणा निश्चितच संतापजनक आहे. 'थेंबभर' ह्या प्रमाण भाषेतील शब्दासाठी कवीने वापरलेला 'छिटाभर' हा शब्द फारच अन्वर्थक आहे! हे वर्णन वाचल्यावर कवीच्या 'आटत चालले आहेत जाणिवांचे ओहोळ' ह्या शब्दाची पुन:पुन्हा प्रचिती येते.
मोहल्ल्यातील काही लोक 'जखमी साळुंकीच्या पावलावर आंबीहळद चोळतात पोटच्या लेकरासारखी' (पृष्ठ ३८) ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे.
'सध्या काळ झालाय
झापड बांधलेला टांग्याचा घोडा' (पृष्ठ ५१) हे कवीचे निरीक्षण वस्तुस्थितीचे निदर्शक आहे.
काही लोक सुख शोधण्यासाठी पर्यटनाचा मार्ग निवडतात. त्यामागच्या मानसिकतेचे विश्लेषण करताना कवीने लिहिले आहे :
'आबाद असली पाहिजे दुनिया आतली
मग करमते वाळवंटातही निर्विवाद
गाठीशी असलेल्या विरंगुळ्याला उबगतात
काही लोक जगभराच्या पर्यटनाला निघतात'.
यावरचा साधासोपा उपाय सांगताना कवीने लिहिले आहे :
'कमी होत नाही तीव्रता दु:खाची बदलल्याने जागा
हाती आला पाहिजे दु:खाच्या कारणांचा धागा'.
(पृष्ठ १२५ आणि १२६)
ह्या ओळी वाचल्यावर, कवीने घेतलेला मानवी सुखदु:खाचा शोध सत्कारणी लागला, असेच म्हणावेसे वाटते. सामाजिक आणि सांस्कृतिक पर्यावरणाचा ह्या कवितेतून झालेला आविष्कार मोठाच विलोभनीय आहे!
१४२ पृष्ठांच्या ह्या संग्रहात एकूण ६५ कविता आहेत. ह्या सर्वच कविता मुक्तछंदात असल्या, तरी ह्या कवितेला एक आंतरिक लय आहे, ओघ आहे, नाद आहे, गती आहे आणि तालही आहे. ह्या कवितेला आलंकारिकतेचा अजिबात सोस नाही. यमकांचा मुळीच मोह नाही. काही ठिकाणी सहज साधत असलेल्या यमकांची कवीने जाणीवपूर्वक मोडतोड केली आहे, असे दिसते. उदाहरणार्थ,
'स्वतःला खणत गेलो खोल खोल
ओल लागली तेव्हा कुठे कवितेची'. (पृष्ठ २२)
टाळक्यात-टोळक्यात, तळटिपांची तटबंदी, मायाळू माती, दीनवाणी दुनिया, सराईत सबुरी, लोकांत-एकान्त, पाठलागाचे पदन्यास, आडाखे-तडाखे, अस्पर्शित अनुभूती, वळिवाच्या वेळा, उद्ध्वस्ततेच्या उंबरठ्यावर यांसारख्या शब्दांचे प्रास अनेक ठिकाणी सहज साधले आहेत. यात कुठेही ओढाताण जाणवत नाही.
ह्या कवितेत जसा कवीचा आत्मस्वर ऐकायला येतो, तसाच समूहस्वरही ऐकायला येतो. ही कविता रूपकात्मक भाषेत समाजचित्रण करते. ह्या कवितेत अधूनमधून फजरच्या अजानचे स्वर कानावर पडतात. बेहाल, कष्टी माणसांची दीनवाणी दुनिया दृष्टीस पडते. कवीने दीर्घ आजारपणात अनुभवलेली जीवघेणी नि:स्तब्धता इथे ऐकायला येते. कवीच्या सभोवताली जशी व्यवहारचतुर माणसे भेटतात, तशीच मीठभाकरीच्या तरतुदीसाठी हाडांची काडं करणारीही माणसे भेटतात. ह्या कवितेत कोरोनाच्या काळातील रुग्णवाहिकेचे भयाण सायरन ऐकायला येतात. कवीने आपल्या आयुष्यात अनेकदा उदासीचा उंच गड चढून पार केलेला आहे. जीवनानुभवाचे अस्ताव्यस्त दाणे टिपतानाच कवीने शब्दांजवळ जाण्याची जोखीम पत्करलेली आहे. कवीच्या डोळ्यांत दबा धरून बसलेला आणि कवितेला माहीत नसलेला वळीव अनेकदा धुवाधार बरसलेला आहे. कवीची सहचारिणी व्याकूळ पक्षिणीच्या रूपात आपल्याला अनेकदा भेटते. जीवनाच्या सुनसान वाटेवर एकाकीपणा अनुभवताना कवीला आपल्यातच मावळतीला थव्यापासून दुरावलेला एक बगळा दिसतो.
ही कविता तळटिपांची तटबंदी, धास्तीचे मळभ, संवेदनाशून्य सांज, मायाळू माती, बिनचेह-याची उदासी, दैनंदिनीच्या फांद्या, सृजनशील हवा, सबुरीचा कणा, पाठलागाचे पदन्यास, पारध्यांचा पाळीव तितर, उदासीचे मोहोळ, नक्षत्रांकित हाक, चतुर गोगलगाय, व्यंगांच्या नांग्या, गृहीतकांचे झाड, स्वप्नांच्या वसाहती, उद्ध्वस्ततेचा उंबरठा यांसारख्या अर्थवाही आणि अन्वर्थक प्रतिमांतून वाचकांशी संवाद साधते. ह्या प्रतिमांमधून आपल्या नजरेसमोर एक छान चित्र साकार होते. ह्या प्रतिमांमुळे वाचकाच्या मनात दृक्क-श्राव्य, स्पर्श-गंध अशा सगळ्या संवेदना जाग्या होतात. अर्थवाही प्रतिमा-प्रतीकांमुळे कवी अजीम नवाज राही यांच्या काव्याविष्काराला अतिशय कलात्मक रूप लाभले आहे. लौकिक अर्थाने कवीचे औपचारिक शिक्षण फारसे झालेले नसले, तरी ह्या कवितेचे भाषाशरीर अतिशय समृद्ध आहे! औपचारिक शिक्षणाचा आणि अस्सल अभिव्यक्तीचा संबंध जोडता येत नाही, हेच खरे!
ह्या कवितेत सुभाषितांसारख्या, सुवचनांसारख्या, अवतरणक्षमता असलेल्या काही अप्रतिम ओळी येतात. उदाहरणार्थ,
'मौन म्हणजे संवादाची दणकट ग्वाही'. (पृष्ठ १९)
किंवा
'स्वतःला स्वतःसोबत राहण्याची
सवय जडली की
भयावह एकान्ताची शिजत नाही डाळ' (पृष्ठ ३३)
किंवा
'ज्या वाटांचा उगम होतो वाळवंटातून
अंत मात्र हिरवळीत ठरलेला' (पृष्ठ ५५)
किंवा
'जिथे असते जिव्हाळ्याची शक्यता
तिथेच रमतो जीव माणसाचा' (पृष्ठ ६६)
किंवा
'दगड मारून उठवायचे नसतात मोहोळ
छेड काढायची नसते कधी
खपली धरलेल्या जखमेची' (पृष्ठ ९४)
किंवा
'ज्यांना झाडे लावायची सवय असते
ते बाळगत नाहीत पानगळीची तमा' (पृष्ठ १२०)
किंवा
'स्थिरता सर्जकाला नसते कधीच धार्जीण' (पृष्ठ १२२)
किंवा
'सदासर्वकाळ स्थिरता वांझोटी' (पृष्ठ १२३).
जीवनाचे अनमोल तत्त्वज्ञान सांगणा-या ह्या सोन्यासारख्या बावनकशी ओळींमुळे ह्या कवितेची उंची आणखीनच वाढली आहे.
आजवर ज्या मुस्लीम मराठी कवींनी, आपल्या सकस निर्मितीने मराठी कवितेचे दालन समृद्ध केले, त्यापैकी अजीम नवाज राही हे एक ठळक आणि महत्त्वाचे नाव आहे. ह्या कवीला कवितेने अक्षरशः तहहयात झपाटलेले आहे. रूपबंध आणि आशयाच्या दृष्टीनेही ही कविता अतिशय लक्षणीय आहे! ह्या कवितेने व्यापक जीवनाशय आपल्या कवेत घेतला आहे.
'कवितेच्या हवाली करणाऱ्या क्षणाची गत
करवतीला वेटोळे घालून
रक्तबंबाळ होणाऱ्या सापासारखी' (पृष्ठ ६७)
याची पुरेपूर जाणीव ह्या कवीला आहे, तरीसुद्धा कवी जे मागणे मागतो, ते स्तिमित करणारे आहे.
'द्राक्षांच्या गुच्छांसारखी, केळीच्या घडांसारखी
दैनंदिनीच्या पदरी पडावी शिदोरी अनुभवांची
काळीज झाले तर झाले रक्तबंबाळ
वर्तमानाने हिरावून घेऊ नये
कवीच्या डोक्यावरचे कवितेचे आभाळ'. (पृष्ठ १२८)
कवीचे हे महन्मंगल मागणे ऐकल्यावर निसर्गसुद्धा 'तथास्तू' म्हणेल, यात शंकाच नाही!
*********
वळिवाच्या वेळा (कवितासंग्रह)
कवी : अजीम नवाज राही
मुखपृष्ठ : सरदार जाधव
प्रकाशक : अथर्व पब्लिकेशन्स, धुळे
पृष्ठे १४२ किंमत रु. ३००
*********
पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS