राम दातीर
माहूर (प्रतिनिधी )माहूर येथील श्रीदेवदेवेश्वर मंदिरात अहोरात्र ईश्वर चिंतन करून सेवा देणाऱ्या साधाई गुरु केशराजबाबा अंबेकर व जनकाईसा गुरु केशराजबाबा अंबेकर या वयोवृद्ध तपस्वीनीना उघड्यावर दिवस कंठावे लागत असल्याचे दृष्य प्रत्येक संवेदनशील मनाला वेदना देत आहे.
कोरोनाचा अपाय रोखण्यासाठी शासनाने 17 मार्च 2019 ते दिवाळीच्या पाडव्या पर्यंत मंदिर बंद केल्यामुळे आर्थिक नियोजन पूर्णतः ढासळल्यामुळे मंदिर व्यवस्थापन,पुजारी, व्यापारी, भिकारी आदि मंडळी हवालदिल झाली आहे.
आज मंदिरे उघडी असली तरी 65 वर्षावरील वृध्द तसेच दहा वर्षाखालील बालकांच्या मंदिर प्रवेशावर शासनाने निर्बंध घातल्याने साधाई अंबेकर (75)व जनकाईसा अंबेकर (72) यांना ऐन हिवाळ्यातच उघड्यावर दिवस-रात्र काढावी लागत आहे.
या साध्वी भगिनी सन 1988 पासून ईश्वर चिंतन व सेवा करण्यासाठी देवदेवेश्वर मंदिरात वास्तव्यास आहेत.दि. 7/10/1994 रोजी त्यांच्या पतीचे निधनही येथेच झाले.ईश्वर भक्तीसाठी देहभान हरपलेल्या या भगिनींनी 2011 साली जाळीचा देव (जि.जालना ) येथे गुरु प.पु.कै.केशराजबाबा अंबेकर यांचे हस्ते महानुभाव पंथाची दीक्षा (सन्यास ) घेतली.सहा वर्षापूर्वी साधाईना आलेले अपंगत्व,पोटी मुल-बाळ नाही,डोक्यावर छत नाही, मदतीला कुणीही नाही.अशा विपरीत परिस्थितीतही त्या ईश्वराचे स्मरण व सेवा करण्यासाठी आपला संपूर्ण वेळ देत असल्याने त्यांच्या अपार श्रध्देचे जेवढे गोडवे गावे तेवढे कमीच आहेत.
भगवान दत्तप्रभू,माता रेणुका व माता अनुसयाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या श्रीक्षेत्र माहूरगडला दर्शन घेवून परत जाणाऱ्या हजारों भाविकासाठी शासन,प्रशासन व मंदिर व्यवस्थापन समितीने बऱ्या पैकी व्यवस्था केली आहे. मात्र या जगात ज्याचे कुणीही नाही अशा परावलंबी भक्तांसाठी कुठलीही व्यवस्था केली नसल्याची बाब या पुण्य भूमिच्या गौरवाला छेद देणारीच आहे.
*माझे पूर्वीचे नाव सुमनबाई रामदास पाटील व माझ्या बहिणीचे जनाबाई रामदास पाटील असे आहे. पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे हे आमचे मु़ळगांव होय. आमचे कडे असलेले 9 एकर शेत भावाला तर आरा मशीन व 3 एकर मोकळी जागा पुतण्या रमेश गंगाधर पाटील यांना दिली आहे .सध्या माहूर मध्ये प्रगती पथावर असलेल्या भोजंती मंदिराच्या बांधकामासाठीही आम्ही 2 लाख रूपयाची देणगी दिली आहे.आम्हाला आर्थिक चणचण नसली तरी एवढ्या बिकट परिस्थितीत देखभाल करण्यासाठी कुणीही नसल्याने आमची पावलोपावली फजीता होत आहे,शिवाय मंदिरातच जाता येत नसल्याची बाब आमच्या श्रध्देवर घाला घालणारी असून त्याचेच अति दुःख असल्याचे साधाईने रडत रडतच सांगितले.
श्रीदेवदेवेश्वर मंदिरात अनेक व्याधीग्रस्त भाविक मागील पन्नास वर्षा पूर्वी पासून आश्रयास आहेत, निवा-याची वेगळी व्यवस्था नसल्याने मात्र त्यांना उघड्यावरच जिवन कंठावे लागत आहे. कोरोना सारखी भविष्यात परिस्थिती उद्भवल्यास त्यांचे जगणे अधिकच कठीण होणार आहे ,इतरांनाही त्याचे वास्तव जाणून शासनाने येथे शासकीय निवा-याची व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण विद्वांस यांनी केली आहे.
COMMENTS