तहसीलदार साहेब याकडे लक्ष देतील का ?
= केज प्रतिनिधी.
केज तालुक्यातील पी. एम. किसान योजनेतील बहुतांशी सेल्फ रजिस्टर व सीएससी वरून रजिस्टर झालेले नवीन शेतकरी महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने दिनांक 25/12/2020 रोजी मिळालेल्या सार्वत्रिक लाभापासून वंचित राहिले आहेत.
याविषयी सविस्तर वृत्त असे की प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रति वर्षी सहा हजार याप्रमाणे लाभ दिला जातो. परंतु काही खोडसाळ महसूल कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने तालुक्यातील बहुतांशी नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकरी या लाभापासून वंचित राहिले आहेत.
वास्तविक पाहता आॅनलाईन रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकर्यांचा अहवाल वेळेत तलाठ्यांकडे पाठवून सत्यता पडताळणी करुण तलाठ्यांच्या अभिप्रायानुसार जलद मंजुरी द्यायला पाहिजे परंतु चिरीमिरी साठी जाणीवपूर्वक शेतकर्यांना त्रास दिला जातो. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे जरी पी.एम.किसान सन्मान योजनेत सर्वत्र बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळाट झाला असला तरी, त्याच्या मुळापर्यंत गेल्यास असे लक्षात येते की या कामी महसूल मधील कर्मचारी दोषी आहेत. कारण मागच्या काळात बाहेरील ऑनलाईन केंद्रावरून व तलाठ्यांच्या हस्तकाकडून मोठ्या प्रमाणात लूट करून अधिकार्यांना हिस्सा देऊन बोगस लाभार्थी तयार झाले. या प्रकरणात चौकशी करून संबंधित बोगस लाभार्थ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तर काही जणांकडून वसुलीही चालू आहे.परंतु या सर्व गोष्टींचे मूळ असणारे महसूल कर्मचारी यांनी आयडी- पासवर्ड बाहेरच्या व्यवसायिकांना दिला तसेच स्वतःही मोठ्या प्रमाणावर मलिदा खाऊन रजिस्टेशन केले यांच्यावर काय कार्यवाही होणार याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. मागच्या काळात एवढं पाप करून सुद्धा आता ही नवीन रजिस्ट्रेशन झालेल्या शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक वेठीस धरण्याचा प्रयत्न तहसील कार्यालयातील पेशकार मॅडम व तलाठी करीत आहेत. अकाउंट दुरुस्तीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकरी त्रस्त आहेत.
शेतकरी विरोधी कर्मचाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे, तसेच मागील काळात झालेल्या बोगस लाभार्थी प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे.अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

COMMENTS