नांदेड, २- प्रा. डॉ. शुरफद्धोधन गायकवाड यांनी आपल्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेत अनेक विद्यार्थी घडविले असून, त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत उच्च पदांवर कार्यरत आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे कार्याचा शेवट नव्हे, तर सामाजिक कार्यासाठी मिळालेली नवी संधी आहे. त्यामुळे त्यांनी यापुढील काळात सामाजिक प्रबोधनाचे कार्य हाती घेऊन समाजाला योग्य दिशा देण्यासाठी योगदान द्यावे, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड यांनी केले.
बिलोली तालुक्यातील अर्जापूर येथील पानसरे महाविद्यालयात ३१ ऑक्टोबर रोजी प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव सुभाष गायकवाड होते.
यावेळी कुंडलवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. प्रेरणाताई कोटलावार, माजी शिक्षण सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर, जुक्टाचे माजी राज्याध्यक्ष डी. बी. जांभरूनकर, संस्थेचे माजी सचिव पंढरीनाथ दाचावार, माधवराव पाटील, माजी प्राचार्य डॉ. जी. व्ही. चव्हाण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीनिवास चव्हाण, माजी प्राचार्य आनंद मंगनाळे, डॉ. राम जाधव, प्राचार्य कुंभेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. महादेव बेलखेडे, उप प्राचार्य गोपाळ चौधरी, स्टाॅप सेक्रेटरी प्रा. डॉ. देविदास जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना सुरेश गायकवाड म्हणाले की, शुद्धोधन गायकवाड यांनी आपल्या अध्यापनाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांचे विद्यार्थी परदेशातही उच्च शिक्षण घेत असून विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. आता निवृत्तीनंतर थांबण्याची गरज नाही, तर कामाचे स्वरूप बदलून समाजप्रबोधनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. समाजाला योग्य दिशा देणे आणि समाजाला मूळ प्रवाहात टिकवून ठेवणे आज अत्यंत गरजेचे आहे. ही गरज ओळखून निवृत्त व्यक्तींनीही सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. शुद्धोधन आणि प्रतिमा गायकवाड यांची जोडी आदर्श असल्याचे सांगत त्यांनी गायकवाड दाम्पत्याला दीर्घायुष्य लाभावे आणि त्यांच्या हातून भविष्यातही उत्तम कार्य घडावे, अशा शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्यात पानसरे महाविद्यालयाच्या वतीने प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड यांचा सपत्नीक शाल, महात्मा फुलेंची पगडी, आहेर, भव्य पुष्पहार, भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर मूर्ती तसेच मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशन, नांदेडच्या वतीने त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त तयार करण्यात आलेल्या इलगासुत या गौरवग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. बुद्धिस्ट सोशल ऑर्गनायझेशनच्या वतीनेही स्वतंत्र मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नांदेड येथील मैत्रेय मॉर्निंग वॉक ग्रुपच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला. मानपत्राचे वाचन मिलिंद व्यवहारे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. देविदास जाधव यांनी केले. यावेळी शिवराज पाटील होटाळकर, डी. बी. जांभरूनकर, प्रकाश पाटील अर्जुने, हनमंत मटके, संतोष पाटील शिवशेट्टे, प्रा. हेमंत बावणे, प्राचार्य गौतम मगरे, राजू लाभशेटवार, हौसाजी वारघडे, दत्ताहरी धोत्रे, डॉ. राम वाघमारे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून गायकवाड यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला. अध्यक्षीय समारोप सुभाष गायकवाड यांनी केला.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. शुद्धोधन गायकवाड यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासातील अनेक आठवणींना उजाळा दिला. ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना मोठे बंधू सुभाष गायकवाड यांनी केलेल्या सहकार्यामुळे पुढील शिक्षण पूर्ण करता आले. त्यानंतर १९९४ मध्ये पानसरे महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. गेल्या ३२ वर्षांच्या सेवाकाळात विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच महाविद्यालयाच्या विकासासाठीही योगदान देता आले. पर्यवेक्षक पदाची जबाबदारी सांभाळताना संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी केलेल्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख केला. यावेळी त्यांचे चिरंजीव कनिष्क गायकवाड तसेच कन्या प्रेरणा आणि समीक्षा गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त करून वडिलांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रकाश शिंदे तर उपस्थितांचे आभार उप प्राचार्य गोविंद चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, सर्व सेवक, पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS