बाईच्या अवकाशातील घुसमट आणि कोलाहल टिपणारी कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

  कवयित्री कीर्ती जाधव यांच्या 'बाई तुझ्या अवकाशात' ह्या संग्रहातील कविता ही प्रामुख्याने स्त्री-विशिष्ट जाणिवेची कविता आहे. स्त्रिय...

 

कवयित्री कीर्ती जाधव यांच्या 'बाई तुझ्या अवकाशात' ह्या संग्रहातील कविता ही प्रामुख्याने स्त्री-विशिष्ट जाणिवेची कविता आहे. स्त्रियांचे आत्मभाव आणि आत्मभान अभिव्यक्त करणारी ही सशक्त कविता स्त्री-दुःखांचा शोध घेत स्त्री-पुरुषांच्या आनंददायी सहजीवनाची पाऊलवाट शोधते. पन्नास-साठ वर्षांपूर्वी ग्रामीण भागातील मुलींच्या खेळण्यांत रक्तचंदनाची एक बाहुली हमखास सापडत असे. कुणाला काही लागले, की ती बाहुली उगाळून त्यावर रक्तचंदनाचा लेप लावला जात असे. इतरांचे दुःख दूर करण्यात तिची किती झीज झाली, हे कोणाच्याही लक्षात येत नसे. किंबहुना सगळ्यांसाठी झिजणे आणि सगळ्यांना आपले सत्त्व पुरविणे हा जणू त्या बाहुलीच्या कर्तव्याचाच भाग होता. आता कवयित्रीला प्रश्न असा पडतो, की आपल्या आईचं जगणं यापेक्षा काय वेगळं होतं? कवयित्रीला आपल्या आईमध्ये एक रक्तचंदनाची बाहुली दिसते आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली, स्त्री-शोषणाची आणि समर्पणाची ही परंपरा इतकी सनातन आहे. कीर्ती जाधव यांची ही कविता ह्या कारणपरंपरेचा अभ्यासपूर्वक शोध घेताना दिसते.
'कुंडीत बहरणारी झाडं,
पिंज-यात झोके घेणारे पक्षी,
काचेतल्या पाण्यात उसळी मारणारे मासे,
चार भिंतीत अडकलेल्या बायका,
शेवटी सारं काही सारखंच' (पृष्ठ २०)
असे कवयित्रीला वाटते.
सगळ्यांना भरभरून देत, स्वतःला रितं करणारी नदी आणि सासरी निमूट नांदणारी बाई यांच्यात कवयित्रीला एक समान धागा दिसतो. म्हणून कवयित्री म्हणते :
'सोपं नसतं नदी होणं
तळातील खळबळ जिवंत ठेवत
वरवर शांत भासवत
प्रसन्नतेनं वाहत राहणं
सोपं नसतं नदी होणं
तसंच सोपंही नसतं
एक स्त्री होणं' (पृष्ठ २१)
अनेक वर्षे नदी होऊन वाहिल्यानंतर कवितागत 'मी'ला आता जगण्याच्या ॲपचा पासवर्ड सापडला आहे, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. बाई म्हणून भोगलेले सगळे व्यापताप तिला लख्ख आठवतात. म्हणून 'बाई'पणाच्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न ही कविता करते आहे.
'टोचत असतं खूप काही
मनात सलत असतं बरंच काही
पण सगळंच सांगता येत नाही
मनसोक्त लिहावं म्हटलं तरी
सगळं लिहिता येतंच असं नाही'
ही कवयित्रीची खरी खंत आहे.
सभोवार, सगळीकडे, आत-बाहेर
नुसता कोलाहल दाटलेला असताना
'ब-याचदा मौनच जास्त बोलतं
मनातल्या मनात'
हा कवितागत 'मी'चा अनुभव आहे.
प्रत्येक बाई कधी कुमारिका म्हणून, कधी परित्यक्ता म्हणून, कधी सवाष्ण म्हणून, तर कधी विधवा म्हणून ओळखली जाते, पण ती 'माणूस' म्हणून कधीच ओळखली जात नाही. ही कवयित्रीची खंत आहे. अशा वेळी
'पण खरंच बाई असते का अपूर्ण पुरुषाशिवाय?' हा प्रश्न कवयित्रीला सतावतो आहे.
बाईच्या जगण्याशी पूर्णांशाने एकरूप होऊन ह्या कवितेने बाईपणाच्या अवकाशातील सगळे अव्यक्त आयाम अधोरेखित केले आहेत.
आपल्या सनातनी परंपरेने शोषित स्त्रीजातीच्या द्रौपदी, अहल्या, सीता, ऊर्मिला, सावित्री, गौरी, राधा, गांधारी, पद्मावती, आवली अशा काही प्रतिमा निर्माण करून ठेवल्या आहेत. ह्या सगळ्या प्रतिमा लिंगसत्तेच्या उद्दामपणातून आलेल्या आहेत, असे कवयित्रीला वाटते. अगदी वर्तमानातही तीच परंपरा बिनबोभाटपणे चालू आहे. लिंगसत्तेचा हा उद्दाम चेहरा कवयित्री सर्व ताकदीनिशी खरवडून काढू पाहते आहे.
प्रत्येक बाईने आपल्या मनाच्या तळघरात काय काय दडवून ठेवलेले असते! तिने आपली सगळी स्वप्नं खुंटीला टांगून ठेवलेली असतात. असह्य घुसमट सहन करत विचारांच्या कितीतरी लाटा मनात कोंडून ठेवलेल्या असतात. हे सगळेच अगदीच असह्य झाल्यावर शेवटी कवयित्री लिहिते :
'थोडंसं मोकळं होईन म्हणतेय,
बाईच्या जातीला हे बरं दिसतं का...
या विळख्यातून सुटेन म्हणतेय
स्त्रीजन्मावर तेच तेच बोलण्यापेक्षा,
स्वतःची एक मुद्रा उमटवीन म्हणतेय' (पृष्ठ ५९).
स्वतःची मुद्रा उठविण्याचा, ह्या कवितेचा हा सूर अतिशय आश्वासक आहे.
मुळात 'बाई' समजून घेणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे. बाईमध्ये जशी रमणी असते, तशीच रणरागिणीही असते. बाई तिच्या आखीव-रेखीव बांध्यावरून समजत नाही. ती तिच्या सुंदर देहबोलीतून समजत नाही. त्यासाठी आधी गृहीत धरलेली, पारंपरिक आयुधे आणि आभूषणे उतरवून ठेवावी लागतात. तिच्या डोळ्यांत आरपार मुरलेले समर्पण आधी समजून घ्यावे लागते. त्यासाठी ह्रदयात आशयसंपन्नतेची ओल असावी लागते, ही पहिली अट आहे. पुरुषी मानसिकतेला ती सुजाणपणाची दृष्टी देण्याचा प्रयत्न ही कविता करते.
'बाई जगते श्वासांपेक्षा स्वप्नांवर अधिक'
हे आजवर न उलगडलेले कोडे ही कविता अगदी सहजपणे सोडवते. अंधारवाटा उजळण्यासाठी स्वतःचाच प्रकाश पेरत जाण्याचे आवाहन ही कविता करते. ह्या कवितेत परंपरेच्या जीर्ण जुनाट साखळ्या तुटत असल्याचे कर्णमधुर आवाज ऐकायला येतात. 'यापेक्षा सुंदर काय असू शकतं?' असा प्रश्न ही कवयित्री विचारते.

कवयित्री कीर्ती जाधव यांनी बाईच्या अवकाशाचा अतिशय डोळसपणे आणि बारकाईने वेध घेतला आहे. बाईच्या घालमेलीचा आणि घुसमटीचा आलेख मांडला आहे.
हा आलेख मांडताना कवयित्रीला काय दिसते?
'बाई तुझ्या अवकाशात
आता तंत्रज्ञान बिंत्रज्ञान
तरी अजूनही पेटत नाही
तुझ्या अस्मितेसाठी रान' (पृष्ठ ९३).
बाईच्या अस्मितेसाठी रान पेटले पाहिजे, ही कवयित्रीची अपेक्षा अगदीच रास्त आहे!
ह्या कवितेत कवयित्रीचे एक अभ्यासू आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित झाले आहे

दिल्लीतील 'त्या' दुर्दैवी घटनेनंतर तिला 'निर्भया' हे नाव देऊन हा समाज मोकळा झाला. पण लिंगसत्तेचा तो उन्माद आजही संपला आहे का? कधी संपणार ही भोगलोलुपता? दु:शासनाची ती छबी समूळ उपटून नाही का टाकता येणार? की निर्भयाच्या यादीत अशीच भर पडत राहणार? कवयित्रीने उपस्थित केलेले आणि वर्तमानाला निरुत्तर करणारे हे प्रश्न वाचकालाही अस्वस्थ करून जातात.
कवयित्री 'पुरुष' प्रतिमेला आवाहन करते, की
'ढासळू दे ते पुरुषप्रधान संस्कृतीचे फुटके बुरूज
येताना तू फक्त एकटा ये
पूर्वापार तुला सहज मिळालेली,
परंपरेची सर्व कवचकुंडले उतरवून,
तिच्यासाठी सर्वस्व अर्पण करत,
तिच्यातल्या माणूसपणाला साद घालत ये' (पृष्ठ ९०)
ह्या कवितेतली ही माणूसपणाची हाक फारच ह्रदयस्पर्शी आहे!
कवयित्रीने पिढ्यानपिढ्यांचे, बंदिस्त चौकटीतले जगणे अनुभवले आहे. एकीकडे 'गृहस्वामिनी' म्हणायचे आणि प्रत्यक्षात 'भोगदासी' समजायचे, ह्या दांभिक मनोवृत्तीतच स्त्री-शोषणाची मुळे दडलेली आहेत, याची जाणीव ह्या कवयित्रीला आहे. व्यक्त-अव्यक्ताच्या रेषेवरचे सगळे अनुभव कवयित्रीने पचवले आहेत, रिचवले आहेत. ती सकृतदर्शनी शांत दिसत असली, तरी तिच्या अंतःकरणाचा तळ ढवळलेला आहे. एकेकाळी रंगीबेरंगी गोधडी शिवणारी आजी आणि न्यून झाकून आयुष्याचा कोलाज बनवणारी आजची कवितागत 'मी' यांच्यात फारसा फरक नाही. फरक इतकाच की आता तिचा अक्षरोदय झाला आहे. म्हणून ती आत्मविश्वासाने म्हणते :
'आता कुणीच नाही रोखू शकणार
तिची गंधाळलेली स्वप्ने.
पंख पसरून हवेत उडणारीहान
तिला आलेल्या आत्मभानाची फुलपाखरे' (पृष्ठ ७२).
दीर्घ काळानंतर आलेले हे आत्मभान हेच ह्या कवितेचे खरे यश आहे! कारण तिच्या स्वप्नांचे सुंदर आभाळ तिने ह्या कवितेत उतरविले आहे.
'बाई तुझ्या अवकाशात' ह्या कवितेत कवयित्रीने 'बाई'पणाच्या परंपरागत आणि परिघाबाहेरच्या उपेक्षित जगण्याचा स्पष्ट उच्चार केला आहे. स्त्रीजीवनातील घुसमटीला चपखल उद्गार दिला आहे. बाई समजून घेण्याचा आणि बाई समजून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. ह्या कवितेने शतकांचे कालचक्र आपल्या कवेत घेतले आहे. बाईला गुलाम बनविणारी दावण तोडण्याचा मनस्वी प्रयत्न केला आहे. इतके सगळे करूनही ह्या कवितेत कुठेही आगपाखड नाही किंवा आक्रस्ताळेपणा नाही. अतिशय धीरोदात्तपणे केलेली ही कारणपरंपरेची स्वच्छ अशी मांडणी आहे, जी समाजाला अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडते. ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, सजग स्त्रीवादी दृष्टिकोनातून उतरलेल्या ह्या कविता पुढील काळात अधिक प्रगल्भतेने स्त्री-कवितेत भर घालतील, असा विश्वास वाटतो. परिवर्तनवादी विचार आणि आशय वाचकांपर्यंत नेमकेपणाने पोहोचविण्यात ही कविता कमालीची यशस्वी झाली आहे.
कीर्ती जाधव यांच्या, मुक्तछंदातील ह्या तरल कवितेला प्रतिमा-प्रतीकांचा फारसा सोस नसला, तरी ही कविता रूपकांच्या माध्यमातून वाचकांशी ह्रद्य संवाद साधते.
'पुन्हा बाईच व्हायचय' ह्या कवितेने केलेला ह्या संग्रहाचा समारोप फारच सूचक आणि आश्वासक आहे. कवितागत 'मी' म्हणते :
'मनातला ओलावा जपतमी
मला पुन्हा बाईच व्हायचय.
सा-या विश्वाच्या शांतीचं मूळ
माझ्या कुशीतून प्रसवायचय.i7 
तुझ्या-माझ्यातलं गुंतागुंतीचं
हे आदिम नातं
अधिकाधिक सुकर करून जगायचय.
तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ
हा मुद्दा गौण ठरवत
आपण दोघेही मनुष्य आहोत
कोल्लम
यावर ठाम राहायचय' (पृष्ठ ९४).
ह्या कवितेत कवयित्रीने अतिशय प्रगल्भपणे स्त्री-पुरुष सहजीवनाची समंजस, सकारात्मक, समजूतदार आणि सुंदर अशी मांडणी केली आहे. इथे ह्या कवितेने अपेक्षित उंची गाठली आहे. कवयित्रीचे 
'बाई तुझ्या अवकाशात' (कवितासंग्रह)
कवयित्री : कीर्ती जाधव
प्रकाशक : सृजनसंवाद प्रकाशन, ठाणे
मुखपृष्ठ : मंदार नेने
पृष्ठे ९६ किंमत रु. २५०6

पुस्तक परिचय :
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group