नांदेड जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नांदेड शहर गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांच्या दोन वेगळ्या चित्रांचे साक्षीदार ठरले. एका बाजूला ज...
नांदेड जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून नांदेड शहर गुरुवारी ज्येष्ठ नागरिकांच्या दोन वेगळ्या चित्रांचे साक्षीदार ठरले. एका बाजूला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, हक्क आणि आरोग्यासाठी विशेष कार्यशाळा पार पडली, तर दुसऱ्या बाजूला आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी हातात 'ताट-वाटी' घेऊन
रस्त्यावर उतरत निदर्शने व मोर्चा काढला.
एक कडे प्रशासनाचा सन्मान: नियोजन भवनात विशेष कार्यशाळा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग (सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नांदेड) आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम), मराठवाडा प्रादेशिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजन भवन येथे ज्येष्ठ नागरिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.उद्घाटन व शपथ: उपजिल्हाधिकारी संजीव मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे होते. उपस्थितांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले व ज्येष्ठांचा आदर करण्याची सामूहिक शपथ घेतली.
शासकीय योजना व सोयी-सुविधा: समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना व पेन्शन योजनांची माहिती दिली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निलेश सुकेवार यांनी शहरातील विरंगुळा केंद्रे व वाचन कट्ट्यांची माहिती दिली.
बँकिंग व आरोग्य मार्गदर्शन: जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक बी. जी. सोनकांबळे यांनी डिजिटल फसवणुकीपासून सावध राहण्याचे आणि बँकांमध्ये स्वतंत्र सुविधा देण्याचे आश्वासन दिले. फिजिओथेरपी तज्ज्ञ डॉ. सुमेधकुमार वाघमारे यांनी व्यायामाचे प्रात्यक्षिक दाखवले, तर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे मोफत रक्तदाब व साखर तपासणी शिबिर घेण्यात आले.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सुमारे ४०० ते ५०० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग नोंदवला.
दुसऱ्या बाजूला आक्रोश: न्याय मागण्यांसाठी 'ताट-वाटी' मोर्चा
प्रशासकीय सभागृहात ज्येष्ठांचे प्रबोधन आणि सन्मान सोहळा सुरू असतानाच, दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.डॉक्टर वैद्य यांच्या नेतृत्वात मोर्चा: डॉ. वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली वयवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी हातात फलक, ताट आणि वाट्या घेऊन आंदोलन केले.
आंदोलकांची भूमिका: "केवळ एका दिवसाचा सन्मान नकाे, तर रोजच्या जगण्याचा हक्क आणि पेन्शनसह आरोग्य सेवा द्या," अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली.
हातात ताट-वाटी वाजवत ज्येष्ठांनी सरकारचे लक्ष आपल्या प्रलंबित समस्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला व धरणे आंदोलन केले.
थोडक्यात...
जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त नांदेडमध्ये एकाच वेळी प्रशासकीय पातळीवरील सत्कार-मार्गदर्शन आणि रस्त्यावरील हक्क-मागण्यांचे आंदोलन, असे दुहेरी चित्र पाहायला मिळाले. सरकार आणि प्रशासनाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या मूलभूत आर्थिक व सामाजिक मागण्यांचीही तातडीने दखल घ्यावी, अशी भावना या दोन्ही प्रसंगांतून व्यक्त झाली.


COMMENTS