सोनपेठ/प्रतिनिधी
सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.यावर्षी असणारा जास्तीचा पाऊस यामुळे सोयाबीन आणि मूग हाती आला नसल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कापसावर मदार असतानाच.सीसीआय,आणि पणन महासंघाच्या वतीने सोनपेठच्या शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला.मायबाप शेतकऱ्यांची केविलवाणी अवस्था पाहून शासनाने सोनपेठ तालुक्यात तत्काळ शासकीय कापूस खरेदी केंद्र कार्यान्वित करावे अन्यथा भाजपच्या किसान आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या किसान आघाडीचे प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके यांनी एका निवेदनाद्वारे कापूस पणन महासंघाचे विभागीय अधिकारी यांना दिला आहे.या निवेदनात त्यांनी असे नमूद केले आहे की,शेतकऱ्यांच्या वेळेचा गैरफायदा कापूस खरेदी करणारे व्यापारी घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.कडता,आडत,हमाली आणि एका भावात ठरवलेला कापूस परत भाव बदलून दिला जात असल्याने आता या व्यापार संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्याचबरोबर तालुक्यात यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी तब्बल १८००० हेक्टरवर कापसाची लागवड केली आहे.मात्र शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शासकीय कापूस खरेदी केंद्र म्हणून उल्लेख असणाऱ्या सीसीआय आणि फेडरेशन सोनपेठ तालुक्यात कुठेही सुरू नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल कवडीमोल दराने विकावा लागत आहे.त्यामुळे सदर शासकीय खरेदी केंद्र २८ नोव्हेंबरपूर्वी सुरू करा.अन्यथा आंदोलनाला सामोरे जा असा इशाराही सोळंके यांनी दिला आहे.

COMMENTS