आणखी २ कोटी १३ लाखांचा संशयास्पद व्यवहार; तीन योजनांच्या खात्यांतून ४२ लाभार्थ्यांच्या नावावर ४५ नोंदी बी. सरवणन यांच्या सतर्कतेमुळे गैरव्यव...
आणखी २ कोटी १३ लाखांचा संशयास्पद व्यवहार; तीन योजनांच्या खात्यांतून ४२ लाभार्थ्यांच्या नावावर ४५ नोंदी
बी. सरवणन यांच्या सतर्कतेमुळे गैरव्यवहार उघड; आर्थिक गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू
किनवट : किनवटच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील कथित आर्थिक महाघोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून, आणखी २ कोटी १३ लाख रुपयांच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारांचा पर्दाफाश झाला आहे. यापूर्वी १६ कोटी ३७ लाख ६६ हजार ९१२ रुपयांच्या निधीचा कथित अपहार झाल्याचे समोर आले होते. नव्याने उघड झालेल्या व्यवहारांची भर पडल्याने घोटाळ्याची एकूण रक्कम आता १९ कोटी ६० लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे हा महाघोटाळा लवकरच २० कोटींचा टप्पा ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या प्रकरणात नांदेड आर्थिक गुन्हे शाखेने कथित मुख्य सूत्रधार रोखपाल भगवान डवरे आणि कंत्राटी संगणक चालक संतोष मारपवार यांच्यासह एकूण ८ आरोपींना अटक केली आहे. सध्या सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. आदिवासी विकास आयुक्तालय, नाशिक, विभागीय कार्यालय अमरावती, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
तपासादरम्यान यापूर्वी २०२३ या आर्थिक वर्षातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातील १८ नोंदींमधून १ कोटी ८ लाख ४० हजार २ रुपयांचे संशयास्पद व्यवहार उघड झाले होते. आता किनवट येथील ॲक्सिस बँकेच्या शाखेतील केंद्रीय सहाय्य योजना, आदिम जमाती योजना आणि कलम २७५/१ या तीन योजनांच्या खात्यांतून आणखी सुमारे २ कोटी १३ लाख रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.
विशेष म्हणजे, या तीन योजनांच्या खात्यांतून ४२ लाभार्थ्यांच्या नावावर एकूण ४५ आर्थिक नोंदी करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी २८ लाख ६२ हजार रुपये संतोष मारपवार याच्या खात्यावर, तर ९० हजार रुपये भगवान डवरे याच्या खात्यावर जमा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे या कथित गैरव्यवहाराचे धागेदोरे आणखी खोलवर असल्याचे स्पष्ट होत आहे.
रेकॉर्ड तपासणीतून नवनवीन बाबी उघड
या गंभीर प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील आर्थिक व्यवहारांशी संबंधित अभिलेखांची कसून तपासणी केली जात आहे. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची बारकाईने पडताळणी करण्यात येत आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतशा नवीन बाबी समोर येत असून, गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांनी दिली.
बी. सरवणन यांच्या सतर्कतेमुळे गैरव्यवहाराचा पर्दाफाश!
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी बी. सरवणन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कार्यालयातील आर्थिक व्यवहारांची बारकाईने तपासणी सुरू केली. या तपासणीदरम्यान त्यांच्या निदर्शनास काही संशयास्पद आर्थिक व्यवहार आले. त्यांनी तत्काळ या व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सतर्कतेमुळेच कथित निधी गैरव्यवहाराचे प्रकरण उजेडात आले. सध्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित आर्थिक व्यवहारांची पडताळणी सुरू आहे. त्यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे आदिवासी विकास विभागातील आर्थिक अनियमितता उघडकीस आणण्यास महत्त्वपूर्ण मदत झाली.
दरम्यान, घोटाळ्याची रक्कम २० कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने आदिवासी विकास विभागात मोठी खळबळ उडाली आहे. तपासात आणखी किती संशयास्पद व्यवहार समोर येतात आणि या प्रकरणात आणखी कोणाकोणाचा सहभाग निष्पन्न होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS