पुस्तक परिचय : बालकांचे भावविश्व सुसंस्कारित करणारी बालकविता : 'नदी रुसली, नदी हसली' डॉ. बाळू ना. दुगडूमवार

पुस्तक परिचय : बालकांचे भावविश्व सुसंस्कारित करणारी बालकविता : 'नदी रुसली, नदी हसली' डॉ. बाळू ना. दुगडूमवार 'महानंदायन', धनग...

पुस्तक परिचय :


बालकांचे भावविश्व सुसंस्कारित करणारी बालकविता : 'नदी रुसली, नदी हसली'


डॉ. बाळू ना. दुगडूमवार


'महानंदायन', धनगरगल्ली, मु.पो. कुंटूर ता. नायगाव जि. नांदेड. भ्र. 9767189392


 


बालपण हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंददायी असा ठेवा असतो. बालपणात जे मिळते ते जीवनभर आनंद देणारे असते. बालपणात झालेले संस्कार जीवनाची पुढील वाटचाल प्रभावित करणारे ठरतात. अनेकदा हेच संस्कार पुढे जीवनाची दिशाही ठरवत असतात. कधी कधी त्या व्यक्तीचे संपूर्ण जीवनही त्या संस्कारानुरूप घडत जाते. ज्या व्यक्तीचे बालपण आनंददायी व सुसंस्कारी व्यतीत झालेले असते, ती व्यक्ती पुढील आयुष्यात कधीही निराश होत नाही किंवा संकटांपुढे हार मानत नाही. असे आनंददायी व सुसंस्कारी बालपण प्रत्येक बालाकाचा हक्कच आहे आणि असे बालपण प्रत्येक बालकाला मिळायलाही हवे!


परंतु वर्तमान परिस्थिती काहीशी विपरीत आहे. बालकांचे बालपण हरवत चालले आहे. बऱ्यापैकी हरवलेही आहे. बालकं ही बालवयात असतात खरी, पण त्याचवेळी ते प्रौढ झाल्याचेही जाणवत राहते. बाल्यावस्थेतून थेट प्रौढावस्थेत जणारी बालमानसिकता आज चिंतेचा विषय होऊ लागली आहे. बालके ही अचानक मोठ्यांसारखी वागू लागतात, विचार करू लागतात, ही चिंतेची गोष्ट आहेच, परंतु बालपण हरवत चालले आहे, याचे कुणालाही फारसे दु:ख होताना दिसत नाही. बालपण हरवण्याचे दुष्परिणाम समाज अनुभवतो आहेच, तरीही त्याला हरवत जाणाऱ्या बालपणाविषयी खंत वाटत नाही, हीच माझ्यासारख्याला अधिक चिंतेची बाब वाटते आहे.


बालकांचे बालपण हे त्यांच्या 'व्यक्ती' म्हणून असणाऱ्या भावविश्वाला समृद्ध नि सुसंस्कारित करत असते. आज बालसुलभता आणि निरागसपण बालपणातून हद्दपार होत आहेत की काय, असे वाटते आहे. याची असंख्य उदाहरणे आपण आजूबाजूला वावरणाऱ्या बालकांच्या वर्तनातून अनुभवतो आहोत. नैसर्गिकता आणि निरागसता बाजूला सारली जाऊन एक कृत्रिम आणि तंत्रज्ञानकेंद्री स्वभावाला स्वीकारणारे आजचे बालपण व्यक्तीला सुसंस्कारित तर करत नाहीच, पण ते कोणत्याही सकारात्मक पातळीवरची समृद्धताही देत नाही. ही मोठीच अवघड स्थिती निर्माण झाली आहे.


अशा हरवत चाललेल्या बालपणाच्या पार्श्वभूमीवर बालक आणि पालक या दोघांनाही आत्मचिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. बालक तर असे चिंतन स्वत:हून करू शकणार नाहीत, पालक मात्र ते करू शकतील, पण त्यांची इच्छाशक्ती असली तरच! सुसंस्कारी व समृद्ध बालपण आपल्या बालकाला मिळावे, असे वाटणाऱ्या पालकांना अनेक प्रकारच्या युक्त्या, प्रयुक्त्या जाणीवपूर्वक योजाव्या लागतील, तरच बालक आपल्या अव्याज बालपणाकडे परत वळेल.


बालपणाचा अनुभव देण्यासाठी आपल्या हाती एक अत्यंत आनंददायी असे साधन उपलब्ध आहे, ते म्हणजे बालसाहित्य! लहान बालक हे अक्षरज्ञानाच्या टप्प्यावर आल्यानंतर हे साधन बालकाच्या भावविश्वाला समृद्ध नि सुसंस्कारित करू शकते. या दृष्टीने डॉ. सुरेश सावंत यांचे बालसाहित्य ही एक मोठीच सामाजिक उपलब्धी म्हणावी लागेल. तंत्रज्ञानाच्या मायाजालात अडकून नैसर्गिक खेळ आणि शिकण्याच्या विविध पद्धतींपासून बालक परावृत्त होत आहे. अशा काळात डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता बालकाला नैसर्गिक बालपणाकडे नक्कीच घेऊन जाऊ शकते. इतकेच नव्हे तर ती आजीआजोबा आणि आईवडिलांच्या आत्मीयतेने बालकांवर सुसंस्कारही करू शकते.


ग्रंथाली प्रकाशनाकडून प्रकाशित झालेला डॉ. सुरेश सावंत यांचा 'नदी रुसली, नदी हसली' हा बालकवितासंग्रह या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. या संग्रहात एकूण 28 बालकविता सचित्र संग्रहित केल्या आहेत. पुस्तकाची मांडणी बालकांच्या कुतूहलवृत्तीला प्रेरित करणारी असून बालकांच्या अवखळपणाला पेलून टिकणारी पुस्तकबांधणी आणि तितक्याच दिलखेचक चित्रांची रेलचेल, ही या पुस्तकाची महत्त्वाची बलस्थाने आहेत.


डॉ. सुरेश सावंत यांची ही बालकविता केवळ बालकांचे मनोरंजन करून थांबत नाही. मनोरंजन असलेच तर ते फक्त बालकाला या पुस्तकाकडे आकृष्ट करण्यापुरते असावे. ही संपूर्ण कविता बालकाच्या भावविश्वाला व्यापक करत नेण्यासाठीची उत्तम सामुग्री अत्यंत सुलभपणे उपलब्ध करून देते. बालकांची कुतूहलवृत्ती शमवण्यासाठी काही मनोरंजक नि हलकेफुलके वातावरण या कवितासंग्रहात दिसते. अधिकतर बालमनावर चांगल्या गोष्टींचा सुसंस्कार व्हावा, त्या सुसंस्कारांची बालमनात रूजवणूक व्हावी आणि त्यांच्यात असलेल्या, येऊ पाहणाऱ्या दोषांचे निरसनही त्याला स्वत:लाच करता यावे, यासाठीची त्याची मानसिकता ही कविता उत्तम रीतीने घडवत जाते.


निसर्ग, समाज, कल्पनाविश्व, विज्ञान आणि तंत्रज्ञान, शाळा आणि पुस्तके, पर्यावरणाची जाणीव, छंद आणि खेळ यांसारख्या विषयांची अत्यंत सहज, तितकीच रोचक आणि परिणामकारक सुसंस्कार घेऊन येणारी या संग्रहातली कविता बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सहाय्यभूत ठरणारी आहे.


रुसलेल्या नदीला हसवणे, पावसाला बोलावणे, फुलांचे डोंगर उभे करताना प्राणिसृष्टीविषयीची आत्मियता स्वीकारायला लावणे, हे या कवितेला सहजपणे जमते. शाळा आणि पुस्तकांचा लळा लावतानाच 'कर्णपिशाच' होऊ पाहणाऱ्या मोबाईल आणि इतर तंत्रज्ञानाच्या साधनांचा विवेकाने वापर करण्याचा मोलाचा सल्लाही ही कविता देते.


'मोबाईलशी झाली गट्टी


अभ्यासाशी झाली कट्टी'


हे वास्तव बालमनात रुजवतानाच-


'वेळीच आपण शिकू या धडा


आभासी जगातून बाहेर पडा'


किंवा,


'सदान्‌कदा चालू सेल्फीच्या गप्पा


सेल्फीचा नाद नको रे बाप्पा!'


असे सुचवणारी ही कविता बालकांना पुस्तकांच्या दुनियेत घेऊन जाऊन पुस्तकांशी मैत्री करायला लावणारी आहे.


'पुस्तकांनी बोट धरून


अद्‌भूत विश्वात नेले


पुस्तकांच्या मैत्रीनेच


मला श्रीमंत केले'


असे पुस्तकांच्या श्रीमंतीचे महत्त्वही ही कविता बिंबवते. पुस्तकांबरोबरच औपचारिक शिक्षण देणारी शाळा आणि अनौपचारिक शिक्षण देणारी निसर्गशाळा याविषयीही ती बालमनात स्नेह निर्माण करते.


'फुलाफुलांनी बहरून आला अवघा रानशिवार


मांगल्याचे दान देतसे श्रावण किमयागार'


अंधश्रद्धेला मूठमाती देण्याचा सल्ला देतानाच ही कविता 'विज्ञानसाक्षर' होण्याचाही सल्ला देते.


'रूढी-प्रथा नि परंपरांनी फार घात केला


ढोंगी साधूंनी समाज सगळा पतनाला नेला


शोध, चिकित्सा, प्रयोगशीलता तिचे साह्य घेऊ


चला गड्यांनो, आपण सगळे विज्ञानसाक्षर होऊ!'


केवळ विज्ञानसाक्षर होऊनही चालत नाही तर-


'जातीपातीचे खोटे सारे भेद गळाले


आनंदाचे कंद जणू हे मित्र मिळाले'


असा आग्रहही ही कविता धरते. जातीपातीच्या भिंती पाडून समग्र मानवाला समत्वदृष्टीने पाहता आले पाहिजे. जग सुखी करण्याची ओढ बालपणातून रूजली पाहिजे, असेही तिला वाटते.


एकंदरीत या संग्रहातील सर्वच कविता ह्या बालकांच्या भावविश्वाला समृद्ध करणाऱ्या आहेत. जगण्याच्या सर्व बाबतीत ही कविता बालमनात एक उच्चकोटीचा सन्मानभाव आणि आदरयुक्तभाव निर्माण करू पाहते. बालकांच्या अनुभवकक्षेला झेपेल इतक्या सुलभतेने कवी या कवितेच्या माध्यमातून बालमनात ही समृद्धी लिलया उतरवतो. तो बालकांचे भावविश्व समृद्ध करून थांबत नाही, तर योग्य काय आणि अयोग्य काय, याचा निवाडा करण्याची क्षमताही बालमनात रूजवू पाहतो. शिवाय बालकांचे भावविश्व सर्वांगांनी सुसंस्कारित व्हावे, यासाठीही कवी धडपडत राहतो. कवीची ही प्रांजळ धडपड कवीने स्वत:च्या प्रौढत्वातही निजशैशव जपल्याची साक्ष देते.


माझा बालक हा उद्याचा उत्तम माणूस, नागरिक आणि कुशल कर्मयोगी व्हावा, त्याचे बालपण तंत्रज्ञानाच्या आभासी जगात अडकून न पडता ते सर्वांगाने समृद्ध व सुसंस्कारी व्हावे, असे ज्यांना वाटते, त्या सर्व पालकांनी आणि शिक्षकांनी हे पुस्तक स्वत: वाचावे आणि आपल्या बालकांनाही वाचायला द्यावे, असा मी सल्ला देईन. त्याचबरोबर बालपण हरवून बसलेल्या बालकांना त्याचे खरेखुरे बालपण परत मिळवून देण्याची तहहयात धडपड करणाऱ्या डॉ. सुरेश सावंत या बालकवीच्या हृदयात जिवंत असलेल्या शैशवास प्रणाम करतो. भावी लेखनास शुभेच्छा देतो.


 


'नदी रुसली, नदी हसली!' (बालकविता), कवी : डॉ. सुरेश सावंत, प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन मुंबई. पृष्ठे : 66 (आर्ट पेपरवर संपूर्ण रंगीत) किंमत : 120 रु.


COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group