नांदेड, दि. ३ :- कृषीपंप धारक शेतकरी आणि घरगुती व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांना अखंडीत व सुरळीत वीज पुरवठा करता यावा यासाठी महावितरणकडून अन...
नांदेड, दि. ३ :- कृषीपंप धारक शेतकरी आणि घरगुती व इतर वर्गवारीतील वीज ग्राहकांना अखंडीत व सुरळीत वीज पुरवठा करता यावा यासाठी महावितरणकडून अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरूध्द मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत १००९ आकडेबहाद्दर वीजचोरांवर कारवाई करण्यात येऊन आकडे टाकून वीज चोरीसाठी वापरण्यात आलेल्या हजारो मीटर केबलची होळी करण्यात आली.
ग्रामीणसह गावठाण भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे विजेचा वापर होत असल्याने अधिकृत वीज ग्राहकांना नाहक त्रास होत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले. त्यामुळे महावितरणने अधिकृत ग्राहकांना अखंडीत आणि सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरूध्द मोहिम सुरू केलेली आहे. ही मोहीम कृषी आणि अकृषी भागातही राबविण्यात येत आहे. ऑक्टोबर २०२६ मध्ये राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या तपशिलानुसार नांदेड जिल्ह्यातील देगलूर विभागात २६४, भोकर १६३, नांदेड ग्रामीण विभागात ७०० तर नांदेड शहर विभागात १७३ आकडे बहादरांचे आकडे काढून त्यासाठी वापरण्यात आलेले हजारो मीटरर्स केबल जप्त करण्यात आले आहेत. काही ठिकाणी शेगड्या आणि हिटर्सही जप्त करण्यात आले आहेत. देगलूर विभागात अनेक ठिकाणी वीज वाहिन्यावर आकडे टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या केबलची होळी करून शेगड्या व हिटरर्स फोडण्यात आले.महावितरणने राबविलेल्या या मोहिमेमुळे वाहिन्यांवरील विजेचा ताणही नियंत्रणात येत आहे. अनधिकृत वीज वापरकर्त्यांविरूध्दची महावितरणची कारवाई पुढील काळातही सुरू राहणार आहे.
कॅप्शन :- वीजचोरीसाठी वापरण्यात आलेल्या केबलची नायगावात होळी करताना महावितरणचे कर्मचारी छायाचित्रात दिसत आहेत.--

COMMENTS