*११० महाविद्यालयांचा विक्रमी सहभाग; विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठी विविध समित्यांचे विशेष परिश्रम*
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १९ ऑक्टोबरदरम्यान आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नांदेड, लातूर, परभणी व हिंगोली या चारही जिल्ह्यांतील तब्बल ११० महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभाग नोंदवला असून, गेल्या दहा वर्षांतील हा विक्रमी सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे.
सायन्स कॉलेजच्या इतिहासात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवासाठी महाविद्यालय प्रशासनाने विविध समित्यांची स्थापना केली आहे. महोत्सवात सहभागी होणाऱ्या विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, एकूण ५२८ विद्यार्थिनींच्या निवासाची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
विद्यार्थिनी निवास व्यवस्था समितीच्या समन्वयक डॉ. संगीता मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सायन्स कॉलेज मुलींचे वसतिगृह आणि पीपल्स कॉलेज मुलींचे वसतिगृह येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सायन्स कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहात २५० विद्यार्थिनींच्या निवासाची सोय करण्यात आली आहे.
सायन्स कॉलेज वसतिगृहातील व्यवस्थापनाची जबाबदारी कु. चैताली काकडे, श्रीमती माने, सौ. सामीना शेख, सौ. कोमल मगरे, सौ. रुपाली गच्चे, कु. पूजा वडगावकर, श्री. नवनाथ कदम आणि श्री. माधव पावडे यांनी सांभाळली. विशेष म्हणजे, १५ ऑक्टोबर रोजी रात्री एक वाजेपर्यंत विविध जिल्ह्यांतून दाखल होणाऱ्या विद्यार्थिनींची वसतिगृह प्रवेश प्रक्रिया सुरू होती.
तसेच पीपल्स कॉलेज मुलींच्या वसतिगृहातील निवास व्यवस्थेसाठी सौ. आम्रपाली कसबे, सौ. पूनम लोहना, सौ. अंकिता वडजे, सौ. प्रतीक्षा सुर्वे, सौ. प्रीती यादव, सौ. पद्मजा पोले, सौ. अर्चना ठोके, सौ. मयुरी फुके, श्री. दिलीप कारेगावकर आणि श्री. महेश डोंगरकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या वसतिगृहातही विद्यार्थिनींच्या नोंदणी व निवास व्यवस्थेचे काम सुरळीतपणे पार पाडण्यात आले.
दुष्काळसदृश परिस्थितीचे सावट असतानाही विद्यार्थ्यांचा उत्साह कायम असून, आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी विद्यार्थी वर्षभर या युवक महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. विविध कलाप्रकारांसाठी वर्षभर केलेल्या मेहनतीचे सादरीकरण करण्याची संधी या महोत्सवाच्या माध्यमातून मिळत आहे.
यंदा ११० महाविद्यालयांचा सहभाग आणि ५२८ विद्यार्थिनींची उपस्थिती ही महोत्सवाची विशेष वैशिष्ट्ये ठरली आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याबरोबरच त्यांच्यातील आत्मविश्वास, संघभावना आणि सांस्कृतिक जाणीव वृद्धिंगत करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण ठरत आहे.
सायन्स कॉलेजमध्ये प्रथमच आयोजित करण्यात आलेला हा भव्य युवक महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय प्रशासन, विविध समित्यांचे समन्वयक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्वयंसेवक अहोरात्र परिश्रम घेत आहेत. विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षित व सुविधायुक्त निवास व्यवस्थेसाठी कार्यरत समितीचे योगदान उल्लेखनीय ठरत आहे.

COMMENTS