नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
पुरोगामी विचार चळवळीत वारंवार म्हटले जाते की, समाजाचा कार्यकर्ता जगला तर समाज जगणार आहे आणि तो मेला तर समाजही मरणार आहे. समाजावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्या घटनास्थळी पहिल्यांदा तिथे जाणारा, त्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा संघर्ष करणारा, अंगावर अनेक केसेस घेणारा, निष्ठावंत, धाडसी, समाज ध्येयवेडा कार्यकर्ता गणपत रेड्डी टाकळीकर यांच्याविषयी आज समाज झोपला नसला तरी झोपेचं सोंग घेत असल्यामुळे गणपत रेड्डीना उपेक्षितांचे जीवन जगण्याची वेळ आलेली आहे.
फुले, शाहू ,आंबेडकर, अण्णाभाऊच्या चळवळीचा वारसदार होणे म्हणजे हे चुकीचे ठरणार काय, जेव्हा जेव्हा समाजावर विविध संकटे आली तेव्हा गणपत रेड्डीची धावा केलेला समाज आज त्यांचा विसर का पडलेला आहे. आपल्या निस्वार्थ भावनेने सामाजिक काम केलेला, पैशाच्या आमिषाला ठोकर मारून कोणाच्याही धमकीला छाती काढून पुढे जाणारा या निष्ठावंत कार्यकर्त्यांना समाजाने वार्यावर सोडणे म्हणजे महापुरुषांच्या विचारांशी बेईमानकी करणे नाही का, गणपत रेड्डी आज कोणत्याही सामाजिक संघटनेत कार्यरत नाही. का तर काही संघटना समाजाचे नेतृत्व म्हणून मिरवीत आपल्या जगण्याचे साधनं बनविले आहेत, शहराच्या ठिकाणी राहणे, गाडीत फिरणे, कार्यक्रमाला येण्याजाण्यासाठी खर्च मागणे, पण रेड्डी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पायदळी प्रवास केलेला आहे, कधी उपाशी तर कधी चटणी भाकर खाऊन दिवस काढलेला यांना आम्ही आजवर काय दिले हे समाजाने ठरवावं. आमच्या दाराला येणाऱ्या भिकाऱ्याला आम्ही परत करत नाहीत, त्याला पसाभर देतो वर्षाकाठी किमान चार पायली तरी होतात, मग एका कुटुंबातील व्यक्तीने चार पायल्याचाही दाम रेड्डीना दिला नाही. समाजाच्या उत्थानासाठी म्हणून लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ अर्थात लसा कम ही कर्मचारी वर्गाची संघटना प्रत्येक तालुक्यात कार्यरत आहे, पण एक गावठी म्हण आहे, एकदा वाढली पंगत,सालभर बसली सांगत. असेच या लसा कम संघटनेचे आहे. दहा वर्षाखाली केलेले काम त्याला मसाला लावून सांगण्यातच धन्यता मानतात. पण कित्येक समाज कर्मचाऱ्यांना परिचित असलेला गणपत रेड्डी यांचा कधीच योग्य सन्मान लसाकम संघटनानी केलेला नाही, समाजाचा गाडा पुढे नेण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज कर्मचाऱ्याकडे आपल्या पगारातील विसावा भाग देण्यासाठी अपेक्षा केली पण दैववाद मानणारे, देवपूजा करणारे, मनुवादी पद्धतीने लग्न लावणारे, अज्ञानी, अपमतलबी, स्वार्थी, समाज कर्मचारी यांनी विसावा भाग सोडून पगारातील एक टक्का भागही कधी गणपत रेड्डी साठी खर्च केलेला नाही. किंवा समाजकार्यासाठीही नाही. यात चार-दोन अपवाद वगळले तर. आज मोबाईल प्रत्येकाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे, पण रेड्डीकडे एखाद्या हजार रुपयाचा मोबाईल नाही. जगण्यासाठी काही साधनं नाहीत, खंगलेल्या शरीराची साथ ढासळत चाललेली आहे, त्यात पत्नीही आजारी असते, एक मुलगी शिक्षणात खूप हुशार असताना शैक्षणिक सुविधा अपुऱ्या पडत आहेत हे सर्व पाहताना मन बेचैन होऊन कोणाला आपल्या व्यथा सांगाव्या म्हणून आज गणपत रेड्डी हलाखीचे जीवन जगत आहे. प्लास्टिकच्या कपात चहा पिऊन फेकून द्यावे तसे गणपत रेड्डी यांची होऊ नये कारण समाजाने त्यांना वापरून घेतले, सामाजिक संघटनावाले ही त्यांच्यामुळे मोठे झाले, कर्मचारी वर्गांना आपला मोठेपणा सोडून जे अण्णाभाऊ साठे यांच्या वाट्याला आले ते गणपत रेड्डी यांच्या वाट्याला येऊ नये म्हणून सत्यशोधक अण्णाभाऊ साठेच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त निष्ठावंत, ध्येयवेडा गणपत रेड्डी या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करावा. जेणेकरून तरुण कार्यकर्त्यांना ही प्रेरणा मिळेल, समाजालाही हेवा वाटेल व आपलेही कर्तव्य ठरेल.

COMMENTS