फडणवीस विनाकारण उतावीळ होत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.

 आघाडीमध्ये राहण्यास राष्ट्रवादी कॉंग्रेस कटिबद्ध आहे. हे सरकार पडण्याचा कोणताही धोका नाही. मात्र, देवेंद्र फडणवीस विनाकारण उतावीळ होत असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी लगावला.


 


पवार यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्री या निवासस्थानी जाऊन सुमारे दीड तास चर्चा केली. त्यामुळे राज्य सरकारच्या स्थिरतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणाऱ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. त्यातच नारायण राणे यांनी राज्यपालांशी भेट घेऊन सरकार बरखास्तीची मागणी केली. त्यावर हा सरकार अस्थिर करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचा पलटवार खासदार संजय राऊत यांनी केलात्यामुळे या चर्चांना खतपाणी मिळाले. या पार्श्‍वभूमीवर एका वृत्तवाहिनीशी बोलताना पवार यांनी हा खुलासा केला आहे.


 


पवार म्हणाले, कोणतेही संकेत देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली नाही. राज्यपालांनी दोन वेळा चहापानाचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे आपण त्यांची भेट घेतली. महाविकास आघाडी सरकारमध्ये राहण्यास आपण कटिबद्ध आहोत. राज्य सरकारला कोणताही धोका नाही. सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. जर सध्याच्या स्थितीत आमदारांना फोडण्याचा प्रयत्न झाला तर जनता माफ करणार नाही.


टिप्पण्या