प्रा. साईनाथ पाचारणे लिखित ‘डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा’ हा ग्रंथ डॉ. सुरेश सावंत यांच्या समग्र बालकवितेचा सखोल, आस्वादात्मक आणि समीक्षात्मक पट उलगडणारा एक अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासग्रंथ आहे. मराठी बालसाहित्याच्या प्रांतात डॉ. सुरेश सावंत यांचे योगदान अतिशय मोलाचे आणि महत्त्वाचे आहे. प्रस्तुत ग्रंथात लेखकाने डॉ. सावंत यांच्या १४ बालकवितासंग्रहांचा केवळ तात्त्विक आढावा घेतलेला नाही, तर बालमनाची विविध रूपे, बालसुलभ कल्पकता, निसर्गप्रतिमा आणि मूल्याधिष्ठित संस्कार या सर्वांचा रसाळपणे आस्वाद घेत समीक्षा मांडली आहे.
डॉ. सुरेश सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कवित्वाचा परिचय करून देताना ग्रंथकार स्पष्ट करतात की, बालसाहित्य आणि बालशिक्षण या दोन्ही गोष्टी त्यांच्यासाठी परस्परपूरक आहेत.
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि पूजनीय साने गुरुजी यांना आदरस्थानी मानणाऱ्या डॉ. सावंत यांनी बालशिक्षणाला आनंददायी करण्यासाठी बालसाहित्याचा सशक्त वापर केला आहे. त्यांनी ‘हिरवे हिरवे झाड’, ‘जांभूळबेट’, ‘भुताचा भाऊ’, ‘बालकनीती’, ‘काठीचा घोडा’, ‘पळसपापडी’, ‘कॉमिक्सच्या जगात’, ‘रानफुले’, ‘युद्ध नको बुद्ध हवा’, ‘नदी रुसली नदी हसली’, ‘गूगलबाबा’ यांसारख्या १४ कवितासंग्रहांच्या माध्यमातून बालकांचे भावविश्व साकारले आहे.
डॉ. सावंत यांच्या कवितेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची निसर्गाशी आणि पशुपक्ष्यांशी असलेली जवळीक. ‘हिरवे हिरवे झाड’ या पहिल्याच संग्रहापासून मुलांची बोलीभाषा अचूक पकडण्याची कला त्यांना साधली आहे. तापलेल्या जमिनीवर मायेची सावली पांघरणारे झाड असो, वा आरशासमोर रुसून बसलेली चिमणी असो, डॉ. सावंत यांची लेखणी निसर्गातील घटकांवर सहजपणे मानवी भावनांचे आरोपण करते. त्यांच्या या प्रकृती-चित्रणातून लहान मुलांना निसर्गाकडे पाहण्याची सौंदर्यदृष्टी मिळते आणि नकळत जीवनमूल्यांचे धडेही मिळतात.
मुलांच्या अफाट कल्पनाशक्तीला आणि जिज्ञासू
वृत्तीला खतपाणी घालण्यात डॉ. सावंत यांच्या कविता अत्यंत यशस्वी ठरतात. ‘जांभूळबेट’मधील परी व भुतांच्या अद्भुतरम्य कल्पना, ‘जेव्हा झाडांना फुटतात पाय’मधील भन्नाट कल्पनाविलास किंवा ‘पंख मला जर असते दोन’मधील आभाळाची निळाई पंखांवर माखण्याची ओढ, हे सर्व प्रसंग बालमन थक्क करणारे आहेत. त्याचप्रमाणे ‘कॉमिक्सच्या जगात’ या संग्रहात त्यांनी दीर्घकाव्याचा अनोखा प्रयोग करून बालवाचकांना नागराज, ध्रुव, परमाणू, चौधरी चाचा अशा लोकप्रिय कॉमिक्स पात्रांच्या अद्भुत विश्वाची सहल घडवून आणली आहे.
बालसाहित्यात केवळ निखळ मनोरंजन नसून ज्ञानार्जन आणि मूल्यसंस्कार यांचा समतोल असावा लागतो. डॉ. सावंत यांनी ‘भुताचा भाऊ’, ‘गूगलबाबा’ आणि ‘बालकनीती’ या संग्रहांच्या माध्यमातून विज्ञान, तंत्रज्ञान, निसर्ग व मानवी शरीराची रचना या विषयांवर अत्यंत सोप्या आणि रंजक भाषेत भाष्य केले आहे. ‘बालकनीती’मध्ये त्यांनी पालकांच्या पोलिसी धाकाविरुद्ध मुलांची बाजू मांडून बालमानसशास्त्राचे उत्तम भान दाखवले आहे.
‘युद्ध नको बुद्ध हवा’ हा त्यांचा महाकाव्यात्मक बालकवितासंग्रह मानवी शांतता आणि विश्वात्मकतेचा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश देतो. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या भीषणतेची आठवण करून देत, बंदुकीच्या नळीवर बसून हसणाऱ्या फुलपाखराची प्रतिमा आणि बुद्धांच्या शांतीचा मार्ग त्यांनी कुमारांपुढे मांडला आहे. त्याचप्रमाणे ‘नदी रुसली नदी हसली’ या संग्रहातून मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमाची खंत व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल राखण्याची जाणीव त्यांनी बालमनात पेरली आहे.
प्रा. साईनाथ पाचारणे यांनी या समीक्षाग्रंथात डॉ. सुरेश सावंत यांच्या कवितेतील नादमयता, यमकांचे सूक्ष्म सौंदर्य, लयबद्धता आणि प्रवाही भाषाशैली यांचा अत्यंत मार्मिकपणे शोध घेतला आहे. कवीची सामाजिक कटिबद्धता, बालभावविश्वाचे सखोल आकलन आणि प्रयोगशीलता या सर्व अंगांचा आस्वाद घेत हा समीक्षाग्रंथ वाचकांसमोर मांडला आहे.
थोडक्यात सांगायचे तर, हा समीक्षाग्रंथ डॉ. सुरेश सावंत यांच्या बालकवितेची व्याप्ती आणि तिचे श्रेष्ठत्व सिद्ध करणारा आहे. डॉ. सुरेश सावंत यांची कविता केवळ मुलांचे मनोरंजन करत नाही, तर त्यांना ज्ञानाच्या, संवेदनशीलतेच्या आणि मानवी मूल्यांच्या नव्या दिशा दाखवते. प्रा. साईनाथ पाचारणे यांनी अतिशय आस्वादक, सोप्या आणि समृद्ध भाषेत हा समीक्षात्मक ग्रंथ लिहून मराठी बालसाहित्याच्या अभ्यासात एक मोलाची भर घातली आहे.
*********
'डॉ. सुरेश सावंत यांची बालकविता : आशय, शैली आणि समीक्षा' (समीक्षाग्रंथ)
लेखक : प्रा. साईनाथ पाचारणे
प्रकाशक : संगत प्रकाशन, नांदेड
पृष्ठे : १७६; किंमत : ३५० रुपये
*********
पुस्तक परिचय :
किरण भावसार, सिन्नर जि. नाशिक.

COMMENTS