वेणू' : अभावग्रस्त आयुष्याचा प्रभावशाली गोफ डॉ. सुरेश सावंत, नांदेड.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ना. यशवंतराव चव्हाण यांच्या सहचारिणी सौ. वेणूताई आणि ना. शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी सौ. कुसुमताई यांचे जी...

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ना. यशवंतराव चव्हाण यांच्या सहचारिणी सौ. वेणूताई आणि ना. शंकरराव चव्हाण यांच्या सहचारिणी सौ. कुसुमताई यांचे जीवन हे देवघरातील शांत नंदादीपासारखे होते. त्यांनी आपल्या समर्पणाने आपल्या कुटुंबाचे जीवन उजळून काढले, पण कधीही आपले स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले नाही. किंबहुना त्यांनी आपले अस्तित्व जाणीवपूर्वक कंसात ठेवून दिले होते. ह्या दोन्ही माउलींनी आपल्या पतीच्या मोठेपणातच समाधान मानले होते. 'मिरवणे' हा शब्द ह्या दोघींच्याही शब्दकोशात नव्हता. त्यांना कसलीच राजकीय महत्त्वाकांक्षा नव्हती. सौ. कुसुमताईंनी 'कुसुमांजली' हे आत्मकथन लिहून आपल्या स्वतःच्या, पतीच्या आणि कुटुंबाच्या जडणघडणीवर प्रकाश तरी टाकला, पण सौ. वेणूताईंना मात्र स्वतःचे आजारपण, पतीचा स्वातंत्र्यपूर्व आंदोलनातील सहभाग, तुरुंगवास आणि स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारण व समाजकारणातील योगदान यामुळे असे काही लिहून ठेवायला अवकाशच मिळाला नाही. 


प्रा. नारायण शिंदे यांनी वेणूताईंच्या प्रकृतीला साजेशी 'वेणू' ही चरित्रात्मक कादंबरी लिहून ही उणीव भरून काढली आहे. प्रा. शिंदे हे यशवंतराव चव्हाण आणि सौ. वेणूताई चव्हाण यांच्या प्रेमात आकंठ बुडालेले व्यक्तिमत्त्व आहे. जवळजवळ ३५ वर्षांपूर्वी त्यांनी 'सह्यगिरीचे हुंकार' हे पुस्तक लिहून यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर केला होता. यशवंतराव चव्हाण विचारमंचच्या माध्यमातून त्यांनी पुरोगामी विचार आणि कार्याचा यज्ञ, गेली ३५ वर्षे अखंड प्रज्वलित ठेवला आहे. एखाद्या महापुरुषावरची अव्यभिचारी निष्ठा कशी असावी, याचा हा उत्तम आदर्श म्हणावा लागेल.

लेखकाने कादंबरीची पारंपरिक चौकट मोडून ही चरित्रात्मक कादंबरी लिहिली आहे. साक्षात यशवंतराव चव्हाण हे वेणूताईंच्या आठवणी सांगत आहेत, अशी कल्पना करून लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे. यशवंतरावजींच्या भावविभोर निवेदनातून ही कादंबरी फुलत जाते, बहरत जाते. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ह्या कादंबरीची तिसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे.


यशवंतरावजी आपल्या आईचा उल्लेख 'संस्कारांचे ग्रामीण विद्यापीठ' असा करतात. यशवंतरावजींच्या बालपणी त्यांच्या कुटुंबात प्रचंड दैन्य आणि दारिद्र्य होते. वडलांच्या निधनानंतर विधवा आईने आपल्या तीन मुलांना अक्षरशः घडविले. पहाटे उठून जात्यावर दळण दळत असताना विठाई एक ओवी नेहमी म्हणत असे :

'नका बाळांनो डगमगू। चंद्र सूर्यावरील जातील ढगू'

अशा आश्वासक शब्दांत आई विठाबाई (आक्का) आपल्या लेकरांना धीर देत असे आणि त्यांना जगण्याचे बळ देत असे. विठाईने गरिबीतही आपल्या मुलांना संस्कारांचे बाळकडू पाजले. त्याग, धैर्य, जिद्द आणि देशभक्तीचे धडे दिले. यशवंतरावजींनी उमलत्या वयात देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. चळवळ आणि शिक्षण असा त्यांचा दुहेरी प्रवास समांतर चालू होता. त्यांचे शिक्षणात कमी आणि चळवळीत अधिक लक्ष होते. त्यांना व्यक्तीपेक्षा राष्ट्र महत्त्वाचे वाटत होते. राष्ट्र टिकले तरच आपण सुखाने जगू शकतो, असा त्यांचा ठाम विश्वास होता. 


यशवंताने लवकर लग्न करून आपला संसार थाटावा, असे विठाईला वाटत असे. यशवंतरावजी आपल्या लग्नाच्या संदर्भात आपल्या बिकट कौटुंबिक परिस्थितीचा विचार करत होते. यशवंतराव जेव्हा लग्नासाठी वेणूताईंना पाहायला गेले, तेव्हा त्यांनी आपण चळवळीतील कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट सांगून टाकले. तरीसुद्धा वेणूताईंनी लग्नाला ठामपणे होकार दिला. त्या होकारातून त्यांचे विचार जुळत असल्याचे सिद्ध झाले. दि. २ जून १९४२ रोजी यशवंतराव आणि वेणूताईंचा विवाह संपन्न झाला. स्वातंत्र्य चळवळीच्या ऐन धामधुमीत हे लग्न झाले. 


आपल्या संसाराबद्दल यशवंतरावजी सांगतात, की जागोजागी फाटलेल्या संसाराला आईने आणि वेणूबाईने किती ठिगळं लावली असतील, याची गणतीच नाही. लग्नानंतर यशवंतरावजींनी काही काळ घरी राहून वकिली केली, पण यशवंतरावजींकडे अशिलांपेक्षा चळवळीतील कार्यकर्त्यांची गर्दी अधिक असे. कार्यकर्त्यांच्या बैठका यशवंतरावजींच्या घरातच होत असत. 'चले जाव'ची हाक यशवंतरावजींना शांत बसू देत नसे. त्यामुळे त्यांचे वकिलीत लक्ष लागत नसे. 

लग्नानंतर दीड महिन्यानंतर लगेच ते आंदोलनात सहभागी होण्यासाठी घर सोडून मुंबईला निघाले. यशवंतरावजींनी स्वतःला चळवळीत इतके झोकून दिले होते, की त्यांचे स्वातंत्र्य चळवळीशीच लग्न केले आहे की काय असेच वाटत असे. चळवळीतील ते सर्व कार्यकर्ते जणू मृत्यूला सोबत घेऊनच फिरत असत. 


यशवंतरावजी भूमिगत राहून कार्य करीत असल्यामुळे इंग्रज सरकारने त्यांना पकडण्यासाठी एक हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. इंग्रजांचे पोलीस इतकेच करून थांबले नाहीत, तर त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या कुटुंबीयांना त्रास द्यायला सुरुवात केली. तरीसुद्धा वेणूताई तिळमात्र घाबरल्या नाहीत. आपल्या सौभाग्याइतकेच देशाचे स्वातंत्र्यही महत्त्वाचे आहे, असे त्यांना वाटत असे. वेणूताईंनी यशवंतरावजींच्या चळवळीला सर्वतोपरी साथ दिली. याबद्दल यशवंतरावजी म्हणतात, 'वेणूबाईंच्या सहनशीलतेची खोली समुद्राच्या खोलीसारखी न मोजता येण्यासारखीच होती'. वेणूताईंचे दृढ मनोबल ही गोष्ट यशवंतरावजींना प्रेरणा देणा-या इतर घटकांइतकीच महत्त्वाची वाटते. 


१९४३ सालची मकर संक्रांत आली. लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत. वेणूताईंनी आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. सर्व व्यवस्थित चालले होते. इतक्यात पोलीस आले. त्यांनी वेणूताईंना यशवंतरावांविषयी दरडावून प्रश्न विचारले, पण वेणूताईंनी काहीच माहिती दिली नाही. चिडलेल्या पोलिसांनी वेणूताईंना अटक करून त्यांच्या हातात बेड्या घातल्या. अशा प्रकारे वेणूताईंच्या 'संक्रांतीवर संक्रांत' आली होती. या घटनेबद्दल यशवंतरावजी म्हणतात, 'मी लग्न करून वेणूताईंना सतीचे वाण दान दिले होते. ते सतीचे वाण वेणूताईंनी मोठ्या धैर्याने स्वीकारले आणि सांभाळले होते. हे वेणूताईंचे मोठेपण होते'. वेणूताईंना सहा आठवडे कराड आणि इस्लामपूरच्या जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या संदर्भात यशवंतरावजी म्हणतात, 'माझ्या कुटुंबाने अशा प्रतिकूल परिस्थितीत हात टेकले असते, तर मी थकलो असतो, थांबलो असतो'. आपले कुटुंब आपली सावली होऊन आंदोलनात सहभागी होत राहिले, याबद्दल यशवंतरावजींनी समाधान व्यक्त केले आहे. 


जेलमधून सुटून आल्यावर यशवंतरावांनी वेणूताईंना प्रश्न विचारला, 'जेलमध्ये पोलिसांनी तुम्हाला कशी वागणूक दिली?'

त्यावर वेणूताईंनी शांतपणे उत्तर दिले, 'जशी पोलीस कैद्याला वागणूक देतात तशी'. 

जेलमधील पोलिसांची वागणूक किती निर्दयपणाची असते, हे यशवंतरावजींना माहीत होते. जेलमधील निर्दय वागणूक आणि रूक्ष वातावरणाचा वेणूताईंच्या प्रकृतीवर वाईट परिणाम झाला आणि त्या आजारी पडल्या. अशा काळातही वेणूताई धीरोदात्तपणे वागल्या. 

यशवंतरावजी म्हणतात, 'माझ्या कुटुंबासाठी सुखाचे क्षण मृगजळासारखे होते'. 

थोरले बंधू ज्ञानदेव वारले तरी यशवंतरावजी घरी जाऊ शकले नाहीत, कारण त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा लावून ठेवला होता. प्रस्तुत कादंबरीत सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि ऐतिहासिक परिस्थितीचे यथातथ्य चित्र उमटले आहे. 


यशवंतरावजींच्या कुटुंबावर एकामागून एक संकटे येत होती. वेणूताईंच्या पायगुणामुळेच हे घडत आहे, असेही काही लोक बोलत. पण वेणूताईंनी ते मनाला लावून घेतले नाही. 

उलट आई विठाई आणि वेणूताईंनी कुटुंबाला मोठ्या हिंमतीने सांभाळले. ह्या दोघींनी एकमेकींना सांभाळत संसाराचा गाडा बिनतक्रार ओढला. सततची काळजी आणि चिंता यामुळे वेणूताईंची प्रकृती वरचेवर बिघडत गेली. 

यशवंतरावजींनी आपल्या मित्रांच्या मदतीने वेणूताईंना पुण्यात आणले आणि त्यांना वैद्यकीय उपचार मिळवून दिले. वेणूताईं आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून यशवंतरावजींचीच काळजी करत होत्या. यशवंतरावजींना त्या अपराधीपणाचे शल्य टोचत असे. म्हणून वेणूताई यशवंतरावजींना म्हणाल्या, 'माझ्या आजारपणामुळे तुम्ही चळवळीपासून दूर जाऊ नये याचीच मला भीती वाटते. माझे व तुमचे चळवळीतील योगदान कमी पडू नये, अन्यथा माझे मन मला कधीही माफ करणार नाही'. 

यशवंतरावजी मनाने खचू नयेत, म्हणून वेणूताई त्यांना धीर देत. त्या यशवंतरावजींना म्हणत, 'तुमचे चळवळीतील अनुभव सांगा, म्हणजे माझा आजार आपोआप कमी होईल'. 

यशवंतरावजींचे चळवळीतील अनुभव ऐकून वेणूताईंना बळ मिळत असे. 


वास्तविक वेणूताईंचे माहेर आणि सासर ही दोन्ही घरे वादळात सापडलेल्या नौकेसारखीच होती. तरीसुद्धा वेणूताईंना हवापालट व्हावा म्हणून त्यांना माहेरी फलटणला पाठविण्याचा निर्णय यशवंतरावजींनी घेतला. या काळात यशवंतरावजीही आजारी पडले होते. अशा कठीण काळात परस्परांना आधार देण्यासाठी एकमेकांना भेटता न येण्याचे दु:ख वेणूताई आणि यशवंतरावजी दोघेही सहन करत होते. 

वेणूताईंचा आजार आणि जनआंदोलन हे दोन्ही समांतर वाढत चालले होते. वेणूताईंचा आजार फारच बळावला होता. वेणूताईंना भेटण्यासाठी यशवंतरावजींनी फलटणला जाण्याचा निर्णय घेतला. जाऊन पाहिले, तर वेणूताई मृत्यूशी झुंज देत होत्या. भेटून लगेच परत निघावे असा त्यांचा विचार होता, पण वेणूताईंनी आग्रह केल्यामुळे ते दोन दिवसांसाठी तिथेच थांबले. वेणूताईंवर उपचार करण्यासाठी त्यांनी फलटणमधील आपले मित्र, डॉ. बर्वे यांना बोलावून घेतले. भूमिगत असलेल्या यशवंतरावजींना पाहून देशभक्त डॉ. बर्वे यांना आश्चर्य वाटले. डॉ. बर्वे यांनी वेणूताईंच्या उपचारांची जबाबदारी आनंदाने स्वीकारली. 


भूमिगत असलेले यशवंतरावजी सासुरवाडीत आल्याची गुप्त बातमी कुणीतरी पोलिसांना दिली. यशवंतरावजी परत निघण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली. अशा कसोटीच्या प्रसंगीही वेणूताईंनी दु:ख किंवा तक्रारीची छटा आपल्या चेहर्‍यावर दिसू दिली नाही. यावरून, शारीरिक प्रकृतीने खंगलेल्या वेणूताईंचा मानसिक खंबीरपणा आणि कणखरपणा दिसून येतो. 

आता यशवंतरावजींचे भूमिगत जीवन संपले होते, कारण आता ते राजबंदी बनले होते. यशवंतरावजींना सहा महिन्यांची शिक्षा ठोठावून येरवडा जेलमध्ये टाकण्यात आले. यथाकाळ शिक्षा भोगून यशवंतरावजी बाहेर आले. आता यशवंतरावजींचे घर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. त्या काळात वेणूताई सर्व कार्यकर्त्यांची सरबराई प्रेमाने करत असत. 


१९४५च्या सुमारास वेणूताईंना मुलगी झाली. सगळ्यांना आनंद झाला, पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण ती मुलगी दहा दिवसांतच मरण पावली. 

१९४६ साली मुंबई इलाख्यात कायदेमंडळाची निवडणूक जाहीर झाली. कॉंग्रेस पक्षातर्फे दक्षिण सातारा मतदारसंघातून यशवंतरावजींची उमेदवारी परस्पर जाहीर करण्यात आली. ही निवडणूक लढविण्याची यशवंतरावजींची मानसिक तयारी नव्हती. ही बातमी समजल्यावर वेणूताईंची प्रतिक्रिया होती, 'आपण आजपर्यंत जी राष्ट्रसेवा केली, त्याचे हे फळ आहे. त्याचा सन्मान केलाच पाहिजे'. 

लेखकाने ह्या कादंबरीत घटना-प्रसंगांची मांडणी तर व्यवस्थित केली आहेच, शिवाय यशवंतरावजी आणि वेणूताई यांच्यातील संवाद अतिशय ह्रदयस्पर्शी आहेत. ह्या कादंबरीला ओघवते कथानक तर आहेच, शिवाय पिळदार जीवननाट्यही आहे. 


आपल्या प्रकृतीचा त्रास बाजूला ठेवून वेणूताईंनी ह्या निवडणुकीच्या प्रचारात सक्रिय भाग घेतला. 

स्त्रियांशी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे यशवंतरावजी विजयी झाले. घरी आल्यावर यशवंतरावजी वेणूताईंना म्हणाले, 'या यशाची खरी मानकरी तूच आहेस'. 

त्यावर वेणूताई अतिशय शांतपणे आणि समजूतदारपणे म्हणाल्या, 'यशाची अशी वाटणी करायची नसते'. 

एका अल्पशिक्षित स्त्रीचा केवढा हा समंजसपणा! 

ते ऐकल्यावर यशवंतरावजी म्हणतात, की मला मिळणारी ही सोबत आयुष्यभर माझी आत्मशक्ती म्हणून काम करत राहिली आहे. 

ह्या विजयानंतर यशवंतरावजींना मंत्रीपद मिळाले नाही. त्यांना 'पार्लमेंटरी सेक्रेटरी' हे पद देण्यात आले. हे पद स्वीकारावे की नाही, याबद्दल यशवंतरावजींची मन:स्थिती द्विधा बनली होती. म्हणून त्यांनी वेणूताईंना सल्ला मागितला. त्यावर वेणूताईं म्हणाल्या, 'आपल्याला दिलेले पद स्वीकारायचे नसेल, तर आपण निवडणूकच का लढवली, असा प्रश्न निर्माण होतो'.

वेणूताईंची भूमिका इतकी स्वच्छ होती. 


यशवंतरावजींनी वेणूताईंचा हा सल्ला शिरसावंद्य मानून पार्लमेंटरी सेक्रेटरी हे पद स्वीकारले. याचा अर्थ, यशवंतरावजींच्या जीवनात वेणूताईंच्या शब्दाला अनन्यसाधारण महत्त्व होते. 

ते पद स्वीकारल्यानंतर यशवंतरावजींनी वेणूताईंना मुंबईत बोलावून घेतले. मुंबईत आल्यावर वेणूताईंनी आपल्या मनासारखा संसार थाटला, पण त्यांचा हा आनंद फार दिवस टिकला नाही. गावाकडून, गणपतराव आजारी असल्याचा निरोप आला आणि वेणूताईंना त्यांच्या शुश्रूषेसाठी लगेच गावी जावे लागले. अशा प्रसंगांतून त्यांच्या कौटुंबिक बांधिलकीची प्रचिती येते. यशवंतरावजींना पार्लमेंटरी सेक्रेटरी या पदावर फारच कमी मानधन मिळत असे. अशा परिस्थितीत वेणूताईंनी उधार-उसनवारी करून संसाराचा गाडा रेटला. 

पुढे १५ ऑगस्ट १९४७ रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले. या वेळी यशवंतरावजींनी पहिली गोष्ट कोणती केली असेल, तर ती म्हणजे महात्मा गांधीजींची प्रतिमा आणून आपल्या अभ्यासिकेत लावली. पुढे वेणूताईंनी ही प्रतिमा आयुष्यभर देवघरात लावून तिची पूजा केली. 


१५ डिसेंबर १९४७ रोजी गणपतराव यांचे निधन झाले. त्या घटनेचा वेणूताईंच्या प्रकृतीवर आणखी खोल परिणाम झाला. 

१९५२च्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर यशवंतरावजी पुरवठा खात्याचे मंत्री बनले. आता त्यांना मलबार हिलवर सरकारी क्वार्टर मिळाले. यशवंतरावजी घरी असोत किंवा दौ-यावर असोत, वेणूताई सगळ्यांचे आदरातिथ्य करत. वेणूताई आयुष्यभर सगळ्यांसाठी झिजत राहिल्या, झटत राहिल्या. त्यांनी सासर आणि माहेर, ह्या दोन्ही कुटुंबांची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन, दोन्हीकडच्या भावा-बहिणींच्या मुलामुलींची लग्नं लावून दिली. सरवर नावाच्या नोकराचेही लग्न लावून दिले. दरम्यानच्या काळात चव्हाण परिवारावर सुखदुःखाचा उन्हाळा-पावसाळा येतच राहिला. प्रस्तुत कादंबरीत इतर सगळी पात्रं असली, तरी वेणूताईंचे जीवन केंद्रस्थानी आहे. लेखकाने चरित्रनायिकेचे चरित्रदर्शन तर घडविले आहेच, शिवाय स्वभावदर्शनही घडविले आहे. 


१९५६ साली यशवंतरावजी द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बनले. ते वेणूताईंना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आग्रह करत. तथापि वेणूताईंनी सभासमारंभात मिरवण्यापेक्षा कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्याला नेहमीच प्राधान्य दिले. 

वेणूताई सत्तेच्या स्थानापासून आणि मानापासून जाणीवपूर्वक अलिप्त राहिल्या. मंत्र्याच्या पत्नीला पतीसोबत प्रदेशात जाण्याची संधी मिळत असते, पण वेणूताई यशवंतरावजींसोबत कधीही परदेशात गेल्या नाहीत. फारच आग्रह केल्यावर नेपाळ आणि रशिया दौ-यात त्या सहभागी झाल्या होत्या. परदेश दौऱ्यावर असताना यशवंतरावजींनी लिहिलेली पत्रं त्या आवडीने वाचत आणि इतरांना वाचून दाखवत. यशवंतरावजी म्हणतात, 'शहरी माणूस लवकरच चंगळवादी बनतो, पण वेणूताई मात्र सर्व प्रकारच्या चंगळवादापासून जाणीवपूर्वक दूर राहिल्या'. यशवंतरावजी आणि वेणूताई यांच्या आवडीनिवडी सारख्या होत्या. वेणूताईंना नाटक पाहायला आणि त्यावर यशवंतरावजींसोबत चर्चा करायला आवडत असे. 


१९६२मध्ये पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यशवंतरावजींना दिल्लीत बोलावले आणि संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आता त्यांना दिल्लीत '१- रेस कोर्स रोड' हा बंगला मिळाला. तिथे त्यांनी नोकरांसाठी खास खोल्या तयार करवून घेतल्या. याच बंगल्याच्या आवारात त्यांनी घनश्याम ह्या नोकराच्या मुलीचे लग्न लावून दिले. हे सगळे नोकरचाकर वेणूताईंचे आप्त बनले होते. नोकरांच्या बायकांना त्यांनी आपल्या सुना समजून जीव लावला. नोकरांच्या लेकरांना आपली नातवंडे समजून त्यांना अंगाखांद्यावर खेळविले. एकदा त्यांनी भंग्याच्या पत्नीला घरी बोलावून तिची ओटी भरली आणि भंग्याला वाकून नमस्कार केला. त्या क्षणी भंग्याच्या डोळ्यांत पाणी आले. वेणूताईंनी साधेपणा सोडला नाही आणि कधीही सत्तेचा बडेजाव दाखवला नाही. 

प्रा. नारायण शिंदे यांची भाषाशैली झुळझुळत्या झ-यासारखी प्रसन्न आहे. 


वेणूताई यशवंतरावजींच्या खाजगी सचिवांना आणि त्यांच्या पत्नीला बरोबरीची आणि सन्मानाची वागणूक देत असत. सर्व कर्मचारी त्यांना आपल्या कुटुंबातील सदस्य वाटत असत. 

वेणूताईंचे राहणीमान अतिशय साधे असे. उंची कपडे आणि दागदागिन्यांचा त्यांना अजिबात सोस नव्हता. यशवंतरावजींनी त्यांना कधी दागिने खरेदीचा आग्रह केला, तर त्या म्हणत, 'गळ्यात भारीभारीचे दागिने घालून वैभव वाढत नसते, तर प्रत्येकाला आपलंसं करण्यातून वैभव वाढते. मला कोणताही दागिना नको, तर मला सुखाचा संसार करायचा आहे'. 

वेणूताईंनी हा विचार आयुष्यभर सांभाळला. 

एकदा यशवंतरावजींनी परदेशात जाताना वेणूताईंना विचारले, 'मी परदेशातून तुझ्यासाठी काय आणावे असे तुला वाटते?' 

त्यावर क्षणाचाही विलंब न लावता वेणूताई म्हणाल्या, 'तुम्ही सुखरूप परत या, बस हेच पाहिजे मला. मला कपडेलत्ते, दागिने हे काही नकोत. पती हाच स्त्रीचा खरा दागिना असतो. पतीच्या कर्तृत्वात आणि अस्तित्वात स्त्रीचे वैभव भरलेले असते'. 

वेणूताईंची दृष्टी स्वच्छ होती आणि मन समाधानी होते. 


यशवंतरावजी मुख्यमंत्री असताना एकदा कवी सुधांशू यशवंतरावजींच्या भेटीसाठी मुंबईतील बंगल्यावर आले होते. दोघांचा तसा काही परिचय नव्हता. जो परिचय होता तो केवळ गीतांच्या माध्यमातून. कवी सुधांशूनी दिलेले कार्ड पाहून यशवंतरावजी स्वतःच स्वागतासाठी बाहेर आले. त्यांना नमस्कार करून सोफ्यावर नेऊन बसविले. कवी सुधांशू आले आहेत, हे त्यांनी वेणूताईंना सांगितले. ते ऐकल्यावर वेणूताई लगबगीने बाहेर आल्या आणि त्यांनी कविवर्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. वेणूताईंची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती, 'वा! दत्त दिगंबरच आमच्या घरी आले की!' 

वेणूताईंनी केलेल्या स्वागतामुळे कवी सुधांशू सद्गदित झाले होते. 

अशा प्रकारे वेणूताईंनी 'अतिथी देवो भव' ही संकल्पना आयुष्यभर निष्ठेने सांभाळली होती. 

घरी येणार्‍यांचे मानसन्मान, आदरातिथ्य तसेच त्यांच्याशी आपुलकीने वागणे, त्यांच्या सुखदु:खात समरस होणे, ज्यामुळे त्यांचे आणि आपले एक विश्वासाचे नाते निर्माण करण्याचा त्यांना जणू छंदच होता. 


अर्थमंत्री असताना एकदा यशवंतरावजी आणि वेणूताई कराडच्या विश्रामगृहात उतरले होते. तिथे गर्दी फारशी नव्हती. एक म्हातारी काठी टेकत टेकत तिथे आली. तिचे लुगडे फाटलेले होते. तिने फाटक्या लुगड्याच्या पदरात बांधून काहीतरी आणले होते. त्या जख्ख म्हातारीला पोलिसांनी अडवले आणि तिची चौकशी केली. ती पोलिसांना म्हणत होती, 'मला यशवंतरावांना भेटायचे आहे'. 

बाहेर काहीतरी गडबड आहे, हे यशवंतरावजींच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना सांगितले, 'मला त्या आजीबाईंना भेटायचे आहे. त्यांना आत घेऊन या'. 

पोलीस आजीबाईंना आत घेऊन आले. आजीबाईंनी आपल्या फाटक्या पदरात गुंडाळून आणलेला हार यशवंतरावजींच्या गळ्यात घातला. यशवंतरावांनी आणि वेणूताईंनी आजीबाईंना चरणस्पर्श केला. त्यांची विचारपूस केली. वेणूताईंनी आजीबाईंना आपल्या रूममध्ये नेऊन त्यांना खाऊपिऊ घातले आणि प्रेमाने निरोप दिला. आजीबाई खूश होऊन परत गेल्या. असे होते यशवंतरावजी आणि अशा होत्या वेणूताई, समाजातील शेवटच्या घटकाला प्रेमाने जवळ करणारे. 


कोल्हापुरी साज आणि कोल्हापुरी डोरलं ह्या वेणूताईंच्या आवडत्या गोष्टी होत्या. स्वतःसाठी नव्हे, तर इतरांना भेट देण्यासाठी. इंग्लंडच्या महाराणी व्हिक्टोरिया मुंबईत आल्या असता वेणूताईंनी त्यांना कोल्हापुरी साज चढवून आणि डोरलं घालून त्यांचे स्वागत केले होते. पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईत आल्या असता संपूर्ण महाराष्ट्रीय पोषाख चढवून त्यांचे स्वागत केले होते. आपल्या नात्यातील आणि परिचयातील अनेक बायकांना त्यांनी, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आहेर देऊन गौरविले होते. सगळ्यांसाठी सगळे करणे त्यांना आवडत असे. सुरक्षा यंत्रणेतील जवानांचेसुद्धा त्या अगत्यपूर्वक आदरातिथ्य करत असत. यशवंतरावजींच्या ग्रंथसंग्रहाची त्या जातीने काळजी घेत असत. जेव्हा यशवंतरावजी परदेश दौऱ्यावरून परत येत, तेव्हा वेणूताई त्यांच्या स्वागतासाठी विमानतळावर जात असत. यशवंतरावजींचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्र व निष्कलंक राहावे यासाठी त्या सर्वतोपरी काळजी घेत असत. वेणूताई यशवंतरावजींचा वाढदिवस अतिशय मन:पूर्वक साजरा करत. ह्या अगत्याबद्दल इंदिरा गांधी यांनी स्वहस्ताक्षरात पत्र लिहून वेणूताईंचे कौतुक केले होते. 


आईसारख्या प्रेमळ सासूबाई, दोन्ही भावे, पुतणे अशा अनेक गणगोताचे एकामागोमाग एक झालेले मृत्यू पाहून वेणूताई अतिशय व्यथित झाल्या होत्या. त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून त्या शरीराने आणि मनाने खचल्या होत्या. स्वतःच्या आजाराकडे लक्ष द्यायला त्यांना वेळच मिळाला नाही. अखेर १ जून १९८३ रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. वेणूताईंच्या वियोगामुळे यशवंतरावजी खचून गेले. त्यांच्या संसारात आर्थिक संपन्नता नसली, तरी वेणूताईंच्या मनाची श्रीमंती मोठी होती. वेणूताई यशवंतरावजींच्या केवळ पत्नी नव्हत्या, तर त्यांच्या जीवनातील सारसर्वस्व होत्या. वेणूताईंच्या निधनामुळे यशवंतरावजींना आपले जीवन अर्थशून्य झाल्यासारखे वाटू लागले. वेणूताईंच्या आठवणी जपण्यासाठी यशवंतरावजींनी वेणूताई चव्हाण स्मारक पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत एक कर्तबगार पती आपल्या सखी-सहचारिणीचे कर्तृत्व मुक्तकंठाने कथन करतो, ही घटना मोठीच शुभसूचक आहे. ओघवत्या लेखनशैलीमुळे ही कादंबरी वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेते. 


लेखकाने, यशवंतराव चव्हाण यांच्या कथनातून ह्या चरित्रकथेची सुंदर मांडणी केलेली असल्यामुळे ह्या कादंबरीला वस्तुनिष्ठता, विश्वासार्हता आणि सप्रमाणता लाभली आहे. इथे कल्पनारम्यतेला अजिबात थारा नाही. मुळात यशवंतराव चव्हाण यांची निवेदनशैली काव्यमय असल्यामुळे ह्या लेखनात एक प्रकारची उत्कटता उतरली आहे. यात वेणूताईंच्या अभावग्रस्त आयुष्याचा गोफ अतिशय प्रभावशाली पद्धतीने गुंफला आहे. लेखकाने ह्या कादंबरीत यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेली निवडक अशी भावस्पर्शी पत्रं समाविष्ट केल्यामुळे ही कादंबरी म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज बनला आहे. ह्या पत्रांमधून यशवंतरावजी आणि वेणूताई यांच्यातील नाजूक भावबंध उलगडतो. विठाईच्या ओव्यांची जोड दिल्यामुळे ही कलाकृती अधिक साजिवंत झाली आहे. गुणवत्तेमुळे ही कादंबरी छत्रपती संभाजीनगरच्या आणि नांदेड विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली आहे. शिवाय ही कादंबरी इंग्रजीत अनुवादित झाली आहे. मुखपृष्ठावरील वेणूताईंच्या प्रतिमेतून त्यांचा कुलीन-शालीनपणा आणि घरंदाजपणा नेमकेपणाने अभिव्यक्त झाला आहे. प्रा. नारायण शिंदे यांनी 'वेणू' ह्या कलाकृतीच्या माध्यमातून चरित्रात्मक कादंबरी ह्या वाङ्मयप्रकारात मोलाची भर घातली आहे. 


*********


'वेणू' (चरित्रात्मक कादंबरी) 

लेखक : प्रा. नारायण शिंदे 

प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड. 

मुखपृष्ठ : भास्करबुवा शिंदे 

पृष्ठे : ९६ किंमत रु. १८० 


*********


पुस्तक परिचय :

डॉ. सुरेश सावंत, नांदेड. 

sureshsawant2011@yahoo.com

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group