बीड, दि. २::--जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कंटेनमेंट दोन मध्ये जीवनावश्यक सेवा पुरविण्याबाबत खात्री आणि रुग्णांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय, कोविड केअर सेंटर आदी ठिकाणी चांगले उपचार व आलेल्या समस्या तत्काळ सोडविण्यासाठी नियंत्रण ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व संबंधित तहसीलदारांना आदेश दिले आहेत.
या आदेशात पुढील सूचना देण्यात आल्या आहेत.
1. जिल्ह्यातील शासकीय रूग्णालये, कोविड केअर सेंटर येथे वीज, पाणी या सुविधा स्वच्छता इत्यादी सर्व पूरक सुविधांचा पुरवठा आवश्यकते प्रमाणे होत आहे याची खात्री करणे.
2. तालुक्याचे वैद्यकीय अधीक्षक यांच्याशी दिवसातून किमान तीन वेळा संपर्क करून सर्व सुविधा समाधान कारक आहेत याची खात्री करणे.
3. वैद्यकिय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांचेकडून मध्ये दाखल असणाऱ्या रुग्णांची नावे व फोन नंबर रोज संध्याकाळी घेणे आणि त्यातील किमान 10 टक्के रुग्णांना फोन करून सुविधांची खात्री करणे. यासाठी कार्यालयात विशेष कर्मचाऱ्यांची नेमणूक याद्वारे करणाऱ्या सुविधांतील अडचणी तात्काळ दूर करावी.
4. खाद्य सुविधा देणाऱ्या संस्थेच्या संपर्कात स्वतः रहावे.
5. शहरी भागातील सर्व कंटेनमेंट झोन' मध्ये जीवनावश्यक सेवा व राशन घरपोच पुरवले जात आहे याची खात्री मुख्याधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या मदतीने करावी.
6. मुख्याधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी यांनी या कामी संपूर्ण सहकार्य करावे. सर्व अधिकारी यांनी या कामांमध्ये कसलीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. व त्यातील पोटकलम 2 (अ)नुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे उपयुक्त प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोना संसर्ग (covid-19) विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या अनुषंगाने दिनांक 31 ऑगस्ट 2020 रोजी पर्यंतफौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1)(3) रात्री 12.00 वाजेपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. या आदेशांची अवज्ञा करणार्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) यांच्या कलम 188 शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल असे नमूद केले आहे.
००००
COMMENTS