पोलिसांच्या आदेशालाही दाखवली पाठ, 'तो' मुजोर कारचालक चर्चेत अर्धापूर : अर्धापूर ते नांदेड मार्गावर सोमवारी दि.२ नोव्हेंबर रोजी सका...
पोलिसांच्या आदेशालाही दाखवली पाठ, 'तो' मुजोर कारचालक चर्चेत
अर्धापूर : अर्धापूर ते नांदेड मार्गावर सोमवारी दि.२ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता पिंपळगाव पाटीजवळ झालेल्या दुचाकी अपघातात एक तरुण गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर मदतकार्य सुरू असतानाच एका बेजबाबदार कारचालकाने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत पोलिसांच्या आदेशाला न जुमानता रॉंगसाईडने गाडी भरधाव वेगाने पळवल्याची संतापजनक घटना घडली आहे.
अशा गंभीर अपघाताच्या वेळी मदतकार्यात अडथळा आणणाऱ्या आणि पोलिसांसमोरच कायद्याचे उल्लंघन करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा मग्रूर वाहनचालकांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता त्यांच्यावर थेट कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी संतप्त मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
सोमवारी सकाळी पिंपळगाव पाटीजवळ बसवराज लक्ष्मण खोकले रा. कुरूडगी ता. देगलूर जि.नांदेड यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे यांनी तातडीने संपर्क साधला. त्यानंतर नरेंद्राचार्य संस्थान नानिजधामच्या रुग्णवाहिकेचे चालक राजू पाचंगे यांनी जखमी बसवराज यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यावेळी घटनास्थळी महामार्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी रुद्रा वाळके, महेश शंकरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले आणि वाहतूक सुरळीत केली. यावेळी मृत्युंजय दूत गोविंद टेकाळे, खुशाल देशमुख, पोलीस कर्मचारी इंदू गवळी, गजानन शिंदे, आत्माराम टेकाळे आदींनी मदतकार्यात सहभाग घेतला.
◾कारचालकाची पोलिसांच्या आदेशाला थेट केराची टोपली....
अपघातानंतर घटनास्थळी जखमीला मदतीसाठी नागरिकांची आणि पोलिसांची मोठी गर्दी जमली होती. मानवता आणि सुरक्षेचे नियम पाळणे अपेक्षित असतानाच एम.एच. २२ ए.डब्ल्यू. ०३६८ या क्रमांकाच्या कारचा चालकाने अत्यंत मुजोरी दाखवली. रॉंगसाईडने चुकीच्या दिशेने गाडी दामटत हा चालक वाहतुकीची शिस्त धुळीस मिळवत होता. विशेष म्हणजे महामार्ग पोलिसांनी त्याला स्पष्ट सूचना दिली असतानाही या चालकाने पोलिसांच्या आदेशाला न जुमानता आणि वाहतूक नियम पायदळी तुडवत विरुद्ध दिशेने भरधाव आपली गाडी दामतट नेली. सर्व जखमीस घटनास्थळी मदत करताना शिस्त मोडणाऱ्या बेजबाबदार कारचालकाबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

COMMENTS