माहूर (प्रतिनिधी):
माहूर येथे यवतमाळवरून देवीच्या दर्शनासाठी आलेले सहा भाविक परत यवतमाळकडे जात असताना केरोळी घाटाच्या सुरुवातीला असलेल्या एका घातक वळणावर त्यांचे वाहन (टेम्पो) अनियंत्रित होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मागील दरीत कोसळले. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर अपघात घडल्याचे पाहताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधून पोलिसांना याबद्दल माहिती दिली. या माहितीच्या आधारे, रात्री गस्तीवर असलेले पोलीस निरीक्षक देविदास चोपडे आणि पोलीस कॉन्स्टेबल पवन राऊत यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने चार गंभीर जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, तर दरीत कोसळलेल्या अन्य दोघांचे मृतदेह क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढून माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुःखद घटनेमुळे माहूर आणि यवतमाळ परिसरात शोककळा पसरली आहे.

COMMENTS