पुस्तक परिचय :
अक्षरसाहित्याच्या दिंडीतील वारकरी : 'अक्षरयात्री'
डॉ. श्रीकांत श्री. पाटील, कोल्हापूर
भ्र. 9834342126
'माझा मऱ्हाटाचि बोलु कवतुके। परि अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीण।'
असे सांगत संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी मराठीची सुंदरता, सुकोमलता आणि सुमधुरता प्रमाणभूत मानून मराठीत अक्षरसाहित्यनिर्मितीची सुरुवात केली. मराठीत ग्रंथलेखनाचा पाया रचला. पुढे त्याच भक्कम आणि मजबूत पायावर नामदेव, एकनाथ, तुकोबांनी अभंगादी रचना करून सुंदर अशी इमारतच उभी केली. ज्ञानदेवांनी निर्मिलेली मळवाट पुढे पंडित आणि शाहिरांची पायवाट झाली. या पायवाटेने अनेक अक्षरयात्रींची आणि शाहिरांची पायवाट झाली. या पायवाटेने अनेक अक्षरयात्रींनी प्रवास केला. हा ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवला. ही पालखी आपल्या खांद्यावरून डौलाने मिरवत पुढे नेली. कालपरत्वे रंजन आणि प्रबोधनाची कास धरत गद्य, पद्य, व्याकरणादी लेखन झाले. याच दिंडीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून अनेक हात लिहिते झाले. त्यांनी साहित्यमूल्यांनी भारलेले अक्षरसाहित्य लिहिले.
डॉ. सुरेश सावंत हे ह्या अक्षरसाहित्याच्या दिंडीतील वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे साहित्यिक. प्रत्येक साहित्यिक समाजमान्यता आणि राजमान्यता मिळविण्यासाठी धडपडत असतो. त्यासाठी नीती, निष्ठा, तत्त्वं, मूल्यं, संस्कार, अर्थ, भाव यांच्या आधाराने तो कसदार लेखन करीत आशयगर्भ साहित्यकृती साकारत असतो. त्याचे प्रकटीकरण, सादरीकरण कधी ग्रंथरूपाने, तर कधी चर्चा, परिसंवाद व सभासंमेलनांच्या माध्यमातून करीत असतो. त्याच्या लेखनाची खोली, आशय, उंची, अवकाश पाहून समाज ते स्वीकारतो, तर कधी वाचून कपाटबंद करतो. समाजाने स्वीकारलेल्या लेखकाची चर्चा होते. त्यातील सत्य लेखकाला एक वेगळीच उंची प्राप्त क्रून देते. डॉ. सावंत यांनी बालसाहित्यासह कविता, चरित्र, एकांकिका, समीक्षा, संपादन आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपल्या लेखनसामर्थ्याच्या बळावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे. 'अक्षरयात्री' हा त्यांचा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.
स्वत: कष्ट करून उन्नत होणे हे प्रागतिकतेचे लक्षण आहे, पण आपल्या बरोबरीच्या साहित्यिकांच्या साहित्यातील बलस्थानांचे, कथासूत्र आणि शैलीचे, चिंतन आणि विवेचनाचे कौतुक करणे, हे व्यापक आणि सुदृढ, सरल मनाचे द्योतक आहे. आपल्या शब्दसोबत्यांच्या लेखनातील मर्मस्थानांचे कौतुक करीत लेखकाच्या व्यापक, उदार आणि निष्काम मनोवृत्तीचे दर्शनच 'अक्षरयात्री' या ग्रंथामध्ये साकारले आहे.
संतसाहित्याचे भाष्यकार डॉ. यू.म. पठाण यांचा जीवनप्रवास रेखाटत त्यांची अध्यापनसेवा, संपादकीय कार्य, कथालेखन, व्यक्तिचित्र लेखन यांचे विस्तृत निवेदन केलेले आहे. डॉ. यू.म. पठाण सरांच्या वाट्याला आलेल्या मानसन्मानांची यादीच सादर करून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह त्यांनी भूषविलेल्या देश-विदेशांतील अध्यक्षीय कारकिर्दीवरही प्रकाश टाकला आहे. 'बलुतं' या आत्मकथनाने मराठीत नावारूपास आलेल्या दया पवार यांच्या कथा-कविता, आत्मकथन, निबंध, स्तंभलेखन इ. लेखनाचा उल्लेख करून त्यांच्या साहित्यातील घालमेल, वेदना, विद्रोह, नकार याचबरोबरीने साहित्यातील सर्जकताही डॉ. सावंत यांनी दाखवून दिली आहे.
प्राचार्य रा.रं. बोराडे हे मराठी साहित्यविश्वातील एक ख्यातकीर्त नाव आहे. त्यांच्या विपुल साहित्यनिर्मितीचा, कथा आणि कादंबरीक्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा परिचय लेखकाने करून दिला आहे. प्राचार्य बोराडे सरांची नवलेखकांना उभारी देण्याविषयीची बांधिलकी, शेतकऱ्यांचे जगणं चित्रित करणाऱ्या साहित्यिकाला सन्मानित करण्याची योजना, त्यांनी भूषविलेली पदे व त्यांच्या वाट्याला आलेले मानसन्मान बारीकसारीक तपशीलांसह ह्या लेखांत रेखाटले आहेत. याशिवाय मराठी कथासाहित्यात एकाहून एक सरस कथांची निर्मिती करणारा कथाकार प्रा. भास्कर चंदनशिव, बळीराजाच्या जगण्यामरण्याचे प्रश्न घेऊन लेखन करणारे सदानंद देशमुख, आनंद वाटत फिरणारा अवलिया कवी फ.मुं. शिंदे, आरोग्यपर्यटन आणि आरोग्यसेवेत रमलेला आनंदयात्री डॉ. अच्युत बन यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनकर्तृत्वाचे दिलखुलास वर्णन आणि मनमोकळे कौतुक करताना लेखकाच्या लेखणीस बहर आलेला आहे. कथाकार, कवी आणि समीक्षक असलेल्या प्रा. तु.शं. कुलकर्णींच्या तीनही विशेषांवर साक्षेपी भाष्य करीत 'संक्रमणाचा साक्षीदार' असलेल्या अक्षरयात्री प्रा. कुलकर्णी यांची वस्तुनिष्ठ ओळख करून दिली आहे.
आपणास घडविणाऱ्या, मराठी विषयाची गोडी लावणाऱ्या पु.अ. पांडे गुरुजींविषयीची कृतज्ञताच लेखक 'पु.अ. पांडे-एक अत्मविभोर जीवनगाणे' या लेखात अभिव्यक्त करतो. गुरुजींचे अध्यापन, वाचन, व्यासंग, जीवनविषयक दृष्टिकोन, काव्यलेखन अशा विविध पैलूंचे यथोचित दर्शन या व्यक्तिचित्रणातून सक्षमपणे वाचकांसमोर आणले आहे.
पत्रकार संदीप काळे आणि साहित्य संशोधक डॉ. बाळू दगडूमवार यांचीही व्यक्तिचित्रे नेटकी आणि साक्षेपाने या ग्रंथात अवतीर्ण झाली आहेत. शंभरहून अधिक साहित्यकृतींची निर्मिती करून आजही अव्याहतपणे लिहीत असलेल्या निगर्वी, निरागस आणि नितळ मनाच्या भगवान अंजनीकरांचा, त्यांच्या लेखनकर्तृत्वाचा, बालसाहित्यातील योगदानाचा विस्तृत परिचय करून दिलेला आहे. मराठीतील ख्यातकीर्त लेखक आणि प्रकाशक बाबा भांड यांच्या जीवनवृत्तांताबरोबरच लेखनकर्तृत्वावरही प्रकाश टाकला आहे. बालसाहित्याला सन्मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. प्रकाशन हा व्यवसाय म्हणून न स्वीकारता, एक व्रत म्हणून स्वीकारण्यात त्यांच्या ठायीची साहित्यनिष्ठाच कारण असल्याचे लेखकाने अधोरेखित केले आहे.
अक्षरदिंडीतील नव्या-जुन्या अक्षरयात्रींची सुंदर अशी मालिकाच आपणास या ग्रंथात वाचावयास मिळते. यातील प्रत्येकाने आपल्या दर्जेदार आणि कसदार लेखनाने साहित्यप्रांतात तर नाव मिळविलेच, पण आपल्या गावाचादेखील ठसा उमटविला. मराठवाड्यातील संतसाहित्यलेखन, कथा, कविता, कादंबरी, समीक्षा आणि संशोधनाबरोबर अध्यापन आणि पत्रकारितेतील अक्षरयात्रिकांचा सुंदर असा समन्वय साधून अतिशय नेटका आणि समृद्ध असा हा 'अक्षरयात्री' व्यक्तिचरित्रात्मक लेखसंग्रह साकारण्यात आलेला आहे. अशा सुंदर ग्रंथातून नैष्ठिक अशा साहित्यसेवकांची सुंदर व्यक्तिचित्रे रेखाटल्याबद्दल लेखक डॉ. सुरेश सावंत यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. आजचे साहित्यविश्व ज्यांच्या खांद्यांवर उभे आहे, त्यांचे योगदान जाणून घेण्यासाठी 'अक्षरयात्री' वाचायलाच हवे.
अक्षरयात्री (लेखसंग्रह), लेखक : डॉ. सुरेश सावंत
प्रकाशक : संगत प्रकाशन, नांदेड. पृष्ठे : 112, किंमत रु. 160/-
COMMENTS