नांदेड दि. १७
येथील प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणा-या २०२४-२५ ह्या वर्षीच्या (रौप्यमहोत्सवी वर्ष) वाड्.मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक गिरीश कुबेर, कवी अजीज नवाज राही, संगीता अरबुने आणि नांदेड येथील डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांचा ह्या पुरस्कारांच्या मानक-यांमध्ये समावेश आहे.
(१) दरवर्षी एका ज्येष्ठ लेखकाला मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मानाने गौरविण्यात येते. यंदाच्या साधना सन्मानासाठी मुंबई येथील लोकसत्तेचे संपादक, ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक श्री गिरीश कुबेर यांची निवड करण्यात आली आहे. रु. २१,००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(२) सर्वोत्कृष्ट पुस्तकाकरिता देण्यात येणा-या प्रसाद बन वाड्.मय पुरस्कारासाठी बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा येथील कवी अजीम नवाज राही यांच्या 'वळिवाच्या वेळा' (प्रकाशक : अथर्व, धुळे) ह्या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु.११,००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(३) प्रसाद बन ग्रंथगौरव (राज्यस्तरीय) पुरस्कारासाठी वसई जि. पालघर येथील लेखिका संगीता अरबुने यांच्या 'एकसोबीस हरी पत्ती लौंग आणि मी' (प्रकाशक : शब्दालय, श्रीरामपूर) ह्या ललितलेखसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. रु. ५००० रोख, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
(४) दुसरा ग्रंथगौरव पुरस्कार नांदेड जिल्ह्यातील साहित्यिकाला देण्यात येतो. डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या 'हे बंध समाजनिष्ठेचे' (प्रकाशक : इसाप, नांदेड) ह्या आत्मकथनाची ह्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. रु. ५००० रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरूप आहे.
प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, वाड्.मय पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि संयोजक पत्रकार श्री संजीव कुळकर्णी यांनी नांदेड येथे ह्या पुरस्कारांची घोषणा केली. प्रतिष्ठानच्या वाड्.मय पुरस्कारांचे हे २५वे वर्ष आहे. रविवार, दि. १२ जुलै रोजी नांदेड येथे एका विशेष समारंभात ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मागील २५ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणारा एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे. तसेच डॉ. अच्युत बन यांच्या 'ज्वालामुखींच्या प्रदेशात' ह्या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन गिरीश कुबेर यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती यावेळी संयोजकांनी दिली.

COMMENTS